Jagdeep Dhankhar, Mallikarjun Kharge Sarkarnama
देश

Jagdeep Dhankhad : विरोधकांनी कितीही आदळआपट केली तरी धनखड सुरक्षित; 3 सप्टेंबरनंतर भाजप बहुमतात...

Rajya Sabha India Alliance Impeachment Process : राज्यसभेत झालेल्या गदारोळानंतर इंडिया आघाडीने सभापती जगदीप धनखड यांना पदावरून हटवण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत.  

Rajanand More

New Delhi : राज्यसभेत सभापती जगदीप धनखड आणि समाजवादी पक्षाच्या खासदार जया बच्चन यांच्यातील वाद आता टोकाला गेला आहे. विरोधकांनी धनखड यांना थेट पदावरून हटवण्यासाठी त्यांच्याविरोधात महाभियोग प्रस्ताव आणण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. पण विरोधकांनी कितीही आदळआपट केली तरी धनखड यांचे पद सुरक्षित राहणार आहेत.

धनखड यांना पदावरून हटवण्यासाठी इंडिया आघाडीच्या 87 खासदारांची सहमती असल्याचे सांगितले जात आहे. आघाडीतून प्रस्ताव दाखल केल्यास भारताच्या इतिहासात पहिल्यांदाच उपराष्ट्रपतींना हटवण्यासाठी सभागृहात मतदान होईल. उपराष्ट्रपती हेच राज्यसभेचे सभापती असतात. त्यामुळे हा प्रस्ताव उपराष्ट्रपतींना पदावरून हटवण्यासाठी असेल.

संविधानात काय आहे तरतूद?

संविधानातील तरतुदीनुसार उपराष्ट्रपती हेच राज्यसभेचे पदसिध्द सभापती असतात. त्यामुळे सभापतींना पदावून तेव्हाच हटवले जाऊ शकते, जेव्हा उपराष्ट्रपतींना हटवले जाईल. संविधानातील कलम 67 नुसार उपराष्ट्रपतींची नियुक्ती व त्यांना हटविण्याचे नियम आहेत. त्यानुसार प्रस्ताव सादर करण्यापूर्वी 14 दिवस आधी नोटीस द्यावी लागते. प्रस्ताव विचाराधीन असताना सभापती म्हणून काम करता येत नाही. प्रस्तावावर आधी राज्यसभेत आणि नंतर लोकसभेत मतदान होते.

संसदेत खासदारांची आकडेवारी काय सांगते?

राज्यसभेसह लोकसभेतही एनडीएचे संख्याबळ इंडिया आघाडीपेक्षा जास्त आहे. त्यामुळे इंडिया आघाडीने महाभियोगचा प्रस्ताव दाखल केला तरी धनखड यांना कसलाही धोका नाही. राज्यसभेतच हा प्रस्ताव पारित होणार नाही. या वरिष्ठ सभागृहात एनडीएकडे 110 तर आघाडीकडे 87 सदस्य आहेत. वायएसआर काँग्रेस आणि बीजेडीचे सदस्य आघाडीकडे आले तरी हे संख्याबळ 106 होते. येत्या 3 सप्टेंबरला 12 जागांसाठी तमदान होणार आहे. त्यापैकी किमान दहा जागा भाजपला मिळू शकतात. त्यानंतर राज्यसभेतही एनडीएकडे निर्विवाद बहुमत असणार आहे.

राजकीय डाव

धनखड यांच्याविरोधात राज्यसभेत प्रस्ताव आणून विरोधकांकडून राजकीय डाव टाकला जाण्याची शक्यता आहे. हा प्रस्ताव मंजूर झाला नाही तरी सरकारविरोधात वातावरणनिर्मिती करण्याचा प्रयत्न असू शकतो, असे राजकीय विश्लेषक मानतात. विरोधकांना सभागृहात बोलू दिले जात नसल्याचा आरोप धनखड यांच्यावर केला जात आहे. वायएसआर काँग्रेस आणि बीजेडी यांसह सर्व विरोधी पक्ष एकत्र असल्याचे दाखविण्याचाही हा प्रयत्न असल्याचे सांगितले जात आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT