<div class="paragraphs"><p>BJP-Congress</p></div>

BJP-Congress

 

sarkarnama

देश

मुख्यमंत्र्यांच्या जिल्ह्यातच भाजपला झटका : स्थानिक स्वराज संस्थांमध्ये काँग्रेसची बाजी

सरकारनामा ब्यूरो

बंगळूर : अलीकडेच झालेल्या कर्नाटकातील विधान परिषदेच्या २५ जागांच्या निवडणुकीत कॉँग्रेस (Congress) भाजपने (bjp) प्रत्येकी ११ जागा जिंकून समान शक्तिप्रदर्शन केले होते. पण, राज्यातील ५८ शहर स्थानिक स्वराज संस्थांच्या निवडणुकीत कॉँग्रेसने सर्वाधिक जागा जिंकून सत्ताधारी भाजपला धक्का दिला आहे. एकूण ११८७ जागांसाठी झालेल्या निवडणुकीत कॉँग्रेसने सर्वाधिक ४९८ जागा, तर भाजपने ४३७ जागांवर विजय मिळविला आहे. धजदला ४५, इतरांना २०४ जागांवर विजय मिळाला आहे. (In Karnataka, Congress came first in the local body elections)

कर्नाटकातील ५८ नगरपालिका, नगरपंचायती आणि विविध नागरी संस्थांच्या ९ प्रभागांसाठी, तसेच ५७ ग्रामपंचायतींसाठी २७ रोजी निवडणूक झाली होती. आज त्याची (ता. ३०) मतमोजणी झाली. यात काँग्रेसने राज्यातील सत्ताधारी भाजपला मागे टाकले आहे. शहर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत तो सर्वांत मोठा पक्ष म्हणून उदयास आला. काँग्रेसला ४२.०६ टक्के, भाजपला ३६.९० टक्के, धजदला ३.८ टक्के आणि इतरांना १७.२२ टक्के मते मिळाली आहेत.

शहर नगरपरिषदेच्या १६६ प्रभागांपैकी काँग्रेसला ६१, भाजपला ६७, धजदला १२ आणि इतरांना २६ जागा मिळाल्या आहेत. राज्यातील ४४१ नगरपरिषद प्रभागांपैकी काँग्रेसला २०१, भाजपला १७६ आणि धजदला २१ जागा मिळाल्या आहेत. नगर पंचायतीतील ५८८ प्रभागांपैकी काँग्रेसला २३६, भाजपने १९४ आणि धजदला १२, तर इतरांनी १३५ प्रभागांत विजय मिळवला.

मुख्यमंत्र्यांच्या जिल्ह्यात काँग्रेसला १४ तर भाजपला ७ जागा

मुख्यमंत्री बसवराज बोमई, मंत्री श्रीरामुलू, शशिकला जोल्ले, हलप्पा आचार, आनंद सिंह आदींना त्यांच्या मतदारसंघातील पालिका निवडणुकीत भाजपला कमी जागा मिळाल्याने त्यांना चांगलाच धक्का बसला आहे. विधान परिषद निवडणुकीनंतर मुख्यमंत्री बोम्मई यांची या निवडणुकीत कसोटी लागली होती. बोम्मई यांच्या हावेरी जिल्ह्यातील बंकापूर नगरपरिषदेत भाजपला झटका बसला. या ठिकाणी २३ पैकी काँग्रेसने १४ जागांवर विजय मिळविला, तर भाजपला केवळ ७ जागा मिळाल्या. त्याचप्रमाणे गुत्तल नगरपंचायतीतही १८ पैकी काँग्रेसने ११ व भाजपने केवळ ६ जागा जिंकल्या.

चिक्कोडीतही काँग्रेसची आघाडी

चिक्कोडी तालुक्यातील एकसंबा येथील निवडणुकीत मंत्री शशिकला जोल्ले व खासदार आण्णासाहेब जोल्ले यांची कसोटी लागली होती. परंतु तेथे काँग्रेसने स्पष्ट बहुमत मिळविले आहे. अथणी नगरपरिषदेतही माजी मुख्यमंत्री लक्ष्मण सवदी व आमदार महेश कुमठळ्ळी यांचा मुखभंग झाला आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT