Sujay Vikhe District Bank : जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदावर सुजय विखेंची भूमिका स्पष्ट; म्हणाले, ‘मला कुठेच काही व्हायचं नाही’

Sujay Vikhe Patil clarifies his stand on the Ahilyanagar District Bank chairman post : कार्यकर्त्यांकडून नावाची चर्चा; फडणवीस ज्यांचे नाव सुचवतील त्यांनाच अध्यक्षपदाची संधी, विखे-तनपुरे भेटीने राजकीय चर्चांना वेग
Sujay Vikhe District Bank
Sujay Vikhe District BankSarkarnama
Published on
Updated on

Ahilyanagar District Central Cooperative Bank : अहिल्यानगर जिल्हा बँकेच्या निवडणुकीच्या हालचालींना वेग आला असतानाच भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष आणि माजी खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी अध्यक्षपदाबाबत आपली भूमिका स्पष्ट केली आहे.

जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदासाठी कार्यकर्त्यांकडून त्यांचे नाव पुढे केले जात असले, तरी आपल्याला कोणतेही पद मिळवण्याची इच्छा नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ज्यांचे नाव सुचवतील, त्यांनाच अध्यक्षपदाची संधी मिळेल, असे विखे पाटील यांनी सांगितले.

दरम्यान, डॉ. सुजय विखे पाटील (Sujay Vikhe Patil) यांनी माजी खासदार प्रसाद तनपुरे यांच्या राहुरी येथील निवासस्थानी भेट दिली. आमदार प्राजक्त तनपुरे यांच्यासोबत त्यांची सुमारे तासभर बंद दाराआड चर्चा झाली. जिल्हा बँकेचे ज्येष्ठ संचालक अरुण तनपुरे आणि युवा नेते हर्ष तनपुरे यांच्याशीही त्यांनी संवाद साधला. या भेटीनंतर विखे पाटील यांनी पत्रकारांशी संवाद साधत जिल्हा बँकेच्या निवडणुकीसह अध्यक्षपदाबाबत भाष्य केले.

जिल्हा बँकेच्या (DCC Bank) अध्यक्षपदासाठी कार्यकर्ते आपले नाव पुढे करत असल्याबाबत विचारले असता डॉ. विखे पाटील यांनी मिश्कील शैलीत प्रतिक्रिया दिली. माझ्या कार्यकर्त्यांना वाटतंय की मी अमेरिकेचा राष्ट्रपती झालं पाहिजे. पण त्यांच्या वाटण्यावर काही नसतं. ते त्यांचं माझ्यावरचं प्रेम आहे. मला कुठेच काही व्हायचं नाही. मी अतिशय समाधानी माणूस आहे. जनतेने आजपर्यंत जी संधी आणि जो सन्मान दिला, तो मी स्वीकारला, असे विखे पाटील म्हणाले.

Sujay Vikhe District Bank
Kukadi Sugar Factory seized : राहुल जगतापांना मोठा धक्का; कुकडी साखर कारखान्यावर जिल्हा बँकेची जप्ती

अहिल्यानगर जिल्ह्यात दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली असून शेतकरी अडचणीत आहेत. अशा परिस्थितीत जिल्हा बँकेची निवडणूक राजकीय संघर्षाचे कारण ठरू नये, अशी भूमिका विखे पाटील यांनी मांडली. दुष्काळी परिस्थितीत शेतकऱ्यांची उभी पिके जळत चालली आहेत. शेतकरी अडचणीत आहेत. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांना जीवनदान देणाऱ्या एडीसीसी बँकेच्या निवडणुकीत राजकीय संघर्ष टाळला पाहिजे, असे ते म्हणाले.

Sujay Vikhe District Bank
Ahilyanagar DCC Bank Election : महायुतीतच कुरघोड्या; अहिल्यानगर जिल्हा बँक निवडणुकीआधी संघर्षाची ठिणगी

जिल्ह्यातील सर्व नेत्यांनी समन्वयाने काम करून जिल्हा बँकेची निवडणूक बिनविरोध करण्यासाठी प्रयत्न करावेत, अशी विनंती आपण आपल्या स्तरावर केली आहे. पालकमंत्र्यांनीही अशीच भूमिका मांडल्याचे विखे पाटील यांनी सांगितले. जिल्ह्यातील सहकारातील सर्व नेते सकारात्मक प्रतिसाद देतील आणि बँकेची निवडणूक बिनविरोध करतील, असा मला विश्वास आहे, असेही त्यांनी म्हटले.

प्राजक्त तनपुरे यांच्या निवासस्थानी झालेल्या भेटीवरही विखे पाटील यांनी भाष्य केले. मात्र, जिल्हा बँकेच्या निवडणुकीबाबत आमदार तनपुरे यांच्याशी चर्चा झाल्याचे त्यांनी स्पष्टपणे नाकारले. मी राहुरीच्या दौऱ्यावर आलो होतो. विधान परिषदेच्या निवडणुकीनंतर आमदार प्राजक्त तनपुरे यांच्या निवासस्थानी आलो नव्हतो. भूक लागली होती. आमदार तनपुरेंनी जेवायला बोलावले. म्हणून आलो, अशी मिश्कील प्रतिक्रिया त्यांनी दिली.

तनपुरे साखर कारखान्याबाबत काय म्हणाले?

तनपुरे साखर कारखाना सुरू राहावा, अशी सर्वांची इच्छा असल्याचे विखे पाटील यांनी सांगितले. सध्या हा कारखाना जिल्हा बँकेच्या ताब्यात आहे. जिल्हा बँकेची निवडणूक झाल्यानंतर तनपुरे साखर कारखाना आणि कुकडी साखर कारखान्याशी संबंधित प्रश्नांवर नवनिर्वाचित संचालक मंडळ निर्णय घेईल, असे विखे पाटील यांनी स्पष्ट केले.

विखे-तनपुरे भेटीने राजकीय चर्चांना वेग

एकेकाळी राहुरीच्या राजकारणात प्रमुख विरोधक म्हणून पाहिले जाणारे विखे पाटील आणि तनपुरे आता एकाच राजकीय छताखाली आहेत. त्यामुळे या भेटीला जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळात महत्त्व प्राप्त झाले आहे. यापूर्वी विधान परिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे यांनीही दोन महिन्यांपूर्वी तनपुरे यांच्या निवासस्थानी भेट देत सुमारे तासभर चर्चा केली होती. आता डॉ. सुजय विखे पाटील यांच्या भेटीमुळे जिल्हा बँकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राहुरीसह जिल्ह्याच्या राजकारणात नव्या चर्चांना सुरुवात झाली आहे. मात्र, विखे पाटील यांनी या भेटीचा संबंध जिल्हा बँक निवडणुकीशी जोडण्याचे टाळत, प्राजक्त तनपुरे यांच्यासोबत निवडणुकीबाबत चर्चा झाली नसल्याचे स्पष्ट केले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com