Vidhnsabha Election Result : पुढील वर्षी होणाऱ्या लोकसभा निवडणुकीची सेमी फायनल म्हणून पाहिले जात असलेल्या पाच राज्यांतील राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगड, तेलंगणा आणि मिझोरम विधानसभेची मतमोजणी रविवारी (3 डिसेंबर) होणार आहे. त्यापूर्वी अनेक संस्थांचे मतदानोत्तर चाचण्यांचे (एक्झिट पोल) निष्कर्ष जाहीर केले. परंतु, एक्झिट पोलचा हा अनुभव पाहिला, तर त्यामध्ये आकडेवारी चुकीची निघाली.
पाच राज्यांत 2018 मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत एक्झिट पोलची सरासरी मध्य प्रदेश आणि राजस्थानमध्ये निकालाच्या जवळपास जाणारी दिसत होती, तर तेलंगणा, छत्तीसगड आणि मिझोरममध्ये एक्झिट पोलचे अंदाज बऱ्याच फरकाने चुकीचे ठरले. यानिमित्ताने 2018 मध्ये झालेल्या निवडणुकातील एक्झिट पोलचे अंदाज पुढीलप्रमाणे होते.
राजस्थानच्या मतदानानंतर विधानसभेच्या एकूण जागा 200 पैकी एक्झिट पोल्सनी काँग्रेस 100 हून अधिक जागा मिळतील, असा अंदाज वर्तविला होता. पाच एक्झिट पोलची सरासरी काढली, तर काँग्रेसच्या वाट्याला 117 जागा आल्या होत्या. न्यूज नेशन या एक्झिट पोलने 100 जागांचा अंदाज व्यक्त केला होता, तो जवळपास जाणारा होता, तर रिपब्लिक-सीव्होटर आणि इंडिया टुडे-एक्सिस माय इंडिया यांनी काँग्रेसला (Congress) बहुमत मिळेल असे म्हटले होते.
भाजपबाबत एक्झिट पोलच्या सरासरी जागा 76 मिळतील, असा अंदाज व्यक्त केला होता. निकालात भाजपला 73 जागा मिळाल्या. न्यूज नेशन यांनी भाजप आणि काँग्रेसमध्ये अटीतटीची लढत होईल, असे सांगून भाजपला 89-93 जागा मिळतील असा अंदाज व्यक्त केला होता.
सात मोठ्या एक्झिट पोल्सने मध्य प्रदेशमध्ये काँग्रेसवर भाजपचा निसटता विजय होईल, असे भाकीत वर्तविले होते. फक्त एबीपी न्यूज-सीएसडीएसने काँग्रेसला बहुमत प्राप्त होईल, असा अंदाज व्यक्त केला होता; तर इंडिया टुडे-एक्सिस माय इंडिया, टाइम्स नाऊ-सीएनएक्स आणि इंडिया-सीएनएक्सने भाजपला बहुमत मिळेल, असे सांगितले होते. निकालानंतर काँग्रेसने 114 जागा जिंकल्या होत्या. बहुमतापासून त्यांना केवळ एक जागा कमी मिळाली होती आणि भाजपपेक्षा पाच जागा जास्त मिळाल्या होत्या.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
पाच मोठ्या एक्झिट पोल्सनी तेलंगणामध्ये भारत राष्ट्र समितीला बहुमत मिळेल, असा अंदाज व्यक्त केला होता. मात्र, बीआरएसचा विजय किती मोठा असेल हे कोणीच सांगितले नाही. निकालानंतर प्रत्यक्षात बीआरएसला 119 विधानसभांपैकी 88 जागा मिळाल्या होत्या. काँग्रेसला 39 जागा मिळतील, असे एक्झिट पोल्सनी वर्तविले. मात्र, निकालानंतर काँग्रेसला 19 जागी विजयी झाले. इंडिया टुडे-एक्सिस माय इंडिया आणि तेलंगणामधील प्रादेशिक सर्व्हे करणाऱ्या टीव्ही 9 तेलगू-आरा या दोन संस्थांचा अंदाज जवळ जाणारा ठरला. त्यांनी बीआरएस पक्षाला अनुक्रमे 79-81आणि 75-58 जागा मिळतील, असे सांगितले होते.
सात एक्झिट पोल्सनी छत्तीसगडमध्ये भाजप (Bjp) आणि काँग्रेसला सरासरी 42 जागा मिळतील, असा अंदाज वर्तवित चुरशीची लढत होईल, असा अंदाज वर्तविला होता. मात्र, निकाल लागल्यानंतर धक्का बसला. 90 पैकी काँग्रेसने 68 जागा जिंकत बहुमत प्राप्त केले, भाजपला केवळ 15 जागांवर समाधान मानावे लागले होते. या ठिकाणी इंडिया टुडे-एक्सिस इंडियाने काँग्रेसबाबत केलेले भाकीत अचूक ठरले. मात्र, तरीही त्यांनी भाजपबाबत सांगितलेले आकडे चुकीचे निघाले.
मिझोरममध्ये तीन एक्झिट पोल्सनी सत्ताधारी काँग्रेस किंवा त्यांचे प्रमुख प्रतिस्पर्धी मिझो नॅशनल फ्रंट या दोघांनाही स्पष्ट बहुमत मिळणार नसल्याचे सांगितले. रिपब्लिक-सीव्होटर आणि इंडिया टुडे-एक्सिस माय इंडियाने एमएनएफला काँग्रेसपेक्षा अधिक जागा मिळतील, असे भाकीत वर्तविले होते. 40 विधानसभा मतदारसंघ असलेल्या मिझोरममध्ये एमएनएफने 27, तर काँग्रेसने केवळ एक जागा जिंकली. सर्व तीन एक्झिट पोल्सने काँग्रेसबाबत व्यक्त केलेले अंदाज खरे ठरले होते.
(Edited by Sachin Waghmare)
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.