Atishi, Kailas Gahlot, Arvind Kejriwal, Manish Sisodia Sarkarnama
देश

Kailash Gahlot : केजरीवालांना सर्वात मोठा धक्का; गंभीर आरोप करत बड्या नेत्याचा ‘आप’ला रामराम

AAP Delhi Government Assembly Election : दिल्लीत पुढील काही महिन्यांत विधानसभेची निवडणूक होणार आहे. त्याआधीच आम आदमी पक्षाला मोठा झटका बसला आहे.

Rajanand More

New Delhi : दिल्लीमध्ये आम आदमी पक्षाला रविवारी सर्वात मोठा झटका बसला आहे. पुढील काही महिन्यांवर विधानसभेची निवडणूक येऊन ठेपलेली असताना दिल्ली सरकारमधील महत्वाच्या मंत्र्यांनी राजीनामा देत पक्षालाही सोडचिठ्ठी दिली आहे. सर्वात विश्वासू नेत्यांपैकी एक असलेल्या नेत्यानेच गंभीर आरोप करत अरविंद केजरीवाल यांची साथ सोडली आहे.

‘आप’चे नेते व मंत्री कैलाश गहलोत यांनी रविवारी आपच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला. दिल्ली सरकारमध्ये त्यांच्या गृह, परिवहन, महिला व बाल विकास, प्रशासकीय सुधारणा, माहिती व तंत्रज्ञान ही महत्वाची खाती होती. केजरीवालांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतर या पदासाठी गहलोत यांचेही नाव चर्चेत होते. दरम्यान, गहलोत भाजपमध्ये प्रवेश करण्याची शक्यता आहे.  

गहलोत यांनी राजीनामा देताना गंभीर आरोपही केले आहे. केजरीवाल यांना उद्देशून लिहिलेल्या राजीनामापत्रात त्यांनी म्हटले आहे की, पक्षाने दिल्लीकरांना दिलेली अनेक आश्वासने पूर्ण केलेली नाही. यमुना नदी आतापर्यंत कधीही नव्हती एवढी प्रदुषित बनल्याचा ठपका गहलोत यांनी ठेवला आहे. सध्या दिल्लीला प्रदुषणाचा विळखा पडला असून गहलोत यांनी त्यावरच बोट ठेवले आहे.

अरविंद केजरीवाल यांच्या सरकारी बंगल्यावरून त्यांनी टोला लगावला आहे. भाजपने या बंगल्याचा उल्लेख शीशमहल असा केला होता. गहलोत यांनी यावरून सुरू असलेल्या वादामुळे आपण अजूनही ‘आम आदमी’ असल्याबाबत लोकांच्या मनात शंका असल्याचे म्हटले आहे. लोकहिताची कामे करण्याऐवजी आपण राजकीय अजेंड्यासाठी लढत असल्याची नाराजीही त्यांनी पत्रात व्यक्त केली आहे.

दिल्लीतील लोकांना पायाभूत सुविधा देण्यातही आपण कमी पडल्याची कबुलीच गहलोत यांनी दिली आहे. केंद्र सरकारशी भांडण्यातच दिल्ली सरकार आपला बराचसा वेळ घालवत असेल तर विकास होणार नाही. मी लोकांच्या सेवेसाठी राजकारणात आलो आणि पुढेही सेवा करत राहीन. त्यामुळे मला पक्षातून बाहेर पडण्याशिवाय पर्याय नसल्याचे सांगत गहलोत यांनी प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा देत असल्याचे स्पष्ट केले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT