Karnataka Panch Guarantee : काँग्रेस सरकारच्या पंचहमी योजना यशस्वी ठरल्या असून त्यांचा आदर्श देशातील अनेक राज्यांसह आता जगही घेत आहे, असा दावा मुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांनी केला.
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर निशाणा साधत, ‘आता ट्रम्पही आमची नक्कल करीत आहेत’, असा टोला त्यांनी लगावला.
केपीसीसी कार्यालयात भाजपचे (BJP) माजी आमदार ने. ल. नरेंद्रबाबू यांच्या काँग्रेस पक्षात प्रवेश कार्यक्रमात ते बोलत होते. काँग्रेसच्या लोककल्याणकारी पंचहमी योजनांना जनतेचा मोठा प्रतिसाद मिळाल्याचे शिवकुमार यांनी सांगितले.
‘पंचहमी योजना राबविणे शक्य नाही, अशी टीका विरोधकांनी केली होती. मात्र, आज याच योजनांमुळे कर्नाटक देशासाठी आदर्श ठरले आहे. बिहार, मध्य प्रदेश आणि उत्तर प्रदेशसह अनेक राज्यांनी कर्नाटकच्या मॉडेलची नक्कल केली. आता अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्पही त्याची नक्कल करीत आहेत. ‘मला मतदान करा, मी पाच हजार डॉलर देईन,’ असे ते म्हणत आहेत. आमची संकल्पना आता संपूर्ण जगात पोहोचत आहे’, असे शिवकुमार (D K Shivakumar) म्हणाले.
अमेरिकेत रिपब्लिकन पक्षाने प्रतिनिधीगृह आणि सिनेटवरील नियंत्रण कायम राखल्यास प्रत्येक प्रौढ नागरिकाला पाच हजार डॉलर देण्याचे आश्वासन ट्रम्प यांनी अलीकडेच दिले होते. या घोषणेचा संदर्भ देत शिवकुमार यांनी ती कर्नाटकच्या पंचहमी योजनांशी जोडली.
कर्नाटकातील पंचहमी योजनांचा लाभ सर्व पक्ष आणि जातींच्या नागरिकांना दिला जात असल्याचे त्यांनी सांगितले. चार कोटी 44 लाख नागरिकांना अन्नभाग्य योजनेचा लाभ मिळत असल्याचा दावा त्यांनी केला. विद्यार्थ्यांना मोफत बसपास दिले जात आहेत. सरकार नागरिकांच्या घरापर्यंत पोहोचले असून आम्ही जनसेवा करीत आहोत, असेही मुख्यमंत्री शिवकुमार म्हणाले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.