farmer loses 5 lakh : राजस्थानमधून एक धक्कादायक आणि तितकीच अनोखी घटना समोर आली आहे. प्लॉट विकून मिळालेले तब्बल 5 लाख रुपये सुरक्षित ठेवण्यासाठी शेतकर्याने ते चक्क आपल्या शेतातील जमिनीत पुरून ठेवले. मात्र, पैसे नेमके कुठे पुरले होते, हेच तो विसरून गेला. तब्बल 1 वर्षानंतर पैसे शोधून काढण्यासाठी जमीन उकरली असता समोर आलेले दृश्य पाहून शेतकर्याच्या पायाखालची जमीनच सरकली
ही घटना राजस्थानमधील बालोत्रा जिल्ह्यातील असल्याचे समोर आले आहे. मांगीलाल मेघवाल या शेतकऱ्याने सुमारे वर्षभरापूर्वी आपल्या मालकीचा प्लॉट विकला होता. या व्यवहारातून त्याला 5 लाख रुपये रोख मिळाले होते. ही रक्कम घरात ठेवण्याऐवजी त्याने ती शेतात जमिनीत पुरून ठेवण्याचा निर्णय घेतला.
पैसे पुरल्यानंतर काही काळाने मांगीलाल यांना आपण रोकड नेमक्या कोणत्या ठिकाणी लपवली होती, याचाच विसर पडला. बराच काळ उलटल्यानंतर त्यांना जमिनीत पुरलेल्या पैशांची आठवण झाली. त्यानंतर त्यांनी शेतात पैसे शोधण्यास सुरुवात केली.
अखेर जमीन उकरून पैसे बाहेर काढण्यात आले. मात्र, नोटांची अवस्था पाहून शेतकऱ्याला मोठा धक्का बसला. जमिनीतील ओलावा आणि वाळवीमुळे नोटा मोठ्या प्रमाणात खराब झाल्या होत्या. वाळवीने नोटा कुरतडल्याने 5 लाख रुपयांची संपूर्ण रोकड जवळपास नष्ट झाली होती.
प्लॉट विकून मिळालेली कष्टाची कमाई अशा पद्धतीने वाया गेल्याने शेतकऱ्याचे मोठे आर्थिक नुकसान झाले. घरात किंवा शेतात रोख रक्कम लपवून ठेवण्यापेक्षा ती सुरक्षित ठिकाणी ठेवणे किती महत्त्वाचे आहे, हे या घटनेतून समोर आले आहे.
विसरभोळेपणा आणि चुकीच्या पद्धतीने पैसे जपून ठेवण्याची ही घटना सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. लाखो रुपयांची रोकड जमिनीत पुरण्याचा निर्णय शेतकऱ्याला चांगलाच महागात पडला असून, वर्षभरानंतर पैसे मिळाले खरे; मात्र ते वापरण्याच्या स्थितीतच राहिले नाहीत.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.