INDIA Alliance Meeting Sarkarnama
देश

INDIA Alliance Meeting : 'इंडिया आघाडी'च्या बैठकीत मोठा निर्णय; भाजपविरोधात देशभरात जाहीर सभा घेण्यात येणार

Sharad Pawar : 'इंडिया आघाडी'च्या समन्वय समितीची शरद पवार यांच्या घरी महत्वाची बैठक झाली

Ganesh Thombare

Delhi News: आगामी निवडणुकीत मोदी-शाहांना धडा शिकवण्यासाठी विरोधकांनी जोरदार तयारी सुरु केली आहे. या पार्श्वभूमीवरच बुधवारी विरोधी पक्षाच्या 'इंडिया आघाडी'च्या समन्वय समितीची दिल्लीत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या घरी महत्वाची बैठक झाली. या बैठकीत 'इंडिया आघाडी'च्या आगामी रणनीतीला अंतिम स्वरूप देण्यासंदर्भात चर्चा झाली असून भाजपविरोधात देशभरात जाहीर सभा घेण्यात येणार आहेत.

आता 'इंडिया आघाडी'ची पुढची सभा ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात भोपाळमध्ये होणार असून वेगवेगळ्या ठिकाणी एकत्रित सभा घेण्यासंदर्भात देखील चर्चा होणार असल्याची माहिती काँग्रेस नेते के.सी.वेणुगोपाल यांनी पत्रकार परिषदेत दिली. यासोबतच पुढच्या बैठकीत जागा वाटपावर देखील चर्चा होण्याची शक्यता आहे.

याआधी 'इंडिया आघाडी'ची बिहार आणि बंगळुरुतील बैठकीनंतर मुंबईत तिसरी बैठक पार पडली होती. मुंबईतील बैठकीतच समन्वय समितीची घोषणा करण्यात आली होती. याच समन्वय समितीची पहिली बैठक बुधवारी दिल्लीत पार पडली. यावेळी जागा वाटपाबाबतची चर्चा लवकरच सुरू करण्याचा निश्चय करण्यात आला आहे.

भोपाळमध्ये होणाऱ्या बैठकीत सामूहिक कार्यक्रमाची रुपरेखा कशी असावी, निवडणूक आणि प्रचाराचा रोडमॅप कसा असावा, भाजपला प्रत्युत्तर देण्यासाठी अजेंडा कसा असावा यासह आदी मुद्द्यांवर चर्चा होणार आहे. आज झालेल्या बैठकीत प्रमुख चार मुद्द्यांवर चर्चा झाली असल्याची माहिती के.सी.वेणुगोपाल यांनी दिली.

  • कोणत्या मुद्द्यांवर चर्चा झाली ?

  • इंडिया आघाडातील सर्व पक्षांच्यावतीने एकत्रितरित्या देशातील विविध भागात सभा घेण्यात येणार आहेत.

  • जागा वाटपांची प्रक्रिया सुरु करण्यात यावी, यासंदर्भात आजच्या बैठकीत चर्चा झाली.

  • जागावाटपांबाबत आघाडीतील पक्षांनी चर्चा करुन लवकरात लवकर निर्णय घ्यावा.

  • जातनिहाय जनगणनेचा मुद्दा सर्व पक्षांनी अजेंड्यावर घ्यावा, यावर बैठकीत चर्चा झाली.

  • माध्यमांशी चर्चा करण्यासाठी 'इंडिया आघाडी'चा उपगट नेमण्यात येणार, यावर चर्चा झाली.

Edited by - Ganesh Thombare

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT