Delhi University Election Result 2026 : कॉक्रोच जनता पक्षाने (सीजेपी) जुलै महिन्यात केलेले युवकांचे आंदोलन आणि पाच मजली सत्य निकेतन वसतिगृह कोसळण्याच्या पार्श्वभूमीवर झालेल्या दिल्ली विद्यापीठ विद्यार्थी संघटनेच्या चुरशीच्या निवडणुकीमध्ये भाजप, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ पुरस्कृत अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने (अभाविप) बाजी मारली.
अध्यक्ष, सचिव आणि सहसचिव, अशा चारपैकी तीन केंद्रीय पदांसाठी झालेल्या लढती परिषदेने जिंकल्या आहेत. उपाध्यक्षपदावर अपक्ष उमेदवाराने बाजी मारली.
या निवडणुकीत जोरदार लढत देऊनही काँग्रेसप्रणीत ‘एनएसयूआय’ चारपैकी एकही जागा जिंकू न शकल्याने चारीमुंड्या चीत झाली. ‘आम आदमी पक्ष’ प्रणीत ‘असाप’ आणि डाव्या पक्षांच्या विद्यार्थी संघटना ‘आयसा-एसएफआय’ यांचाही धुव्वा उडाला. ही निवडणूक खूप महत्त्वाची आणि प्रतिकात्मक होती. युवकांचा आवाज दाखवून देणारी आणि जनमताचा कौल देणारी निवडणूक ठरली, अशी प्रतिक्रिया भाजपचे केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू यांनी दिली.
अध्यक्षपदासाठी झालेल्या निवडणुकीत ‘अभाविप’च्या (ABVP) यश डबासने ‘एनएसयूआय’च्या विजय शंकर मीणाचा 2 हजार 53 मतांनी पराभव केला. यश डबासला 24 हजार 567 मते मिळाली तर विजय मीणाला 22 हजार 523 मते मिळाली आहेत.
दिल्ली विद्यापीठ विद्यार्थी संघटनेच्या निवडणुकीत (Congress) ‘एनएएसयूआय’ला सतरा वर्षांमध्ये प्रथमच एकही जागा जिंकता आलेली नाही. उपाध्यक्षपदासाठी झालेल्या लढतीत ‘एनएसयूआय’च्या बंडखोर अपक्ष उमेदवार दीपांशू शौकीनने 30 हजार 615 मते मिळवून ‘अभाविप’च्या इशू मौर्याचा पराभव केला. ‘एनएसयूआय’च्या वीर चतरथला 4 हजार 313 मते मिळाली.
सचिवपदाच्या लढतीत ‘अभाविप’च्या रिया छावडीने 21 हजार 650 मते मिळवून ‘एनएसयूआय’च्या नम्रता चौधरीचा पराभव केला. नम्रता चौधरीला 14 हजार 869 मते मिळाली. सहसचिवपदासाठी झालेल्या चुरशीच्या तिरंगी लढतीत ‘अभाविप’च्या लक्ष्यराज सिंहने 16 हजार 641 मते मिळवून समाजवादी छात्र सभेचा उमेदवार विशेष यादवचा निसटत्या अंतराने पराभव केला.
विशेष यादवला 15 हजार 778 तर ‘एनएसयूआय’च्या गोपाल चौधरीला 15 हजार 106 मते मिळाली. दिल्ली विद्यापीठ विद्यार्थी संघटनेची निवडणूक यंदा प्रथमच इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्राच्या माध्यमातून पार पडली. शुक्रवारी झालेल्या शांततापूर्ण मतदानादरम्यान दिल्ली विद्यापीठातील 52 महाविद्यालयांच्या 1 लाख 51 हजार पात्र मतदारांपैकी 40.46 टक्के विद्यार्थ्यांनी मतदान केले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.