Israel vs Hamas War Sarkarnama
देश

Israel vs Hamas War : इस्राईल-हमास युद्धाचा थेट भारतावर परिणाम; हजारो रोजगार जाण्याची भीती !

Chetan Zadpe

Israel vs Hamas War Effects : इस्राईल आणि हमास यांच्यात सुरू असलेल्या युद्धाचा परिणाम भारतातील उद्योगांवर होत आहे. वस्त्रोद्योग, खाद्यपदार्थ आणि हस्तकला उद्योगांच्या वस्तूंचा पुरवठा गुरुग्राम येथून केला जातो. उड्डाणे रद्द झाल्यामुळे कोट्यवधींचा माल पाठवण्याबाबत उद्योजकांची चिंता वाढली आहे.

इस्राईलमधील युद्ध असेच सुरू राहिल्यास उद्योगांना मोठे नुकसान सहन करावे लागणार आहे. यामुळे अनेक वस्तूंच्या मागण्या थांबतील. या दोन देशांतील युद्ध दीर्घकाळ सुरू राहिल्यास या क्षेत्रांत काम करणाऱ्या हजारो लोकांचा रोजगारही धोक्यात येईल. (Latest Marathi News)

गुरुग्राम जिल्ह्यात १२ हजार उद्योग आहेत. ऑटोमोबाईल्सनंतर अडीच हजार गारमेंट उद्योग आहेत. याशिवाय दोनशे अन्न व हस्तकला उद्योग आहेत. हे तिन्ही उद्योग इस्राईलला माल पुरवतात. येथून मागणीनुसार माल तयार करून पाठविला जातो. मात्र, इस्राईलमध्ये सुरू असलेल्या युद्धामुळे अनेक दिवसांपासून उद्योजकांच्या अडचणी वाढल्या आहेत.

दिल्लीहून इस्राईलला जाणारी उड्डाणे रद्द करण्यात आली. यामुळे उद्योजकांना तयार माल पाठवता येणार नाही. येथून दरवर्षी 250 कोटींहून अधिक उलाढाल होते. उद्योग विहारचे गारमेंट उद्योजक संजय सन्याल म्हणाले की, "इस्राईलमध्ये सुरू असलेल्या युद्धामुळे तेथून नवीन मागणी येणे थांबणार आहे. आम्ही तयार मालदेखील पाठवू शकणार नाही."

अन्न खराब होण्याची भीती -

मानेसर गारमेंट उद्योजक सतीश चंद यांनी सांगितले की, चार टक्के गारमेंट उद्योजक येथून इस्राईलला माल पुरवतात. युद्धामुळे हा पुरवठा बंद होईल. त्यामुळे सणासुदीच्या काळात उद्योजकांना तोटा सहन करावा लागणार आहे. उद्योगांना तयार मालही पाठवता येणार नाही. याचा सर्वाधिक फटका अन्न उद्योगाला बसणार आहे. कारण तो तयार माल जास्त काळ साठवून ठेवू शकत नाही. केवळ गारमेंट उद्योग 100 कोटी रुपयांची उलाढाल करतो. हे सर्व ठप्प झाल्याने त्याचा परिणाम उद्योगांवर होणार आहे.

उद्योजकांचे आर्थिक नुकसान होईल -

प्रोग्रेसिव्ह फेडरेशन ऑफ ट्रेड अँड इंडस्ट्रीचे अध्यक्ष दीपक मैनी यांनी सांगितले की, "इस्राईलमध्ये सुरू असलेल्या युद्धामुळे येथून कापड निर्यातीचा व्यवसाय मोठ्या प्रमाणावर सुरू आहे. याशिवाय खाद्यपदार्थ आणि हस्तकलेची निर्यात होत आहे. आता युद्धाच्या परिस्थितीचा या सर्वांवर थेट परिणाम होणार आहे. त्याचबरोबर ज्या उद्योजकांनी आपला पैसा त्या देशात गुंतवला आहे, त्यांचे थेट नुकसान होणार आहे. ज्याचा परिणाम उद्योजकांच्या आर्थिक स्थितीवरही होईल.

कच्चे तेल महाग -

या युद्धामुळे कच्चा तेलाचे दर वाढत आहेत. बाजारात सोमवारी सुरुवातीच्या व्यवहारात तेलाच्या किमती प्रतिबॅरल चार डॉलरपेक्षा अधिकने वाढल्या आहेत. दोन देशांतील लष्करी संघर्षामुळे मध्य पूर्वेतील काही देशांत राजकीय निश्चितता अधिक वाढली आहे. याचा परिणाम आशिया बाजारातील तेलावर झाला आहे. तेलाच्या किमती वाढविल्यामुळे गेल्या आठवड्यापासून स्वस्त झालेले तेल पुन्हा वधारणार आहे.

सोने-चांदीच्या दरात वाढ -

दरम्यान, या दोन्ही देशांतील युद्धाचा परिणाम सोन्या-चांदीच्या दरावरही झालेला आहे. पितृपक्षामुळे भारतात सोने-चांदीच्या दरावर परिणाम झाले होते. गेल्या आठवडाभरापासून सोने-चांदीचे दर घसरत असताना शनिवारी पुन्हा एकदा सोने-चांदीचे दर उसळले आहेत. शनिवारी चांदीच्या भावात १६०० रुपयांनी, तर सोन्याचे भाव ३०० रुपयांची वाढ झाली. गेल्या आठवडाभरात सोनं १४०० रुपयांनी, तर चांदी ४१०० रुपयांनी स्वस्त झाली होती.

(Edited By - Chetan Zadpe)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT