Mahakumbh 2025 Sarkarnama
देश

Mahakumbh 2025 Update : भाविकांसाठी धक्कादायक बातमी; गंगेतील पाणी ‘स्नाना’साठी योग्य नाही, केंद्रीय मंडळाकडूनच शिक्कामोर्तब

Central Pollution Control Board Report NGT Prayagraj News : प्रयागराजमधील नद्यांतील पाणी सर्वाधिक प्रदुषित असल्याचा दावा यापूर्वीही काही जणांनी केला आहे.

Rajanand More

New Delhi News : महाकुंभ मेळ्यात कोट्यवधी भाविक गंगा नदीमध्ये स्नान करण्यासाठी प्रयागराजमध्ये दाखल होत आहेत. या भाविकांसाठी धक्कादायक बातमी समोर आली आहे. महाकुंभमध्ये संगम किंवा विविध ठिकाणचे पाणी स्नानासाठी योग्य नसल्याचे केंद्रीय प्रदुषण नियंत्रण मंडळाच्या तपासणीमध्ये समोर आले आहे.

केंद्रीय मंडळाने सोमवारी राष्ट्रीय हरित लवादाकडे याबाबतचा अहवाल सुपूर्द केला आहे. एनजीटीचे अध्यक्ष न्यायमूर्ती प्रकाश श्रीवास्तव, न्यायिक सदस्य न्यायमूर्ती सुधीर अग्रवाल आणि विशेषज्ञ सदस्य ए. सेंथिल वे यांच्या खंडपीठासमोर याबाबत सुनावणी झाली. प्रामुख्याने प्रयागराजमधील गंगा आणि यमुना नद्यांमधील पाण्याबाबत केंद्रीय मंडळाने अहवाल दिला आहे.

अहवालात म्हटले आहे की, नदीतील पाण्यामध्ये ‘फेकल कोलीफॉर्म’चे प्रमाण अधिक आढळून आले आहे. हे प्रमाण स्नानासाठी आवश्यक जल गुणवत्तेपेक्षा अधिक आहे. महाकुंभमध्ये मोठ्या संख्येने लोक स्नान करत आहेत. मलमूत्र मोठ्या प्रमाणात नदीमध्ये येत आहे. त्यामुळे पाणी मोठ्या प्रमाणात प्रदुषित होत असल्याचे मंडळाने म्हटले आहे.

एनजीटीने उत्तर प्रदेशातील प्रदुषण नियंत्रण मंडळाच्या भूमिकेवरही नाराजी व्यक्त केली. नदीतील प्रदुषणाबाबत मंडळाला सविस्तर अहवाल सादर करण्यास सांगूनही त्याचे पालन करण्यात आले नाही. केवळ काही पाणी परीक्षणाचे अहवाल आणि त्यासोबत एक पत्र देण्यात आले, असे आयोगाने म्हटले. तसेच २८ जानेवारीच्या पत्रासोबतच्या कागदपत्रांची पडताळणी केल्यानंतरही पाणी प्रदुषित असल्याचे दिसून आल्याचे खंडपीठाने स्पष्ट केले.

एनजीटीने उत्तर प्रदेश सरकारच्या वकिलांना आपले म्हणणे सादर करण्यासाठी एक दिवसांची मुदतही दिली. उत्तर प्रदेश प्रदुषण मडळाचे सदस्य सचिव आणि प्रयागराजमध्ये गंगा नदीच्या पाण्याची गुणवत्ता कायम राखण्यासाठी जबाबदार असलेल्या संबंधित अधिकाऱ्यांनी 19 फेब्रुवारीला होणाऱ्या सुनावणीला डिजिटल पध्दतीने हजर राहण्याचे आदेशही खंडपीठाने दिले आहेत.   

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT