Devendra Fadnavis, Sanjay Raut
Devendra Fadnavis, Sanjay Raut sarkarnama
देश

राऊतांवर कारवाई अन् फडणवीसांनी आठवण करुन दिली, राणेंच्या घरात घुसल्याची...

ऋषीकेश नळगुणे

मुंबई : अंमलबजावणी संचालनालय अर्थात ईडीने (ED) काल शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांची मालमत्ता जप्त केली आहे. १ हजार ३४ कोटींच्या पत्राचाळ घोटाळा प्रकरणी ही कारवाई केल्याची माहिती समोर आली आहे. यात दादरमधील फ्लॅट आणि अलिबागमधील ८ भुखंड जप्त करण्यात आले आहे. याच घोटाळा प्रकरणी संजय राऊत यांचे निकटवर्तीय प्रविण राऊत यांची चौकशी होऊन त्यांना अटक करण्यात आली होती. त्यानंतरच्या तपासात या घोटाळ्यातील पैसा अलिबागमधील मालमत्ता खरेदी करण्यासाठी वापरण्यात आल्याचा संशय ईडीला आहे.

या कारवाईवर बोलताना संजय राऊत म्हणाले होते, मला ईडीच्या या कारवाईची पुर्वकल्पना होती. माझ्यावर राज्यातील सरकार पाडण्यासाठी दबाव टाकला गेला. सुडबुद्धीतून ही कारवाई करण्यात आली आहे. पण अशा कारवायांमुळे संजय राऊत तुमच्यापुढे गुडघे टेकणार नाही, माझ्यावर बाळासाहेब ठाकरेंचे संस्कार आहेत आणि आजही त्यांचा आशीर्वाद मला प्राप्त आहे. मराठी माणूस आणि महाराष्ट्र सरकारला बदनाम करण्याचा आणि माझा हरेन पांड्या करण्याचा डाव असल्याचा आरोपही राऊत यांनी केला.

यावर प्रतिक्रिया देताना राज्याचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी भाजप नेते नारायण राणे आणि मोहित कंबोज यांच्यावर झालेल्या कारवाईची आठवण राऊत यांना करुन दिली. ते म्हणाले, काही लोकांचा प्रयत्न असतो की नख कापून शहीद व्हायच, लोकांचे लक्ष वेधून घ्यायचं. आमच्या अनेक लोकांच्या घरात घुसून माप घेऊन नोटीस दिल्या आहेत. पण या नोटीसीला आम्ही कायदेशीर उत्तर दिले. या ठिकाणी आता पुराव्याच्या आधारावर नोटीस दिल्या आहेत, त्याचे त्यांनी कायद्यानेच उत्तर द्यावे. भावनिक उत्तर देवून त्यावर लोकांचा विश्वास बसणार नाही.

पत्रावाला चाळ हा गरिब मराठी माणसाचा हा प्रश्न होता. तो अनेक वर्ष भिजत होता कारण ज्यांना लोकांनी मसीहा केले त्यांनीच सर्व बिल्डरच्या घशात घातले. मी मुख्यमंत्री असताना याबाबत गुन्हा दाखल करण्यापासूनची सर्व कारवाई केली. आता मराठी माणसाच्या नावावर राजकारण करायचे आणि मराठी माणसाला लुटायचे हे आता लोकांना कळलं आहे, अशीही टीका फडणवीस यांनी केली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT