Supreme Court Sarkarnama
देश

Supreme Court: सुप्रीम कोर्टात जोरदार ड्रामा! सरन्यायाधिशांनाच वकील म्हणाला, "तुम्ही या खुर्चीत बसायला लायक नाहीत"; नेमकं काय घडलं?

Supreme Court: आरोपी वकिलानं आपल्या प्रकरणाची तात्काळ सुनावणीची मागणी करत खंडपीठाला म्हटलं की, त्याचं प्रकरण २ नोव्हेंबर रोजी सरन्यायाधिशांच्या कार्यालयाकडं सोपवलं होतं. पण १५ दिवसांनंतरही त्यावर त्यांनी कुठलंही उत्तर दिलेलं नाही.

Amit Ujagare

Supreme Court: सुप्रीम कोर्टातील कोर्टरुम नंबर १ म्हणजे देशाचे सरन्यायाधीश न्या. सूर्यकांत यांच्या कोर्टात आज मोठा ड्रामा पाहायला मिळाला. सरन्यायाधिशांसमोर हजर झालेला एक वकील त्यांच्यावर भडकला आणि त्यांना बेईमान असं संबोधलं. सरन्यायाधिशांनी त्याच्या खटल्यावर तातडीनं सुनावणी घेण्यास नकार दिल्यानं त्यानं त्यांच्या कोर्टातच ड्रामा केला. तुम्ही सरन्यायाधिशांच्या खुर्चीवर बसण्यास लायक नाहीत, तुम्ही प्रामाणिक नाहीत, अशा शब्दांत त्यानं सरन्यायाधिशांवर आरोपही केला.

सुप्रीम कोर्टात जेव्हा हा ड्रामा झाला तेव्हा संबंधित वकीलानं आपला खटला अत्यंत महत्वाचा असून त्याची तातडीनं सुनावणी घेण्यात यावी अशी मागणी केली. यासाठी सुरुवातीलाच त्यानं कोर्टाची माफी देखील मागितली होती. जेव्हा हा ड्रामा झाला तेव्हा सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्यासह न्या. जॉयमाल्या बागची आणि न्या. व्ही मोहना हे पीठासनावर बसले होते.

वकिलानं कोर्टात नेमकं काय म्हटलं?

लाईव्ह लॉ या वेबसाईटच्या वृत्तानुसार, आरोपी वकिलानं आपल्या प्रकरणाची तातडीनं सुनावणी घेण्याची मागणी केली होती. यावेळी त्यानं खंडपीठाला सांगितलं की, आपलं प्रकरण २ नोव्हेंबर रोजी सरन्यायाधिशांच्या कार्यालयाकडं पाठवण्यात आलं होतं. पण १५ दिवसानंतरही त्यावर आपल्याला काहीही उत्तर मिळालं नाही. त्यामुळं मला आज या कोर्टासमोर यावं लागलं. पण सुरुवातीलाच या वकिलानं खटल्यासाठीची योग्य प्रक्रिया पार न पाडताच दुपारी २ वाजता या प्रकरणी माफी मागितली. तसंच आपण एका आपत्कालीन परिस्थितीमुळं असं करत असल्याचं म्हटलं.

न्या. मोहना यांच्या हस्तक्षेपानंतर वकील भडकला

दरम्यान, न्या. व्ही मोहना यांनी वकिलाला म्हटलं की, तुम्ही अशा प्रकारे आपलं म्हणणं कोर्टात मांडू शकत नाही. नाही मी इथं एका आपत्कालीन परिस्थितीमुळं आलो आहे. मी सर्वात आधी माफी मागू इच्छितो. कृपया तुम्ही सर्वांनी ही कागदपत्रे पाहावीत. यावर सरन्यायाधिशांनी त्या वकिलाला तुम्ही थोड्यावेळ वाट पाहा असं सांगितलं आणि आम्ही ते पाहतो पण थोडावेळ बसा असं सांगितलं. सरन्यायाधिसांच्या या विधानावर वकिल भडकला आणि त्यानं सरन्यायाधिशांविरोधात व्यक्तिगत टिप्पणी केली. त्यानं म्हटलं की, मी वाट पाहणार नाही. तुम्ही या खुर्चीवर बसू शकत नाही. तुम्ही याच्या लायक नाहीत. तुमच्याकडं सरन्यायाधिशांच्या खुर्चीत बसण्याइतकी प्रामाणिकता नाही.

इतर दोन न्यायाधिशांचा सन्मान करतो

दरम्यान, सुत्रांच्या माहितीनुसार, वकिलानं पुढे असंही म्हटलं की, मी सरन्यायाधिशांसोबत बसलेल्या न्या. बागची आणि न्या. मोहना यांचा सन्मान करतो, पण सरन्यायाधिशांना या पदासाठी लायक मानत नाही. या ड्राम्यानंतर कोर्टातील कॅमेरे बंद करण्यात आले. त्यानंतर कोर्टातील उपस्थित वकिलांच्या माहितीनुसार, संबंधित वकिलाला तिथल्या सुरक्षा रक्षक जबरदस्तीनं बाहेर काढण्यात आलं. कोर्टात हजर वकिलांनी या वकिलावर कडक कारवाई करण्याची शिफारही केली. पण ड्रामा करणारा वकील हा त्याच्याविरोधातील अवमानकारक प्रकरणावरुन चिंताग्रस्त होता.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT