Manju Hooda, Bhupinder Singh Hooda Sarkarnama
देश

Manju Hooda : गँगस्टरची पत्नी, DSP ची लेक... माजी मुख्यमंत्र्यांसमोर भाजपच्या महिला उमेदवाराचं तगडं आव्हान

Bhupinder Singh Hooda Haryana Assembly Election 2024 : भूपिंदर सिंह हुडा हे मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीत आहेत. ते यापूर्वीही हरियाणाचे मुख्यमंत्री होते.

Rajanand More

Chandigarh : हरियाणामध्ये बहुतेक सर्वच पक्षांकडून विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारांची घोषणा केली जात आहे. काँग्रेसने माजी मुख्यमंत्री भूपिंदर सिंह हुडा यांना त्यांचा पारंपरिक मतदारसंघ असलेल्या गढी सांपला-किलोई मतदारसंघातून उमेदवारी दिली आहे. त्यांच्याविरोधात भाजपने मंजू हुडा यांना उमेदवारी देत तगडं आव्हान उभं केलं आहे.

मंजू हुडा यांना भाजपची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर चर्चांना उधाण आले आहे. यामागचे सर्वात मोठे कारण म्हणजे त्या एका गँगस्टरच्या पत्नी आहेत. तर त्यांचे वडील माजी पोलिस उपअधिक्षक आहेत. त्यांच्या उमेदवारीमुळे मतदारसंघात रंगत वाढल्याचे मानले जात आहे.

राजेश सरकारी हे मंजू यांचे पती आहेत. या दोघांचा प्रेमविवाह झाला आहे. राजेश हे रोहतकचे बाहुबली मानले जातात. त्यांच्याविरोधात राजस्थान, उत्तर प्रदेश आणि हरियाणामध्ये हत्या, हत्येचा प्रयत्न, अपहरण, लूटमार आदी गंभीर गुन्हे दाखल आहेत. त्यामुळे विरोधकांकडून मंजू यांच्याविरोधात हा मुद्दा प्रचारात उचलून धरला जाणार, हे निश्चित आहे.

मंजू या मागील काही वर्षांपासून राजकारणात सक्रीय आहेत. त्या सध्या रोहतक जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष आहेत. उमेदवारी जाहीर झाल्यानंतर त्या म्हणाल्या, जिल्हा परिषद अध्यक्ष असताना लोकांच्या हिताचे कामे केली आहेत. तिकीट मिळणे हे माझ्यासाठी आश्चर्य होते. कारण मी एका सामान्य कुटुंबातील आहे. निवडणुकीत विजय मिळेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

पतीने आपल्या कामात कधीही हस्तक्षेप केला नाही, असे सांगत मंजू म्हणाल्या, चुकीच्या गोष्टींविरोधात आवाज उठवण्यास पतीकडून शिकले. गुन्हेगारी त्यांचा भूतकाळ होता. कोणत्या परिस्थितीत व्यक्तीकडून काय होईल, हे सांगू शकत नाही. माझ्या पतीने कुणाचेही वाईट केलेले नाही. जनता त्यांना ओळखू लागेल, तेव्हा ते खूप वेगळे असल्याचे जाणवेल, असे कौतुक मंजू यांनी केले.  

भूपिंदर सिंह हूडा हे सध्या गढी सांपला-किलोई मतदारसंघाचेच आमदार आहेत. 2000 मध्ये ते पहिल्यांदा आमदार बनले. आतापर्यंत पाचवेळा ते याच मतदारसंघातून विजयी झाले आहेत. त्यामुळे हुडा यांचा हा गढ मानला जातो. मंजू यांनी मात्र आपल्यासमोर मोठे आव्हान नसल्याचे सांगितले. भूपिंदर हुडा काँग्रेसच्या माध्यमातून तर मी भाजपची उमेदवार म्हणून लोकांसमोर जाईल, असे त्या म्हणाल्या.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT