Nirmala Sitharaman Sarkarnama
देश

Video : आधी महाराष्ट्रात करून दाखवा मग बोला! अर्थमंत्री भडकल्या अन् नेत्याला धरलं धारेवर

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी मंगळवारी संसदेत अर्थसंकल्प सादर केला. त्यानंतर विरोधकांकडून मोदी सरकारवर टीका केली जात आहे.

सरकारनामा ब्युरो

नवी दिल्ली : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण (Nirmala Sitharaman ) यांनी मंगळवारी संसदेत अर्थसंकल्प सादर केला. त्यावर विरोधकांकडून टीकेचा भडिमार सुरू आहे. काँग्रेससह (Congress) इतर विरोधी पक्षाच्या नेत्यांनी मोदी सरकारवर निशाणा साधत या बजेटमध्ये शेतकरी, युवक, सर्वसामान्य, मजूरांसाठी काहीच नसल्याचे आरोप केले आहेत. काँग्रेसचे नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी केलेल्या आरोपांवर पत्रकार परिषदेत उत्तर देताना सीतारमण चांगल्याच भडकल्या. (Union Budget 2022)

बजेटमध्ये नोकरदार, मध्यवर्ग गरीब, युवक, शेतकरी आणि एमएसएमईसाठी काहीच नाही, असं ट्विट राहुल गांधी यांनी बजेट सादर झाल्यानंतर केलं आहे. त्यावर सीतारमण यांनी पत्रकार परिषदेत उत्तर दिलं. त्या म्हणाल्या, राहुल गांधी यांनी बजेटसंदर्भात ट्विटरवर बोलण्याआधी बजेट समजून घ्यायला हवे. देशातील सर्वात जुन्या राजकीय पक्षातील नेत्याने कोणताही होमवर्क न करता टिप्पणी केली आहे. त्यांनी उल्लेख केलेल्या प्रत्येकी घटकाबाबत मी घोषणा केल्या आहेत. केवळ ट्विटरवर काहीतरी टाकण्यासाठी बोलणं चुकीचे आहे. त्यांनी जी संकटात गेलेली अर्थव्यवस्था केली, ती मागील पाच वर्षांत मजबूत होत आहे.

बजेटवर बोलण्याआधी त्यांनी त्यांच्या राज्यांची चिंता करायला हवी, जिथे त्यांच्या पक्षाची सत्ता आहे. पंजाबमध्ये रोजगाराची काय स्थिती आहे. महाराष्ट्रात शेतकरी ठीक आहेत का? आजही महाराष्ट्रातील कापूस उत्पादक शेतकरी आत्महत्या करत आहेत. राहुल गांधी या आत्महत्या थांबवत आहेत का? त्यामुळे कोणत्याही विषयांवर बोलण्याआधी त्यांनी महाराष्ट्र (Maharashtra) आणि पंजाबमध्ये करून दाखवावं आणि मग बोलावं, असा सल्ला सीतारमण यांनी दिला.

दरम्यान, मागील दोन वर्षांत कोरोना (Covid 19) महामारीमुळे अनेकांवर आर्थिक संकट ओढावले आहे. अनेकांचे आर्थिक बजेट कोलमडत आहे. अशा स्थितीत मोदी सरकारकडून यावर्षी तरी सर्वसामान्यांना दिलासा मिळेल, अशी अपेक्षा होती. पण सीतारमण यांनी मंगळवारी अर्थसंकल्प सादर करताना सर्वसामान्यांची निराशा केली आहे. प्राप्तीकर (Income Tax) रचनेत यंदाही कोणताही बदल करण्यात आलेला नाही.

याचमुळे आज अर्थसंकल्प सादर केल्यानंतर माध्यमांशी बोलताना निर्मला सीतारमन यांनी सर्वसामान्य जनतेची माफी मागितली. त्या म्हणाल्या, अर्थसंकल्पात कररचनेत कोणताही बदल किंवा सर्वसामान्यांना कोणताही दिलासा देण्यात आलेला नाही त्याबद्दल मी देशवासियांची माफी मागते. मात्र लवरकरच अशी वेळ येईल जेव्हा कर-रचनेत बदल केला जाईल, त्यासाठी जनतेला थोडी वाट पहावी लागेल, असेही त्या म्हणाल्या.

मोदी सरकारकडून मागील आठ वर्षात सलग सहा वर्ष कररचनेत बदल केलेला नाही. सीतारमन यांचा हा चौथा अर्थसंकल्प आहे. सलग दुसऱ्या वर्षी त्यांनी पेपरलेस बजेट सादर केले. यामध्ये त्यांनी अनेक मोठ्या घोषणा केल्या आहेत. कररचनेत बदल केला नसला तरी आरपीआयकडून यावर्षी ब्लॉकचेन आणि इतर तंत्रज्ञानाचा वापर करून डिजिटल चलन जारी केले जाणार आहे. यामुळे अर्थव्यवस्थेला चालना मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. (Union Budget 2022 Live Updates)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT