France Election : फ्रान्समध्ये निवडणुकीनंतर अभूतपूर्व स्थिती निर्माण झाली आहे. कोणत्याही पक्षाला बहुमताचा आकडा गाठता न आल्याने सत्तास्थापनेची कोंडी निर्माण झाली आहे.
निवडणुकीत फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांच्या पक्षाच्या जागा कमी झाल्या असून डाव्यांनी ऐतिहासिक मजल मारली आहे. विशेष म्हणजे या निवडणुकीत तीन आघाड्यांना मतदारांनी कौल दिला आहे.
डाव्या विचारसरणीच्या आघाडीला 577 पैकी 182 जागा मिळाल्या आहेत. तर राष्ट्राध्यक्षांच्या आघाडीला 168 आणि नॅशनल रॅली या विविध पक्षांच्या तिसऱ्या आघाडीला 143 जागांवर समाधान मानावे लागले आहे. बहुमतासाठी आवश्यक 289 जागांचा जादूई आकडा कोणत्याही आघाडीला गाठता आलेला नाही.
दोन टप्प्यांत झालेल्या निवडणुकीत प्रामुख्याने डाव्या आघाडीला मोठा फायदा झाला आहे. तसेच नॅशनल रॅलीच्या जागाही वाढल्या आहेत. सर्वाधिक फटका सत्ताधारी पक्षाला बसला आहे. मात्र, कोणत्याही पक्षाला बहुमत न मिळाल्याने आता निवडणुकीनंतरची आघाडी पाहायला मिळू शकते.
दोन आघाड्या एकत्रित आल्याशिवाय सत्तास्थापनेचा पेच सुटणार नाही. देशात पहिल्यांदाच अशी अभूतपूर्व स्थिती निर्माण झाल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे सर्व पक्ष मिळून यातून कसा मार्ग काढणार, याबाबत उत्सुकता वाढली आहे.
निवडणुकीचे निकाल जाहीर झाल्यानंतर फ्रान्समधील काही भागांत हिंसेच्या घटना समोर आल्या आहेत. आंदोलकांनी जाळपोळ केली असून पोलिसांनीही अश्रूधुराच्या नळकांड्या फोडत आंदोलकांना पांगवण्याचा प्रयत्न केला.
मॅक्रॉन यांच्या पक्षाला बहुमत मिळाले नसले तरी ते किंगमेकर ठरण्याची शक्यता आहे. त्यांना सोबत घेतल्याशिवाय डाव्या आणि उजव्या विचारसरणीच्या आघाडीला सत्तास्थापनेचा दावा करता येणार नाही. त्यामुळे मॅक्रॉन हे किंगमेकर ठरण्याची शक्यता आहे. आता ते कुणाची साथ देणार, याबाबतची उत्सुकता शिगेला पोहचली आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.