Opposition demands : नीट पेपरफुटी, विद्यार्थ्यांवरील पोलिसांचा लाठीचार्ज या मुद्द्यांवरून विरोधक चांगलेच आक्रमक झाले आहे. संसदेच्या दोन्ही सभागृहात यावर चर्चा घेण्याची मागणी विरोधकांकडून केली होती. त्यामुळे तिन्ही दिवस लोकसभा आणि राज्यसभेचे कामकाज होऊ शकले नाही. आता विरोधकांनी केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याशिवाय चर्चा नाही, असा पवित्रा घेतल्याने केंद्र सरकारची कोंडी झाली आहे.
राज्यसभेत विरोधी पक्षनेते मल्लिकार्जून खर्गे यांनी नियम २६७ चा मुद्दा उपस्थित करत नीट पेपरफुटी, लाठीचार्ज आदी मुद्यांवर चर्चा घेण्याची विनंती केली. मागील काही दिवसांत घडलेल्या घटना या दुर्मिळातील दुर्मिळ असल्याचे खर्गेंनी म्हटले. मात्र, उपसभापतींनी त्यांची मागणी मान्य न करता सभागृहाचे कामकाज दिवसभरासाठी तहकूब केले.
काय आहे नियम २६७?
राज्यसभा कामकाज नियम २६७ नुसार, दिवसभराच्या कामकाजपत्रिकेवरील सर्व विषय बाजूला ठेवत एका विषयावर चर्चा घडवून आणण्याचा अधिकार राज्यसभा सभापतींना देण्यात आला आहे. विरोधकांनी याच नियमाचा आधार घेत चर्चा करण्याची जोरदार मागणी केली होती.
चर्चेसाठी विरोधकांच्या पाच प्रमुख मागण्या -
केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी नीट पेपरपुटीप्रकरणी राजीनामा द्यावी, अशी विरोधकांची प्रमुख मागणी आहे. कॉक्रोच जनता पार्टीचेही याच मागणीसाठी जंतरमंतरवर आंदोलन सुरू केले आहे. आता विरोधी पक्षही त्यासाठी आक्रमक झाले आहेत. त्यामुळे सरकारवरील दबाव वाढत चालला आहे.
विद्यार्थी, युवकांच्या संसद मोर्चावर पोलिसांनी केलेल्या लाठीचार्जवरून विरोधक तीव्र संताप व्यक्त करत आहेत. त्यावर तातडीने संसदेत चर्चा घ्यावी, अशी मागणी केली जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी पोलिसांच्या लाठीचार्जवर अद्याप भाष्य केलेले नाही. याबाबत त्यांनी दोन्ही सभागृहात भूमिका स्पष्ट करावी, अशी विरोधकांची मागणी आहे.
लाठीचार्जविरोधात पंतप्रधान मोदींच्या निवासस्थानाबाहेर आंदोलन करत असताना लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी आणि अन्य विरोदी खासदारांना पोलिसांनी जबरदस्तीने हटविल्याचा मुद्दाही विरोधकांनी उचलून धरला आहे. देशातील शिक्षण आणि परीक्षा पध्दतीवरून युवकांमध्ये निराशेचे वातावरण असून त्यांना कोणताही आशावाद राहिलेला नाही. त्यावरही संसदेच्या दोन्ही सभागृहात चर्चा व्हावी, अशी अपेक्षा विरोधकांकडून व्यक्त केली जात आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.