India Alliance  sarkarnama
देश

India Alliance News : 'इंडिया' आघाडीचे जागावाटपाचे सूत्र ठरेना! काँग्रेसची अळीमिळी गुपचिळी

Lok Sabha Election : प्रादेशिक पक्षांच्या जागांवर काँग्रेस दावा सांगत असल्याने आप, तृणमूलमध्ये अस्वस्थता

सरकारनामा ब्यूरो

Political News : 'इंडिया' आघाडीमध्ये तब्बल 28 पक्ष एकत्र आले आहेत. त्यातील 16 पक्षांचे लोकसभेत चांगले अस्तित्व आहे. मात्र, यातही काँग्रेसकडे सर्वाधिक 51 खासदार आहेत. त्यामुळे काँग्रेसच्या भूमिकेवर 'इंडिया' आघाडीचे अस्तित्व अवलंबून आहे. पण पंजाब, दिल्ली, उत्तर प्रदेश या राज्यांतील लोकसभेच्या जागावाटपावर काँग्रेसची भूमिका अद्यापही गुलदस्त्यातच आहे. काँग्रेसच्या या आळीमिळी गुपचिळीने इंडिया आघाडीतील इतर पक्षांची मात्र कोंडी होते आहे.

अयोध्येत 22 जानेवारी रोजी रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानंतर आणि केंद्रीय अर्थसंकल्पाच्या घोषणेनंतर देशात केव्हाही लोकसभेच्या निवडणुका घोषित होऊ शकतात. असे असताना 'इंडिया' आघाडीत अद्याप जागा वाटप निश्चित न झाल्याने राजकीय पक्षांमध्ये चांगलीच अस्वस्थता आहे. कोणाला किती जागा सोडायच्या यावर अजूनही एकमत होत नाही.

प्रादेशिक पक्षांना त्यांच्या राज्यात सर्वाधिक जागा हव्या आहेत. त्यामुळे बंगाल, दिल्ली, पंजाब, बिहार या राज्यातील महत्त्वाच्या जागांवर काँग्रेसला पाणी सोडावे लागले. त्यासाठी काँग्रेसची तयारी नाही. त्यामुळे अजुनही जागावाटपाची चर्चा पुढे गेली नाही.

'इंडिया' आघाडीचे लोकसभेतील सध्याचे खासदार

'इंडिया' आघाडीत समाविष्ट 16 राजकीय पक्षांचे संख्याबळ पाहिल्यावर तुर्तास काँग्रेस 51, तृणमूल काँग्रेस 23, डीएमके 23, जेडीयू 16, शिवसेना (ठाकरे गट) 6, एनसीपी 4, सपा 3, सीपीआयएम 3, नॅशनल काॅन्फरन्स 3, आयसीयूएमएल 3, सीपीआय 2, आप, झामुमो, व्हीसीके, आरएसपी आणि केरळ काँग्रेस यांचा प्रत्येकी एक असे एकूण 142 खासदार 'इंडिया' आघाडीत आहेत.

राज्यनिहाय लोकसभेच्या जागा

लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीत 543 जागांवर निवडणूक आयोग निवडणूक घेणार आहे. यामध्ये 79 जागा या अनुसूचित जाती तर 41 जागा या अनुसूचित जमातीसाठी राखीव आहेत. राज्यनिहाय विचार केला तर सर्वाधिक जागा या उत्तर प्रदेशमध्ये असून 80 जागांवरती लोकसभेच्या निवडणुका होतात. त्या खालोखाल महाराष्ट्रात 48, पश्चिम बंगालमध्ये 42 ,आंध्र प्रदेशमध्ये 42, बिहारमध्ये 40, तमिळनाडूमध्ये 39, मध्य प्रदेशमध्ये 29, कर्नाटकामध्ये 28, गुजरात 26, राजस्थानमध्ये 25, ओरिसामध्ये 21, केरळमध्ये 20, आसाममध्ये 14, झारखंडमध्ये 14, पंजाबमध्ये 13, छत्तीसगडमध्ये 11, हरियाणामध्ये 10, दिल्लीतील 7, जम्मू-कश्मीर 6, हिमाचल प्रदेश 4 आणि इतर जागांसाठी निवडणूक होईल.

त्याचबरोबर इतर राज्यांतील तसेच केंद्रशासित प्रदेशातील विविध लोकसभा मतदारसंघ एकूण 543 जागांवर निवडणूका होतील. राष्ट्रपतींना अँग्लो इंडियन समाजाचे प्रतिनिधित्व कमी वाटल्यास दोन अँग्लो इंडियन लोकसभा सदस्य हे नामांकनाद्वारे भरले जातात.

काँग्रेसची ताकद कमी

काही राज्यांमध्ये काँग्रेसची ताकद अगदी कमी आहे. पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेस हा 'इंडिया' आघाडीतील प्रमुख पक्ष आहे. येथे काँग्रेसला जास्त जागा देण्याबाबत ममता बॅनर्जी अनुकूल नाहीत. तर, उत्तर प्रदेशात भाजप विरोधात समाजवादी पक्ष लढतो आहे. तेथे काँग्रेसला अपेक्षित यश मिळाले नाही. त्यामुळे समाजवादी आणि काँग्रेसमध्ये जागा वाटपावरून रस्सीखेच आहे. दक्षिणेत तमिळनाडूमध्ये एम. के. स्टॅलिन हे काँग्रेसला किती जागा सोडणार यावर देखील प्रश्नचिन्ह आहे. त्यामुळे प्रादेशिक पक्ष आपल्या राज्यांमध्ये काँग्रेसला जास्त जागा देण्याच्या मनस्थितीमध्ये नाही. तर देशभर कमीत कमी 250 ते 280 जागांवर लढण्याची तयारी काँग्रेसने केली आहे.

(Edited By Roshan More)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT