H. D. Kumaraswamy Sarkarnama
देश

Electricity Theft Case : दिवाळीत घरावर विद्युत रोषणाईसाठी वीजचोरी करणे भोवले; माजी मुख्यमंत्र्यांना दंडाचा दणका

Vijaykumar Dudhale

Bangalore News : विजेची चोरी करून दीपावलीमध्ये घरावर विद्युत रोषणाई केल्याप्रकरणी कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री एच. डी. कुमारस्वामी यांना बंगळुरू इलेक्ट्रिसिटी सप्लाय कंपनी लिमिटेडच्या (बेस्कॉम) दक्षता पथकाने जोरदार दणका दिला आहे. वीज चोरीप्रकरणी कुमारस्वामी यांना ६८ हजार ५२६ रुपयांचा दंड आकारण्यात आला असून, त्यांनी तो भरलाही आहे. (Former CM of Karnataka fined Rs 68 thousand in electricity theft case)

दरम्यान, काँग्रेस सरकारच्या कारभाराविरोधात आवाज उठविल्याने राजकीय सूडबुद्धीने षडयंत्र रचत ही कारवाई करण्यात आली आहे, असा आरोप कुमारस्वामी यांनी केला आहे. हा माझ्यावर अन्याय आहे. तसेच दंडाची रक्कम आणि ‘एफआयआर’मध्ये अनेक त्रुटी आहेत, असा दावाही कुमारस्वामी यांनी केला.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

माजी मुख्यमंत्री कुमारस्वामी यांच्या बंगळुरूमधील जे. पी. नगर येथील निवासस्थानी विद्युत रोषणाई करण्यात आली होती. त्या विद्युत रोषणाईसाठी वीजचोरी करण्यात आल्याचा आरोप कुमारस्वामी यांच्यावर आहे. ही वीजचोरी बंगळुरू इलेक्ट्रिसिटी सप्लाय कंपनी लिमिटेडच्या (बेस्कॉम) सहायक कार्यकारी अभियंत्याने पकडली होती. त्यानंतर माजी मुख्यमंत्र्यांना ६८ हजार ५२६ रुपयांचा दंड करण्यात आला आहे.

कुमारस्वामी यांनी मात्र आपल्याविरोधात हे राजकीय षडयंत्र असल्याचा आरोप केला आहे. चाचणीसाठी वीज कंत्राटदाराने एक वायर काढली आणि ती वायर माझ्या घरासमोरील विजेच्या खांबाला जोडण्यात आली. मला जेव्हा हे कळाले, तेव्हा माझ्या कर्मचाऱ्यांना विजेच्या खांबावरून ती तार तोडून टाकण्यास सांगितले. विशेष म्हणजे हे विद्युत रोषणाई करताना किंवा बेस्कॉमकडून विजेची चाचणी करताना मी प्रत्यक्ष घरी उपस्थित नव्हतो. त्यावेळी मी माझ्या बिदडी येथील घरी होतो. मी घरी नसताना, माझ्या अपरोक्ष इलेक्ट्रिशियनने माझ्या नकळतपणे हे स्वतंत्रपणे काम केले आहे, असा खुलासा कुमारस्वामी यांनी बेस्कॉमला लिहिलेल्या पत्रात केला आहे.

वीजचोरी प्रकरणी माझ्याविरोधात जो एफआयआर नोंदविण्यात आलेला आहे. त्यामध्येही दोष असल्याचा दावा कुमारस्वामी यांनी केला आहे. बेस्कॉमच्या सहाय्यक कार्यकारी अभियंत्याने कुमारस्वामी यांच्या घरी वीजचोरी होत असल्याचे आपण स्वतः पाहिल्याचे म्हटले आहे. मात्र, तो सहाय्यक अभियंता सोशल मीडियावर व्हायरल झालेला इमारतीचा व्हिडिओ पाहून माझ्या इमारतीची पाहणी करण्यासाठी आला होता. याशिवाय दंडाची रक्कमही अन्यायकारक आहे. ग्राहक म्हणून माझी चिंता करणे आणि अन्यायाविरोधात बोलणे माझा हक्क आहे, असेही कुमारस्वामी यांनी म्हटले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT