Aam Aadmi Party MLA Dr. Amandeep Kaur Arora Sarkarnama
देश

खळबळजनक! महिला आमदाराच्या घरावर ED चा छापा; भाजप प्रवेश नाकारल्याने सूडबुद्धीने कारवाईचा आरोप!

ED raid on woman MLA amid BJP entry controversy : महिला आमदाराच्या घरावर ईडीने छापा टाकल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. भाजप प्रवेश नाकारल्यामुळे ही कारवाई झाल्याचा आरोप आहे का? जाणून घ्या सविस्तर माहिती.

Rashmi Mane

पंजाबच्या राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. आम आदमी पक्षाच्या महिला आमदार डॉ. अमनदीप कौर अरोरा यांच्या निवासस्थानी अंमलबजावणी संचालनालयाने (ED) छापा टाकला आहे. मोगा मतदारसंघाच्या आमदार असलेल्या अमनदीप कौर यांच्या घरावर झालेल्या या कारवाईमुळे पंजाबमधील राजकीय वातावरण तापले आहे. विशेष म्हणजे, भाजपमध्ये प्रवेश करण्यास नकार दिल्यामुळेच ही कारवाई करण्यात आल्याचा आरोप आम आदमी पक्षाच्या कार्यकर्त्यांनी केला आहे.

बुधवारी पहाटे 6 वाजण्याच्या सुमारास ईडीचे पथक मोगा येथे दाखल झाले. त्यानंतर आमदार अमनदीप कौर अरोरा यांच्या दोन निवासस्थानांची तपासणी सुरू करण्यात आली. गेल्या अनेक तासांपासून ईडीचे अधिकारी त्यांच्या घरी तपासणी करत असून, आमदारांची चौकशीही सुरू असल्याची माहिती आहे. मात्र, ईडीने नेमक्या कोणत्या प्रकरणाच्या अनुषंगाने ही छापेमारी केली, याबाबत अद्याप अधिकृत माहिती समोर आलेली नाही.

या कारवाईनंतर आम आदमी पक्षाने भाजपवर निशाणा साधला आहे. अमनदीप कौर यांनी भाजपमध्ये प्रवेश करण्यास नकार दिल्यामुळे केंद्रीय तपास यंत्रणांचा वापर करून त्यांच्यावर दबाव आणला जात असल्याचा आरोप आपच्या कार्यकर्त्यांनी केला आहे. या निषेधार्थ आमदारांच्या निवासस्थानाबाहेर कार्यकर्त्यांनी आंदोलन सुरू केले. त्यामुळे परिसरात राजकीय तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.

दरम्यान, पंजाबमध्ये यापूर्वीही ईडीच्या छापेमारीवरून राजकीय आरोप-प्रत्यारोप झाले आहेत. माजी कॅबिनेट मंत्री सुंदर शाम अरोरा यांच्या निवासस्थानी ईडीने यापूर्वी सुमारे 40 तास तपासणी केली होती. या कारवाईनंतर त्यांनी ईडीच्या पथकाला कोणताही दोषारोप करणारा पुरावा मिळाला नसल्याचा दावा केला होता. तसेच, कोणतेही नवीन दस्तऐवज किंवा रेकॉर्ड घेऊन अधिकारी गेले नसल्याचेही त्यांनी सांगितले होते.

आता डॉ. अमनदीप कौर अरोरा यांच्या घरावरील ईडीच्या छापेमारीमुळे पंजाबमधील राजकारण पुन्हा तापले आहे. 2027 च्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या कारवाईला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. भाजप प्रवेश नाकारल्यामुळेच छापा टाकण्यात आल्याचा आरोप कितपत खरा आहे आणि ईडीच्या तपासातून काय समोर येणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

SCROLL FOR NEXT