
Mamata Banerjee’s Strategy Continues to Overpower BJP : पश्चिम बंगालमध्ये पुढीलवर्षी विधानसभेची निवडणूक होणार आहे. त्याआधीच राज्यात कालीगंज विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीच्या निमित्ताने सर्व राजकीय पक्षांनी निवडणुकीचे रणशिंग फुंकले होते. सत्ताधारी तृणमूल काँग्रेस व मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यासह भाजप, काँग्रेस अन् डाव्या पक्षांनीही या निवडणुकीत विजयासाठी जोर लावला होता. पण ममतादीदींची जादू पुन्हा एकदा चालली आहे.
कालीगंज विधानसभेच्या पोटनिवडणुकीत टीएमसीच्या उमेदवार अलिफा अहमद यांनी भाजपचे उमेदवार आशिष घोष यांचा तब्बल 51 हजारांहून अधिक मतांनी पराभव केला आहे. तर काँग्रेस आणि डाव्यांनी एकत्रित येऊन त्यांच्या उमेदवाराला फारसा प्रभाव पाडता आला नाही. अलिफा यांना एक लाखांहून अधिक मते मिळाली आहेत.
टीएमसीचे आमदार नसिरुद्दीन अहमद यांच्या निधनामुळे या मतदारसंघात पोटनिवडणूक झाली. अलिफा या त्यांच्या कन्या आहेत. या मतदारसंघात जवळपास 52 टक्के मुस्लिम मते असून ग्रामीण भाग मोठ्या प्रमाणात आहे. या विजयामुळे ममतांचा अल्पसंख्यांक आणि ग्रामीण मतदारांमध्ये अजूनही करिष्मा असल्याचे सिध्द झाले आहे.
खुद्द ममता बॅनर्जी या निवडणुकीसाठी प्रचाराच्या मैदानात उतरल्या होत्या. त्यांनी स्थानिक विकास आणि राज्य सरकारच्या विविध कल्याणकारी योजनांवर जोर दिला होता. दुसरीकडे भाजपनेही विजयासाठी जोर लावला होता. घोष यांच्यासह भाजप नेत्यांनी प्रामुख्याने भ्रष्टाचार आणि गुन्हेगारीचा मुद्दा मांडला होता. पण त्याचा फारसा प्रभाव पडला नाही. हा विजय आगामी विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने भाजपसाठी आवश्यक होता. पण आता या पराभवामुळे भाजपची चिंता वाढली आहे.
निवडणुकीसाठी काँग्रेस व मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाने आघाडी केली होती. काबील उद्दीन शेख हा मुस्लिम चेहरा देत टीएमसी समोर आव्हान उभे करण्याचा प्रयत्न केला. पण त्यात आघाडीला यश आले नाही. आघाडीचे उमेदवार तिसऱ्या क्रमांकावर राहिले. 2024 च्या लोकसभा निवडणुकीत ममतांनी 29 जागांवर विजय मिळवत विरोधकांना धूळ चारली होती. तसेच त्यावेळी झालेल्या सहा पोटनिवडणुकींतही सर्व जागा जिंकल्या होत्या.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.