Belgaon News : प्रयागराज येथील कुंभमेळ्यात बुधवारी (ता.29) झालेल्या चेंगराचेंगरीत 30 जणांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. यामध्ये बेळगावच्या चार कुटुंबीयांतील सद्यस्यांचा समावेश आहे. ज्योती हत्तरवाठ (वय 50) व त्यांची मुलगी मेघा (वय-18, दोघीही रा. वडगाव, नाझर कॅम्प, बेळगाव), अरुण कोपर्डे (वय-68, शेट्टी गल्ली, बेळगाव) व महादेवी बावनूर (वय-48, रा. तिसरी गल्ली, शिवाजीनगर, बेळगाव) अशी नावे आहेत. ही चेंगराचेंगरीची घटना महाकुंभमेळ्यातील संगमघाटावर घडली.
उत्तर प्रदेशातील प्रयागराज संगमघाट येथे आयोजित महाकुंभमेळ्यात बुधवारी महाटे गर्दी उसळली होती. यावेळी झालेल्या पेंगराचेंगरीत काही भाविकांचा मृत्यू झाला. ज्यात बेळगावमधील चौघांचा समावेश आहे.
या घटनेत वडगाव, नाझर कॅम्पमधील माय-लेकीचा मृत्यू झाला असून मेघाच्या लग्नाचे स्वप्न अधुरे राहिल्याचे मेधाचे वडील दीपक हत्तरवाठ यांनी सांगितले. तर मेघाचे शिक्षण पदवीपर्यंत झाले असून या मार्चनंतर तिचे लग्न करायचे ठरवले होते. पण लग्नानंतर कुंभमेळ्याला जाता येणार नाही याच विचाराने पत्नी आणि मुलीला त्यांनी पाठवले होते. मात्र झालेल्या चेंगराचेंगरीमध्ये पत्नी ज्योतीसह मुलगी मेघाचा मृत्यू झाला.
शिवाजीनगर येथून प्रयागराजमधील कुंभमेळ्यासाठी गेलेल्या महादेवी भावनूर यांचा देखील चेंगराचेंगरीत दुर्दैवी मृत्यू झाला. त्यांच्या निधनामुळे कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून त्यांच्या मागे पती आणि दोन मुलगे आहेत. तर त्यांच्या जाण्याने शिवाजीनगर दुःखसागरात बुडाले असून भावनूर यांच्या कुटुंबीयांचे खासदार जगदीश शेट्टर, आमदार राजू सेठ, माजी आमदार अनिल बेनके आदिंनी सांत्वन केले.
महादेवी भावनूर या भाजप कार्यकर्त्या होत्या. त्या प्रयागराज (उत्तरप्रदेश) येथे कुंभमेळ्यात सहभागी होण्यासाठी गेल्या होत्या. पण तिसऱ्या दिवशी त्यांच्या मृत्यूची बातमी येऊन थडकली. भावनूर यांना दोन मुले असून कष्टाने त्यांनी उज्ज्वलनगर येथे कॅन्टिन चालवत मुलांना उच्चशिक्षण दिले आहे. यातील एक मुलगा बंगळूर व एक मुलगा मुंबई येथे खासगी कंपनीत नोकरीला आहेत.
याच घटनेत बेळगावमधील शेट्टी गल्लीतील अरूण कोपार्डे यांचा मृत्यू झाला आहे. ते सामाजिक कार्यात हातभार लावत असल्याने ते अनेकांच्या जवळ बनले होते. शिवणकाम करून उदरनिर्वाह करणारे कोपार्डे यांनी मुलांना शिवकले. तर भाजपमध्ये पूर्ण वेळ कार्यकर्ते म्हणून काम करताना समाजकार्याचे भान जपले होते. त्यांच्या जाण्याची बातमी पसरताच शेट्टी गल्लीत सन्नाटा पसरला होता. तर सध्या त्यांचा एक मुलगा इंडोनेशिया येथे नोकरीस असून दुसरा बेळगावमध्ये नोकरी करत आहे. कोपार्डे यांच्या जाण्याने दोन्ही मुलांना मानसिक धक्का बसला असून दोघा मुलांच्या लग्नाची तयारी कोपार्डे करत होते.
दरम्यान प्रयागराज येथील चेंगराचेंगरीत बेळगाव येथील चौघांचा मृत्यू झाल्याची बातमी समजतात मृतदेह आणण्यासाठी विशेष विमान करण्याची तयारी केली जात आहे. यासाठी जिल्हा प्रशासनाकडून आणि स्थानिक नेत्यांनी केंद्र सरकारशी संपर्क करत आहेत. तर याबाबत प्रयत्न सुरू असल्याचे जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी म्हटंल आहे.
तर या घटनेवरून मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी दु: ख व्यक्त केलं असून प्रयागराज येथील महाकुंभमेळ्यामध्ये बुधवारी पहाटे झालेल्या चेंगराचेंगरीमध्ये अनेकांचा मृत्यू झाल्याचे वृत्त ऐकून दुःख झाल्याचे म्हटलं आहे. तर जखमींना सुरक्षितपणे राज्यात आणण्यासाठी अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आल्याची माहिती देखील त्यांनी दिली आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.