Pune Engineer Heramb Karmarkar Dies : इराण आणि अमेरिकीत सुरू असलेल्या संघर्षाचे चटते संपूर्ण जगाला सहन करावे लागत आहेत. तर आता संघर्षाची झळ थेट पुण्यातील एका कुटुंबाला बसली आहे. कारण होर्मुझ सामुद्रधुनीत व्यापारी जहाजावर झालेल्या हल्ल्यात पुण्यातील मर्चंट नेव्हीतील अभियंता हेरंब करमरकर यांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे.
या घटनेमुळे करमरकर कुटुंबीयांसह पुणे शहरात हळहळ व्यक्त केली जात आहे. हेरंब करमरकर हे मर्चंट नेव्हीमध्ये अभियंता म्हणून कार्यरत होते. ते एम.व्ही. जीएफएस गॅलेक्सी या व्यापारी जहाजावर कार्यरत होते. हे जहाज ओमानच्या सागरी हद्दीतून होर्मुझ सामुद्रधुनी परिसरातून प्रवास करत असताना रविवारी पहाटे सुमारे ३.३० वाजण्याच्या सुमारास त्यावर हल्ला झाला.
या जहाजावर एकूण २४ कर्मचारी होते. हल्ल्यानंतर बचाव पथकांनी तत्काळ मदतकार्य सुरू केले. त्यामध्ये २३ कर्मचाऱ्यांची सुखरूप सुटका करण्यात आली. मात्र, हेरंब करमरकर यांचा या हल्ल्यात मृत्यू झाला.
हल्ल्याच्या काही मिनिटांपूर्वीच हेरंब यांनी आपल्या कुटुंबीयांशी फोनवरून संवाद साधला होता. रात्री २.५० वाजता त्यांनी कुटुंबीयांशी शेवटचे बोलणे केले. त्यानंतर अवघ्या काही वेळात जहाजावर हल्ला झाला.
त्यामुळे त्यांच्या शेवटच्या संभाषणाची आठवण कुटुंबीयांसाठी अधिकच वेदनादायी ठरली आहे. या घटनेची माहिती काल हेरंब करमरकर यांचे नातेवाईक रविंद्र टंडन यांना अधिकृतपणे देण्यात आली. या वृत्तानंतर करमरकर कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
दरम्यान, हेरंब करमरकर यांचा मृतदेह ओमानच्या ताब्यात असून पोस्टमॉर्टम केल्यानंतर तो हेरंब ज्या गॅलेक्सी नौकेवर काम करत होते त्या नौकेच्या कंपनीकडे सोपविण्यात येणार आहे. त्यानंतर तो अंत्यसंस्कारांसाठी पुण्यात आणण्यात येणार असल्याची माहिती आता समोर आली आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.