

Marathwadad Drought : एखाद्या आमदार, खासदार, मंत्र्याच्या घरचा विवाह सोहळा म्हणजे डोळे दिपवून टाकणारा समारंभ. सर्वपक्षीय राजकारण्यांची हजेरी, त्यांच्यासाठी पंच्चपक्वनांची रेलचेल, शाही शामियाना, संगीत, महागड्या भेट वस्तू आणि श्रीमंतीचे प्रदर्शन असेच चित्र पहायला मिळते. क्वचितच एखाद्या राजकारण्याच्या मुला-मुलीचा विवाह हा साध्या पद्धतीने केला जातो. विशेषतः मराठवाड्या सारख्या कायम दुष्काळाच्या सावटाखाली असलेल्या भागातील नेत्यांनी तरी किमान हा अनाठायी खर्च टाळावा आणि संवेदनशीलता दाखवावी, अशी अपेक्षा असते.
नाही म्हणायला, गोर-गरीबांच्या मुला-मुलीचे सामुहिक विवाह सोहळे आयोजित करून त्यांचे संसार उभे करण्यात काही राजकीय पक्ष आणि त्यांचे नेते, लोकप्रतिनिधी अग्रेसर असतात. पण वैयक्तिक कुटुंबातील विवाह समारंभ हे थाटात झाले पाहिजे, आपल्या प्रतिष्ठेला साजेसे असे असाच बऱ्याजदा अट्टाहास असतो. महाराष्ट्रात आणि राज्यात सध्या दुष्काळ आहे.
मराठवाड्यात तर भीषण परिस्थिती आहे, अशावेळी राज्याचे ओबीसी कल्याण मंत्री अतुल सावे यांनी एक आदर्श घालून दिला आहे.सावे यांचे धाकडे चिरंजीव अनुराग यांचा विवाह ईशा यांच्याशी येत्या २५ नोव्हेंबर रोजी होत आहे. दुष्काळाचे संकट आणि त्यामुळे मराठवाडा, राज्यातील शेतकरी, कष्टकरी, सर्वसामान्यांना होणारा त्रास यांची जाणीव ठेवत अतुल सावे यांनी आपल्या लाडक्या लेकाचे लग्न हे अत्यंत साधेपणाने करण्याचा निर्णय घेतला.
या विवाह सोहळ्यावर होणाऱ्या खर्चापोटीची रक्कम दुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठी मुख्यमंत्री सहायता निधीमध्ये देण्याचा निर्णय घेतला. संपूर्ण कुटुंबियांनी एकत्रितपणे हा निर्णय घेतल्याचे बोलले जाते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेत अतुल सावे, चिरंजीव अनुराग यांनी एक कोटी रुपयांचा धनादेश मुख्यमंत्री सहायता निधीसाठी त्यांच्याकडे सुपूर्द केला. सावे यांच्या या निर्णयाचे सर्वत्र स्वागत होत आहे. मुख्यमंत्री फडणवीस यांनीही सावे यांच्या या निर्णयाचे कौतुक केले.
विवाहावर होणाऱ्या खर्चात आपल्या उद्योगातील निधीची भर घालून सावे-मुळे परिवाराने शेतकरी बांधवांसाठी १ कोटींचा निधी देण्याचा निर्णय घेतला. सावे यांचे धाकटे चिरंजीव उद्योजक अनुराग यांचा विवाह छत्रपती संभाजीनगर येथील प्रतिष्ठित उद्योजक अजित मुळे यांची कन्या ईशा हिच्याशी २५ नोव्हेंबर रोजी होणार आहे. मराठवाडा आणि महाराष्ट्रावर दुष्काळाचे सावट असल्याने हा विवाह सोहळा अगदी साधेपणाने साजरा करण्याचा निर्णय सावे आणि मुळे या दोन्ही कुटुंबांनी घेतला आहे.
अतुल सावे यांनी या संदर्भात सोशल मिडियाच्या माध्यमातून आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. मराठवाड्यात, आपला शेतकरी बांधव शेतीच्या नुकसानीमुळे अत्यंत कठीण परिस्थितीचा सामना करत आहे. आपल्या महाराष्ट्र परिवारातील लाखो सदस्य संकटात असताना मोठा सोहळा साजरा करणे संयुक्तिक वाटले नाही.दिवंदत मोरेश्वर सावे साहेबांपासून आपला परिवार सामाजिक कार्यात आणि उद्योग क्षेत्रात अग्रेसर आहे. तसेच मुळे परिवारदेखील उद्योग क्षेत्रात अग्रणी आहेत.
दोन्ही कुटुंबांचा संपर्क मोठा आहे. परंपरेने संपर्कात असलेल्या हजारो लोकांना विवाहाच्या प्रसंगी सहभागी करण्याचे नियोजन होते. परंतु दुष्काळामुळे उद्भवलेल्या परिस्थितीमुळे दोन्ही परिवारांनी मिळून हा संवेदनशील निर्णय घेतला आहे. मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या नेतृत्वाखाली सरकार शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी विविध उपाययोजना करत आहे आणि त्या प्रयत्नांमध्ये आमचाही हा अल्पसा सहभाग असावा, यासाठी हा निधी समर्पित करण्यात आला असल्याचे म्हटले आहे.
मंत्री अतुल सावे हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे विश्वासू सहकारी म्हणून ओळखले जातात. मराठवाड्यातील दुष्काळाच्या बाबतीत ते किती संवेदनशील आहेत, हे सावे यांनी जवळून अनुभवले आहे. दुष्काळ जाहीर करण्यापुर्वी फडणवीस यांनी मराठवाड्याचा दौरा केला होता. या भागातील भीषण परिस्थिती पाहून फडणवीस यांनी मराठवाड्यातील सर्वच तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर करत मदतीची घोषणा केली होती.
दुष्काळात लोकप्रतिनिधी, मंत्री यांचे वागणे, बोलणे हे अत्यंत नम्र आणि संवेदनशील असले पाहिजे, असा मुख्यमंत्र्यांचा कामय आग्रह राहिला आहे. स्वतःच्या वाढदिवसालाही त्यांनी हार, तुरे, भेटवस्तूवर खर्च न करता दुष्काळग्रस्तांना मदत करण्याचे आवाहन केले होते. या पार्श्वभूमीवर सावे यांनी आपल्या धाकट्या मुलाचा विवाह साधेपणाने साजरा करण्याचा निर्णय घेतला.