Babita Phogat, Vinesh Phogat Sarkarnama
देश

Vinesh Phogat Won : बहिणीला जे जमलं नाही ते विनेशनं करून दाखवलं! विधानसभेत थाटात एन्ट्री

Haryana Assembly Election 2024 Results Congress : विनेश फोगाटची चुलत बहीण बबिता यांचा मागील निवडणुकीत पराभव झाला होता.

Rajanand More

Chandigarh News : हरियाणा विधानसभा निवडणुकीत भाजपने बहुमताचा आकडा पार करताना काँग्रेसला धूळ चारली आहे. पण पॅरिस ऑलिम्पिकमध्ये अपात्र ठरलेल्या कुस्तीपटू विनेश फोगाटला पराभूत करणे भाजपला जमले नाही. जे बहिणीला जमले नाही ते विनेशने एका झटक्यात करून दाखवलं आहे.

विनेश फोगाटचा जुलाना विधानसभात मतदारसंघातून दणदणीत विजय झाला आहे. तिने भाजपच्या उमेदवाराचा 6 हजारांहून अधिक मतांनी पराभव केला. मतमोजणीला सुरूवात झाल्यानंतर काही फेऱ्यांमध्ये ती मागे पडली होती. पण चार-पाच फेऱ्यांनंतर तिची आघाडी वाढत गेली आणि भाजपच्या योगेश कुमार यांच्यावर विजय मिळवला.

विनेशची बहीण बबिता फोगाटने 2019 मध्ये भाजपच्या तिकीटावर दादरी मतदारसंघातून निवडणूक लढवली होती. पण या निवडणुकीत तिचा दारूण पराभव झाला होता. यावेळी कुस्तीपटू योगेश्वर दत्तनेही भाजपकडून निवडणूक लढवली. पण त्याचाही पराभव झाला होता. पण विनेशने मात्र पहिल्याच फटक्यात विजय मिळवत कुस्तीपटू म्हणून विधानसभेत प्रवेश केला आहे.

विनेश फोगाटसाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची बनली होती. ऑलिम्पिकला जाण्यापूर्वी काही महिने आधी दिल्लीत कुस्तीपटूंचे आंदोलन झाले होते. यामध्ये विनेशचा पुढाकार होता. त्यानंतर काही महिन्यांतच झालेल्या ऑलिम्पिकमध्ये तिने अंतिम फेरीपर्यंत धडक मारली. पण वजन अधिक भरल्याने तिला अपात्र घोषित करण्यात आले.

या धक्क्यानंतर विनेशने कुस्तीतून निवृत्ती घेत राजकारणात एन्ट्री केली. काँग्रेसने जुलानामधून तिला तिकीट दिले. निवडणुकीच्या प्रचारादरम्यान विनेशने आंदोलनाचा मुद्दा उपस्थित केला. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदींवरही निशाणा साधला होता. ही निवडणूक तिच्या अस्तित्वाची बनली होती. त्यात तिने बाजी मारली आहे.

काँग्रेसलाही दिलासा

विनेश फोगाट यांची उमेदवारी काँग्रेससाठीही महत्वाची होती. राज्यातील कुस्तीपटूंचे प्रश्न या निवडणुकीत काँग्रेसने ऐरणीवर आणले होते. पण राज्यात त्याचा फारसा प्रभाव पडला नाही. असे असले तरी विनेशच्या रुपाने कुस्तीपटूंचे प्रतिनिधित्व काँग्रेसला विधानसभेत करता येणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT