Bypolls in Gujarat : आगामी विधानसभा निवडणुकीत काँग्रेस भाजपचा पराभव करेल, असे चॅलेंज काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांनी लोकसभेत दिले होते. पण त्यानंतरच्या पहिल्याच परीक्षेत काँग्रेसला पराभवाचा सामना करावा लागला आहे. दोन विधानसभा मतदारसंघात झालेल्या पोटनिवडणुकीत काँग्रेस विजयापासून दूर राहिली. त्यानंतर मात्र पक्षात घमासान सुरू झाले असून राहुल गांधींच्या विश्वासू नेत्याने तडकाफडकी राजीनामा दिला आहे.
गुजरातमधील कडी या अनुसूचित जातीसाठी आरक्षित असलेल्या मतदारसंघात भाजपचे उमेदवार राजेंद्रकुमार छावडा यांनी काँग्रेसचे उमेदवार रमेशभाई छावडा यांचा 39 हजारांहून अधिक मतांनी पराभव केला आहे. तर विसावदार मतदारसंघात काँग्रेसचे उमेदवार नितीन रणपरिया हे थेट तिसऱ्या क्रमांकावर फेकले गेले.
काँग्रेसला केवळ 5 हजार 501 मते मिळाली असून 70 हजारांहून अधिक मतांनी पराभूत झाले आहेत. या मतदारसंघात आपचे गोपाल इटालिया विजयी झाले. तर दुसऱ्या क्रमांकावर भाजपचे उमेदवार किरीट पटेल राहिले. दोन्ही मतदारसंघात काँग्रेस यश न मिळाल्याने प्रदेशाध्यक्ष खासदार शक्तीसिंह गोहिल यांनी पदाचा राजीनामा दिला आहे.
गोहिल यांनी सोशल मीडियातून याबाबत माहिती दिली. गोहिल यांनी म्हटले आहे की, मी नेहमीच पक्षासाठी झोकून देत काम केले. पण आज दुर्दैवाने आज आपल्याला यश मिळाले नाही. आपण विसावदार आणि कडी पोटनिवडणूक हरलो आहोत. मला सातत्याने मिळालेल्या सहकार्याबद्दल सर्वांचे आभार मानतो.
मी पराभवाची नैतिक जबाबदारी स्वीकारून गुजरात काँग्रेस अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे. पक्षातील सर्व नेत्यांचे, बब्बर शेर कार्यकर्ते, शुभचिंतक, मीडिया आणि सहकार्य करणाऱ्या इतर सर्वांचे मी आभार मानतो. कोणत्याही पदापेक्षा पक्ष महत्वाचा, असे मी मानतो. काँग्रेसचा एक शिस्तबध्द सैनिक म्हणून मी निश्चितच काम करत राहीन, असे गोहिल यांनी पोस्टमध्ये म्हटले आहे.
दोन पोटनिवडणुकीतील पराभवानंतर गोहिल यांनी दिलेल्या राजीनाम्यामुळे चर्चांना उधाण आले आहे. मागील काही महिन्यांत काँग्रेसने विशेषत: राहुल गांधी यांनी गुजरातमध्ये अधिक लक्ष देण्यास सुरूवात केली आहे. पक्षाचे राष्ट्रीय अधिवेशनही गुजरातमध्ये झाले होते. तसेच राहुल यांचा दोनदा गुजरात दौराही झाला. यावेळी त्यांनी पक्षातील नेते व कार्यकर्त्यांना बब्बर शेर म्हणत त्यांच्यात उत्साह निर्माण करण्याचा प्रयत्न केला होता.
आपण वरातीतील घोड्याला रेसमध्ये पळवतो आणि रेसमधील घोड्याला वरातीत नाचवतो, असे विधानही राहुल यांनी केले होते. त्यामुळे पदाधिकारी बदलाच्या चर्चा सुरू झाल्या होत्या. त्यानुसार बदलही झाले होते. त्यातच दोन मतदारसंघात पराभव झाल्याने पक्षामध्ये पुन्हा गटबाजीला उधाण येण्याची चर्चा आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.