New Delhi : हरियाणामध्ये विधानसभा निवडणुकीसाठी सर्वच पक्षांकडून उमेदवारांच्या निवडीसाठी बैठकांचे सत्र सुरू आहे. अशातच कुस्तीत पॅरिस ऑलिम्पिक गाजवणाऱ्या विनेश फोगाटने बुधवारी काँग्रेसचे नेते राहुल गांधींची भेट घेतल्याने चर्चांना उधाण आले आहे. फोगाटसोबत कुस्तीपटू बजरंग पुनियाही उपस्थित असल्याने या पहिलवानांना सोबत घेत राहुल गांधी कोणता डाव टाकणार, याबाबत उत्सुकता वाढली आहे.
हरियाणामध्ये पुढील महिन्याच्या पहिल्या आठवड्यात मतदान होणार आहे. राज्यात सध्या भाजपची सत्ता आहे. काँग्रेसने पुन्हा सत्ता काबीज करण्यासाठी ताकद लावली आहे. त्यासाठी विनेश आणि बजरंग या दोघांना पक्षाकडून उमेदवारी दिली जाणार असल्याची चर्चा रंगली आहे. यापार्श्वभूमीवर दोघांनी राहुल यांची घेतली भेट महत्वाची मानली जात आहे.
पॅरिस ऑलिम्पिकच्या काही महिने आधी कुस्तीपटूंनी दिल्लीत भाजपचे तत्कालीन खासदार बृजभूषण सिंह यांच्याविरोधात आंदोलन केले होते. त्यामध्ये विनेश आणि बजरंग हे दोघेही होते. या आंदोलनाने संपूर्ण देशाचे लक्ष वेधून घेतले होते. ऑलिम्पिकमध्ये विनेश अंतिम फेरीपर्यंत पोहचली होती. मात्र १०० ग्रॅम वजन अधिक असल्याने तिला स्पर्धेतून बाद करण्यात आले. या प्रकारामुळे देशभरात तिच्याविषयी सहानुभूतीची लाट पसरली.
विनेशचे हरियाणात जोरदार स्वागत करण्यात आले. यावेळी काँग्रेसचे खासदार दीपेंदर सिंह हुडा रॅलीत सहभागी झाले होते. तेव्हापासूनच विनेश राजकारणाच्या रिंगणात उतरणार असल्याचे संकेत मिळू लागले होते. आता काँग्रेसकडून उमेदवारांची नावे अंतिम करण्यासाठी बैठका घेतल्या जात असतानाच राहुल यांची भेट घेतल्याने त्यांची उमेदवारी फायनल झाल्याचे मानले जात आहे.
विनेशला दादरी मतदारसंघातून तिकीट दिले जाऊ शकते. तर पूनिया हे बादली मतदारसंघातून तिकीट मागत आहे. मात्र, पक्षाकडून त्यांना जाटबहुल मतदारसंघातून उतरवण्याची शक्यता आहे. विनेश राजकारणात सक्रीय झाल्यास काँग्रेसला निवडणुकीत त्याचा फायदा होऊ शकते, अशी दावा नेत्यांकडून केला जात आहे.
विनेशने राजकारणात उडी घेतल्यास खाप पंचायत आणि शेतकऱ्यांचा मोठा प्रतिसाद मिळू शकतो. त्यामुळे तिची भूमिका महत्वाची मानली जात आहे. पॅरिसमधून भारतात परतल्यानंतर खाप पंचायतने विनेशचा सुवर्ण पदक देऊन सन्मान केला होता. दिल्लीतील आंदोलनावेळी शेतकऱ्यांनी पाठिंबा दिला होता.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.