New Delhi : पॅरिस ऑलिम्पिकमध्ये केवळ 100 ग्रॅम वजन अधिक असल्यामुळे कुस्तीपटू विनेश फोगाटला सोनेरी डाव टाकता आला नाही. अनेक अडचणींचा सामना करत ती पॅरिसमध्ये दाखल झाली होती. पहिल्या लढतीपासून दाखवलेल्या जिद्दीने तिने देशाला कुस्तीत सोनेरी स्वप्न दाखवले. पण ते सत्यात उतरू शकले नाही. आता हरियाणाच्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला तरी सोनेरी दिवस आणणार का, याबाबत उत्सुकता वाढली आहे.
विनेश दोन दिवसांपूर्वी बजरंग पूनियासह काँग्रेसमध्ये दाखल झाली आणि काही तासांतच तिला पक्षाने उमेदवारीही दिली. जुलाना या मतदारसंघातून ती निवडणूक लढणार आहे. या मतदारसंघाचे वैशिष्ट्य म्हणजे तिचे सासर इथेच आहे. तसेच मागील 15 वर्षांपासून याठिकाणी काँग्रेसला विजय मिळालेला नाही.
काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यानंतर विनेशने जुलानामधील बक्ता खेडा या पतीच्या गावातून प्रचाराला सुरूवातही केली आहे. यावेळी सहा खाप पंचायत आणि राठी समाजाच्या खाप पंचायतींनी तिचे जोरदार स्वागत केले. जाट बहुल या मतदारसंघात नेहमीच जेजेपी आणि इनेलो या पक्षांचे वर्चस्व राहिले आहे. त्यामुळे या मतदारसंघात विजय मिळवणे विनेशसाठी आव्हानात्मक असणार आहे.
विनेशच्या उमेदवारीने जुलाना मतदारसंघाची निवडणूक प्रतिष्ठेची बनली आहे. 2009 आणि 2014 मध्ये इनेलो म्हणजेच भारतीय राष्ट्रीय लोकदल या पक्षे परमिंदर सिंह विजयी झाले होते. तर 2019 मध्ये जेजेपी म्हणजे जननायक जनता पार्टीचे अमरजीत ढांडा यांनी विजय खेचून आणला होता.
जेजेपीसाठी ही निवडणूक सोपी असणार नाही. अनेक नेत्यांनी पक्षाला रामराम ठोकला आहे. मात्र, काँग्रेसला याठिकाणी जोरदार टक्कर द्यावी लागणार आहे. याविषयी बोलताना विनेशचे सासरे राजपाल राठी म्हणाले, ‘विनेशसाठी राजकारण हे एक नवीन व्यासपीठ आहे. ती महत्वांच्या प्रश्नांवर लडू शकते.’ राठी यांनी मतदारसंघात प्रचाराला सुरुवातही केली आहे.
दिल्लीत कुस्तीपटूंच्या आंदोलनानंतर प्रामुख्याने हरियाणामध्ये शेतकरी संघटना व खाप पंचायतींनी कुस्तीपटूंना पाठिंबा दिला होता. विनेश पॅरिसहून परतल्यानंतरही तिचे जोरदार स्वागत झाले होते. त्यामुळे शेतकरी व खाप पंचायती तिच्या मागे उभ्या राहतील, अशी अपेक्षा काँग्रेसला आहे. त्याचे रुपांतर मतांमध्ये किती होणार आणि काँग्रेसला विजय मिळवून देणार का, हे लवकर समजेल.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.