New Delhi News: महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीनंतर केंद्रीय निवडणूक आयोगावर काँग्रेससह विरोधकांकडून शंका उपस्थित केली जात आहे. लोकसभेचे विरोधी पक्षनेते आणि काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांनी महाराष्ट्रात निवडणूक आयोग आणि भाजपनं संगनमतानं मतचोरी केल्याचा गंभीर आरोप केला होता. पण याचदरम्यान, आता केंद्रीय निवडणूक आयोगानं (Election Commission) मोठा निर्णय घेतला आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या पक्षाला लोकसभेला निवडणूक चिन्ह आणि उमेदवारांच्या नामसाधर्म्यामुळे मोठा फटका बसला होता. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या निकालावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात असतानाच केंद्रीय निवडणूक आयोगानं सर्वात मोठा निर्णय घेतला आहे.
केंद्रीय निवडणूक आयोगाने ईव्हीएमबाबत (EVM) नव्या मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आल्या आहेत. या नव्या नियमांची अंमलबजावणी आगामी बिहारच्या विधानसभा निवडणुकीपासून करण्यात येणार आहे. या नव्या गाईडलाईन्सनुसार आता ईव्हीएमवर उमेदवारांचे पहिल्यांदाच रंगीत फोटो दिसणार आहेत. याचसोबत ईव्हीएमवरच्या क्रमांकही आता आणखी स्पष्ट दिसतील याबाबत काळजी घेतली जाणार आहे.
निवडणूक आयोगाने जारी केलेल्या पत्रकानुसार, यापुढे आता ईव्हीएमवर निवडणुकीला उभे राहिलेल्या उमेदवारांचे रंगीत फोटो छापले जाणार आहेत. याचवेळी फोटोच्या तीन चतुर्थांश भागावर उमेदवाराचा चेहरा असणार आहे. यामागे निवडणुकीत उभा असलेला उमेदवार कोणता आहे हे अधिक स्पष्टपणे दिसण्यास मदत व्हावी हा हेतू असणार आहे.
केंद्रीय निवडणूक आयोगानं हा महत्त्वाचा बदल करताना निवडणूक नियमावली 1961 च्या नियम 49 ब अंतर्गत असलेल्या मार्गदर्शक सूचनांमध्ये संशोधन केले आहे. या संशोधनानंतर हा निर्णय पत्रकाद्वारे जाहीर केले आहेत. या निवडणूक आयोगाच्या या नव्या गाईडलाईन्सची अंमलबजावणी बिहारच्या विधानसभा निवडणुकीत केली जाणार आहे.
गेल्या वर्षी पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने 'तुतारी वाजवणारा माणूस' हे चिन्ह घेऊन 10 पैकी तब्बल 8 जागा जिंकल्या होत्या. मात्र या निवडणुकीत 'तुतारी' आणि 'पिपाणी' या चिन्हांमुळे पवारांच्या पक्षाला मोठा फटका सहन करावा लागला होता.
तसेच प्रतिस्पर्धी उमेदवाराशी नामसाधर्म्य असलेल्या अन्य उमेदवारांना उभे करण्याची रणनीती नेहमीच अनेक निवडणुकांमध्ये पाहायला मिळते. त्यामागे विरोधकांच्या मतांचं विभाजन करण्याचा डाव असतो. राजकीय पक्षांना त्यातही शरद पवारांच्या राष्ट्रवादी पक्षाला लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत मोठं नुकसान सहन करावं लागलं होतं.
सांगली जिल्ह्यातील तासगाव- कवठे महांकाळ मतदारसंघात राष्ट्रवादीच्या रोहित पाटील यांच्याविरोधात लढतानाच विरोधकांनी रोहित पाटील नावाने अन्य 3 अपक्ष उमेदवार उभे केले होते. तसेच जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर जागेवर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार रोहिणी एकनाथ खडसे यांच्यासह रोहिणी पंडित खडसे आणि रोहिणी गोकुळ खडसे या दोन महिलांनी अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढवली होती. त्याचा खडसेंना फटका बसला.
दिंडोरी लोकसभा निवडणुकीत असाच प्रकार घडला होता. या निवडणुकीत शरद पवार गटाने भास्कर भगरे गुरुजी यांना उमेदवारी दिली तर भाजपकडून डॉ. भारती पवार मैदानात होत्या. तिथे तिसरी पास असलेल्या बाबू भगरे या अपक्ष उमेदवाराने अर्ज दाखल केला होता. भास्कर भगरे हे गुरुजी किंवा सर नावाने लोकप्रिय आहेत. पण तिसरी पास बाबू भगरे यांनीही आपल्या नावासमोर अर्ज भरताना सर हे पदनाम लावले होते.
महत्त्वाची बाब म्हणजे बाबू भगरे यांनाही निवडणूक चिन्ह हे भास्कर भगरे यांच्या तुतारी या चिन्हाशी साधर्म्य असणारा तुतारी हेच चिन्ह मिळाले. मग काय कथित सुशिक्षित मतदारांचाही गोंधळ झाला. तब्बल 1 लाख 3 हजार मते या तिसरी पास भगरे गुरुजींनी घेतली. त्यामुळे शरद पवार गटाच्या भगरे गुरुजींना त्याचा फटका बसला. अर्थात राष्ट्रवादीचेच भगरे इथे निवडून आले पण नामसाधर्म्यामुळे त्यांचे मताधिक्य 1 लाखांनी कमी झाले. हे तिसरी पास भगरे गुरुजींनी मिळवले.
केंद्रीय निवडणूक आयोगाने ईव्हीएमबाबत नव्या मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आल्या आहेत. यामुळे लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत फटका बसलेल्या ईव्हीएम संबंधी मुद्द्यांवर आयोगानं महत्त्वाचा निर्णय घेतल्यानं आगामी स्थानिकच्या निवडणुकीत राजकीय पक्षांचं नुकसान टाळता येणं शक्य होणार आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.