

Ahilyanagar Police News : अहिल्यानगर जिल्ह्यातील पाथर्डी पोलिस ठाण्यात कार्यरत असलेल्या एका पोलिस कर्मचाऱ्याला अडीच लाख रुपयांची लाच स्वीकारताना नाशिकच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) पकडले.
पाथर्डी शहरात पोलिस ठाण्यापासून काही अंतरावरच ही कारवाई करण्यात आली. या प्रकरणात रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.
मिळालेल्या माहितीनुसार, चार दिवसांपूर्वी पाथर्डी शहरात एक गुन्हा घडला होता. या गुन्ह्यात वाढीव कलम लावायचे नसेल तर पाच लाख रुपये द्यावे लागतील, अशी मागणी संबंधित पोलिस (Police) कर्मचाऱ्याने आरोपींकडे केल्याचा आरोप आहे. त्यानंतर तडजोड होऊन अडीच लाख रुपये स्वीकारण्याचे ठरल्याची माहिती समोर आली आहे.
या मागणीबाबत तक्रारदारांनी नाशिकच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाशी (ACB) संपर्क साधला. तक्रारीची पडताळणी केल्यानंतर ACBचे पथक पाथर्डी शहरात दाखल झाले. पोलिस ठाण्यापासून हाकेच्या अंतरावर अडीच लाख रुपयांची लाच स्वीकारताना संबंधित पोलिस कर्मचाऱ्याला पथकाने रंगेहाथ पकडले. कारवाईनंतर त्याच्या निवासस्थानी तसेच इतर काही ठिकाणीही पथकाकडून झाडाझडती घेण्यात आल्याची माहिती आहे.
या कारवाईनंतर ACBकडून संबंधित पोलिस कर्मचाऱ्याची चौकशी सुरू आहे. लाचेची रक्कम त्याने स्वतःसाठी मागितली होती की, या प्रकरणात आणखी कोणत्या पोलिस अधिकारी किंवा कर्मचाऱ्यांचा सहभाग आहे, याचा तपास केला जात आहे. दरम्यान, कारवाईनंतर काही पोलिस अधिकाऱ्यांनी मोबाइल फोन बंद केल्याची माहिती समोर आली आहे. मात्र, त्यांचा या लाच प्रकरणाशी संबंध आहे की नाही, हे तपासातून स्पष्ट होणार आहे.
लाच स्वीकारताना पकडलेला पोलिस कर्मचारी पाथर्डी पोलिस ठाण्यातील एका वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याच्या मर्जीतील असल्याची चर्चा पोलिस वर्तुळात आहे. मात्र, या कथित जवळिकीचा लाच प्रकरणातील संभाव्य सहभागाशी संबंध आहे का, याबाबत अद्याप अधिकृत माहिती समोर आलेली नाही. त्यामुळे ACBच्या पुढील तपासाकडे लक्ष लागले आहे.
विशेष म्हणजे, सुमारे तीन महिन्यांपूर्वीही पाथर्डी परिसरातील एका पोलिस कर्मचाऱ्यावर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने कारवाई केली होती. त्यानंतर पुन्हा एका पोलिस कर्मचाऱ्याला लाच स्वीकारताना पकडण्यात आल्याने पोलिस विभागाच्या कामकाजाबाबत प्रश्न उपस्थित झाले आहेत. दरम्यान, रात्री उशिरापर्यंत पाथर्डी पोलिस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. ACBच्या तपासानंतर या प्रकरणात आणखी कोणाची नावे समोर येतात का, याकडे लक्ष लागले आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.