अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताच्या निवडणूक प्रक्रियेचे कौतुक करत अमेरिकेतील निवडणूक व्यवस्थेत मतदार ओळखपत्राबाबत मोठा बदल करण्याची गरज व्यक्त केली आहे. भारताचे मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या विधानाचा संदर्भ देत ट्रम्प यांनी अमेरिकेत प्रत्येक मतदारासाठी वैध फोटो ओळखपत्र अनिवार्य करण्याची मागणी केली आहे. त्यांच्या या भूमिकेमुळे अमेरिकेतील ‘वोटर आयडी’चा मुद्दा पुन्हा चर्चेत आला आहे.
ट्रम्प यांनी त्यांच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘ट्रुथ सोशल’वरील पोस्टमध्ये भारतातील लोकसभा निवडणुकीचा उल्लेख केला. भारताच्या निवडणुकीत मोठ्या प्रमाणावर मतदार सहभागी झाले आणि त्यापैकी 1 टक्क्यांपेक्षाही कमी मतदारांनी पोस्टल बॅलेटचा वापर केल्याचे त्यांनी नमूद केले.
ट्रम्प यांनी लिहिले, “या महिन्याच्या सुरुवातीला भारताचे मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी माझ्या प्रशासनाला विचारले की, अमेरिकेत वैध फोटो ओळखपत्राशिवाय निवडणुका कशा घेतल्या जाऊ शकतात?”
भारताच्या निवडणूक व्यवस्थेचा संदर्भ देताना ट्रम्प यांनी पुढे सांगितले की, “भारताच्या मागील निवडणुकीत 64 कोटी 60 लाख मतदारांनी मतदान केले आणि त्यापैकी 1 टक्क्यांपेक्षा कमी लोकांनी पोस्टाने मतदान केले. प्रत्येक मतदाराकडे वैध फोटो ओळखपत्र असणे आवश्यक होते.”
ट्रम्प यांच्या या विधानाचा थेट संबंध अमेरिकेतील SAVE America Act शी आहे. अमेरिकन मतदार नोंदणी प्रक्रियेत नागरिकत्वाचा पुरावा सादर करणे आणि देशभर मतदार ओळखपत्राची व्यवस्था लागू करण्यासाठी या कायद्याला मंजुरी मिळावी, अशी त्यांची भूमिका आहे. निवडणुकीतील गैरप्रकार रोखण्यासाठी हा कायदा महत्त्वाचा असल्याचा दावा ट्रम्प यांनी केला आहे.
मात्र, SAVE America Act वरून अमेरिकेतील डेमोक्रॅट आणि रिपब्लिकन पक्षांमध्ये मतभेद कायम आहेत. त्यामुळे या कायद्याला पुढे नेणे ट्रम्प प्रशासनासाठी आव्हानात्मक ठरत आहे.
दरम्यान, भारतातील अमेरिकेचे राजदूत सर्जियो गोर यांनीही ट्रम्प यांच्या पोस्टवर प्रतिक्रिया देत त्यांच्या भूमिकेला पाठिंबा दर्शवला आहे. त्यामुळे भारताची निवडणूक पद्धत, मतदार ओळखपत्र आणि अमेरिकेतील निवडणूक सुधारणा यावर पुन्हा एकदा आंतरराष्ट्रीय पातळीवर चर्चा सुरू झाली आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.