Election Commission news : देशात SIR च्या मुद्द्यावरून रान पेटले आहे. विरोधी पक्षांकडून केंद्रीय निवडणूक आयोगाच्या कार्यपध्दतीवर गंभीर आरोप केले जात आहेत. निवडणूक आयुक्तांमधील मतभेद समोर आल्यानंतर त्याची तीव्रता वाढली असतानाच एका राज्याच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांनीच स्वेच्छानिवृत्तीचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे चर्चांना उधाण आले आहे.
ओडिशा राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी आर. संथाना गोपालन यांनी स्वेच्छानिवृत्तीसाठी अर्ज केला आहे. त्यांनी वैयक्तिक आणि आरोग्याच्या कारणास्तव हा निर्णय घेतल्याचे सांगितले जात आहे. राज्यात SIR प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर आठवडाभरातच त्यांनी बुधवारी स्वेच्छानिवृत्तीसाठी अर्ज दाखल केला. गोपालन हे ओडिशा केडरचे २००१ च्या तुकडीचे IAS अधिकारी आहेत.
गोपालन हे मुळचे तामिळनाडूचे असून नियमित सेवानिवृत्तीसाठी अद्याप १८ महिन्यांचा कालावधी शिल्लक आहेत. त्यानंतरही त्यांनी अचानक हा निर्णय घेतल्याने प्रशासनात चर्चेता विषय बनला आहे. ते मागील अनेक महिन्यांपासून राजीनामा देण्याच्या विचारात होते. मात्र, SIR प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत त्यांनी आपला निर्णय लांबविल्याचे सांगितले जाते.
ओडिशामध्ये २१ सप्टेंबर रोजीच मतदार यादी प्रसिध्द झाली आहे. या यादीवर प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या बिजू जनता दलासह काँग्रेसने आक्षेप घेतला आहे. मतदार यादीतून सुमारे १७ लाख नावे वगळण्यावर या पक्षांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. एकीकडे राज्यातील मतदार यादीवरून वाद सुरू असतानाच देशातही एसआयआर प्रक्रिया आणि निवडणूक आयोगावर गंभीर आरोप होत असताना गोपालन यांचा स्वेच्छानिवृत्तीचा निर्णय चर्चेत आला आहे.
गोपालन हे जुलै २०२४ पासून मुख्य निवडणूक अधिकारी आहेत. आतापर्यंत त्यांनी अनेक महत्वाच्या पदांवर काम केले आहे. दरम्यान, मागील तीन वर्षांत ओडिशा केडरमधील चार आयएएस आणि आयपीएस अधिकाऱ्यांनी स्वेच्छानिवृत्ती घेतली आहे. माजी मुख्यमंत्री नवीन पटनायक यांचे उत्तराधिकारी मानले जाणारे आयएएस अधिकारी व्ही. के. पांडियन यांच्यासह त्यांच्या पत्नी आयएएस अधिकारी सुजाता कार्तिकेयन यांनीही स्वेच्छानिवृत्ती घेतली आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.