

Shivsena UBT Answer to Amit Shah: पुणे जिल्हा परिषदेत आज दिवंगत नेते अजित पवार यांच्या पुतळ्याचं आणि प्रवेशद्वाराचा नामकरण सोहळा पार पडला. यावेळी अमित शहा यांनी अजितदादांचं कौतुक करताना उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला. ठाकरेंच्या कोविड काळातील कामावरच त्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केल्यानं आता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आक्रमक झाला आहे. पक्षाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी अमित शहांना जोरदार प्रत्युत्तर दिलं असून अजित पवारांना तुम्ही कसा त्रास दिला आणि ठाकरेंच्या नेतृत्वाखाली कोविड काळात महाराष्ट्राची स्थिती नेमकी कशी होती? याची आठवणही करुन दिली.
एका व्हिडिओ संदेशाद्वारे सुषमा अंधारे यांनी अमित शहांना प्रत्युत्तर देताना म्हटलं की, "व्यासपीठ कुठलंही असो पण महाराष्ट्रात येऊन जर बोलायचं असेल तर ठाकरेंचं नाव घ्यावंच लागतं. त्यामुळं ठाकरेंच जर नाव घेतलं नाही तर राष्ट्रीय बातमी होणार नाही, हे भाजपच्या नेत्यांना चांगलच माहिती आहे. त्यामुळं बारामतीत येऊन अजित पवारांच्या स्मारकाचं लोकार्पण करताना गरज नसताना त्यांनी उद्धव ठाकरेंवर टीका केली. पण अमित शहा यांना हे माहिती आहे की नाही, मुंबईचा सर्वाधिक लोकसंख्येचा जो भाग आहे तो धारावी आहे.
या धारावीतच कोरोना काळात सर्वात यशस्वी पॅटर्न बनला ज्याला 'कोरोनाचा धारावी पॅटर्न' संबोधलं गेलं. या धारावी पॅटर्नचं केवळ भारतातच नव्हे तर जगात कौतुक केलं गेलं. उद्धव ठाकरेंनी कोरोनाच्या काळात जे नियोजन केलं, जो कार्यक्रम आखला आणि त्याची अंमलबजावणी केली, याचं केवळ भारत सरकारनंच नाही तर जागतिक आरोग्य संघटनेनं कौतुक केलं होतं. अमित शहा तुमच्या गुजरातमध्ये कोरोना काळात मृतदेह रस्त्यावर आणून जाळले गेले तसा गैरप्रकार महाराष्ट्रातील कुठल्याही मृतदेहासोबत झाला नाही, हे उद्धव ठाकरेंचं काम होतं"
आता मला तुम्हाला हे विचारायचं आहे की, तुमच्यात आणि अजितदादांमध्ये काय साम्य होतं? अजितदादा तुमच्यासारखे धर्मांध नव्हते, तुमच्यासारखे तडीपार नव्हते किंवा अजितदादांच्या कपड्यांवर धर्मांध दंगलखोरांसारखे कोणाच्याही रक्ताचे डाग नव्हते. पण तरीही तुमच्यामध्ये आणि अजितदादांमध्ये काही साम्य असेलच तर ते फक्त इतकंच होतं की, अजितदादा यांच्यावर ७०,००० कोटी रुपयांचा आरोप लावून त्यांच्यावर राजकीय दबाव टाकून त्यांच्या पक्षाला आत्मसमर्पण कण्यास तुम्ही भाग पाडलं, केवळ एवढंच अजितदादांचं आणि तुमचं कनेक्शन आहे कृपया आपण या गोष्टीचं भान ठेवावं, अशा शब्दांत सुषमा अंधारे यांनी अमित शहांवर टीकास्त्र सोडलं.
अमित शहा म्हणाले की, "आता अजितदादा आपल्यात नाहीत पण महाराष्ट्राच्या जनतेला मी एक गोष्ट सांगू इच्छितो की, कोविड आला होता तेव्हा दादा सरकारमध्ये होते. तेव्हा भीषण संकटाचा काळ होता. विशेषतः दुसरी जी लाट आली तेव्हा ऑक्सिजनची कमी होती. त्याचवेळी दुसरीकडं लसीकरणही करायचं होतं. कुठलीही औषधं उपलब्ध नव्हती. गृहमंत्रालयाकडं आपत्ती निवारण्याचं काम येतं, त्यामुळं मी प्रत्येक राज्याच्या मुख्यमंत्र्यासोबत बोलायचो, महाराष्ट्रात मुख्यमंत्र्यांशी त्यावेळीही संपर्क होत नव्हता जे तेव्हा मुख्यमंत्री होते.
पण त्यावेळी मी मंत्रालयात फोन करायचो तर दादा सकाळी ७ वाजता फोन उचलायचे. त्यावेळी अजितदादा सकाळी सात वाजता मंत्रालयात हजर असायचे. लँड लाईनवरुन जेव्हा उत्तर यायचं तेव्हा मला आश्चर्य वाटायचं की, जेव्हा मंत्रलयात कोणीही हजर राहण्याची वेळ नसते तेव्हा ही व्यक्ती सकाळी ७ वाजता ८ वाजता मंत्रालयात उपलब्ध असायची आणि फोनला उत्तर द्यायची त्यानंतर दुपारी बारावाजेपर्यंत मेल यायचा की, सर्व प्रकारची व्यवस्था झाली असून आता लवकरात लवकर आमच्या ऑक्सिजनची व्यवस्था करावी. लोकांप्रती अशी आस्था खूप कमी पाहायला मिळते"
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.