ED raids  Sarkarnama
देश

ED Raids : गैरव्यवहार प्रकरणात ईडीची एकाचवेळी कारवाई : वरिष्ठ अधिकारी रडारवर, पहाटेच सहा ठिकाणी धाडसत्र; कर्नाटकात खळबळ

ED Raids On Karnataka Excise Department Additional Commissioner : बकारी विभागातील कथित गैरव्यवहार आणि उत्पन्नापेक्षा अधिक मालमत्ता प्रकरणात अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) बुधवारी (ता. २४) पहाटे छापे मारले.

सरकारनामा ब्युरो

ED Raids Y Manjunath Properties News : अबकारी विभागातील कथित गैरव्यवहार आणि उत्पन्नापेक्षा अधिक मालमत्ता प्रकरणाच्या चौकशीला वेग देताना अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) बुधवारी (ता. २४) पहाटे छापे मारले. अबकारी विभागाचे अतिरिक्त आयुक्त वाय. मंजुनाथ यांच्या निवासस्थानासह सहा ठिकाणी छापे टाकण्यात आले.

ईडीच्या विशेष पथकाने बेळगाव, बंगळूर, म्हैसूर आणि हासनसह सहा ठिकाणी बुधवारी छापे घातले. या कारवाईमध्ये मंजुनाथ यांच्या निकटवर्तीय अधिकाऱ्यांचाही समावेश आहे. मंजुनाथ यांच्या बंगळूर येथील अपार्टमेंटचीही तपासणी केली.

छापेमारीवेळी मंजुनाथ तेथे असल्याची माहिती आहे. तसेच म्हैसूर, आर्सिकेरे, बेळगाव जिल्ह्यातील अथणी तालुक्यातील ऐनापूर येथील त्यांच्या निकटवर्तीयांच्या घरांवर छापा घालून तपासणी केली. ईडीकडून जमिनी, बार आणि रेस्टॉरंट यांसारख्या मालमत्ता बेनामी नावाने खरेदी केल्याचा संशय व्यक्त केला जात असून, त्यासंदर्भातील कागदपत्रे आणि आर्थिक व्यवहारांची चौकशी सुरू आहे.

ईडीकडून याबाबत अजून अधिकृत तपशील घोषित करण्यात आला नाही. मात्र, तपासणी आणि चौकशी रात्री उशिरापर्यंत सुरू होती. तुमकूरचे अबकारी अधीक्षक (एसपी) सतीश कागळी यांच्या बेळगाव जिल्ह्यातील कागवाड तालुक्यातील ऐनापूर येथील घरावर ईडीच्या पथकाने छापा टाकला. त्याचबरोबर बेळगाव शहरातील श्रीनगर परिसरातील त्यांच्या निवासस्थानाचीही कसून तपासणी करण्यात आली. आर्थिक व्यवहार, मालमत्तेची कागदपत्रे आणि इतर महत्त्वाच्या नोंदींची छाननी करण्यात आल्याचे समजते.

अतिरिक्त आयुक्त वाय. मंजुनाथ यांचे निकटवर्तीय मानले जाणारे चिक्कोडी येथील अबकारी खात्याचे उपाधीक्षक विश्वनाथ गाणिगेर यांच्या बेळगावमधील बसव कॉलनी येथील निवासस्थानावरही ईडीने धाड टाकली. अधिकाऱ्यांनी अनेक तास तपासणी करत विविध कागदपत्रे आणि आर्थिक व्यवहारांची माहिती गोळा केली. सूत्रांच्या माहितीनुसार, लोकायुक्तांकडे नोंद असलेल्या उत्पन्नापेक्षा अधिक मालमत्ता (डीए) प्रकरणाच्या आधारे ईडीने ही कारवाई सुरू केली आहे.

ईडी छाप्याबाबत पूर्ण माहिती नाही. प्रसारमाध्यमातून माहिती कळाली आहे. पूर्ण माहिती येण्यापूर्वी यासंदर्भात बोलणे घाईचे ठरेल.
- सतीश जारकीहोळी, सार्वजनिक बांधकाम मंत्री
मंजुनाथ यांच्याविरुद्ध यापूर्वी विभागीय चौकशी झाली होती. सध्या त्यांच्यावर कोणते आरोप आहेत, त्याची माहिती नाही.
- आर. बी. तिम्मापूर, माजी अबकारी मंत्री

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT