Shivdeep Lande News : माजी पोलीस अधिकारी शिवदीप लांडे यांनी अखेर राजकीय आखाड्यात एन्ट्री घेतली आहे. बिहारमध्ये त्यांनी हिंद सेना नावाच्या राजकीय पक्षाची स्थापना केली आहे. या पक्षाच्या माध्यमातून ते वर्षाअखेरीस होणाऱ्या राज्य विधानसभेची निवडणुकही ते लढवणार आहेत. मूळचे महाराष्ट्रातील अकोल्यातील रहिवासी असलेल्या लांडे यांनी गतवर्षी स्वेच्छानिवृत्ती घेतली होती. पण आपण बिहार सोडून जाणार नाही, अशी घोषणा केली होती.
याबाबत बोलताना शिवदीप लांडे म्हणाले, बिहार विधानसभेच्या 243 जागांवर आमच्या पक्षाचा कोणीही उमेदवार असला तरी प्रत्येक मतदारसंघात शिवदीप लांडेच त्यांच्या रूपाने निवडणूक लढणार आहे. आमच्या पक्षाचे कार्यकर्ते संवेदनशील असतील आणि न्याय हा त्यांच्या कामाचा सिद्धांत असेल, या तत्वांचे पालन करणाऱ्यांनाच उमेदवारी दिली जाईल, असेही त्यांनी सांगितले.
बिहारमध्ये सामाजिक न्यायाचे राजकारण जातीवर आधारित आहे. तो खुल्या व मागास प्रवर्गात विखुरला गेला आहे. खुल्या प्रवर्गात राजपूत, वैश्य व भूमिहारांचे नेते तर मागास प्रवर्गात यादवांचे नेते आहेत. अतिमागास वर्गात कुर्मी, कुशवाह आहेत. दलितांत पासवान तर महादलितांत मुसहरांचे नेते आहेत. या राज्यात रोजगार व स्थलांतर तर मोठे मुद्दे आहेत, पण स्वातंत्र्याच्या 75 वर्षांनंतरही अनेक गावांत साध्या पिण्याच्या पाण्याचीही सोय नाही, अशीही खंत त्यांनी व्यक्त केली.
शिवदीप लांडे हे महाराष्ट्राचे माजी मंत्री तथा शिवसेनेचे पुरंदरचे आमदार विजय शिवतारे यांचे जावई आहेत. शिवतारे यांची एकुलती एक कन्या ममता यांच्याशी 2014 मध्ये शिवदीप यांचा विवाह झाला. आता त्यांना एक मुलगीही आहे. त्यामुळे सासऱ्यापाठोपाठ आता जावईही राजकारणात उतरला आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.