Opposition alliance news : देशातील पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकांनंतर सोमवारी दिल्लीत इंडिया आघाडीची पहिलीच बैठक झाली. या बैठकीचे वैशिष्ट्य म्हणजे सातत्याने काँग्रेसला शिंगावर घेणाऱ्या तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्षा ममता बॅनर्जी याही बैठकीला उपस्थित होत्या. निवडणुकीतील दारुण पराभवाने खचलेल्या ममतादीदींना काँग्रेस नेत्या सोनिया गांधींशेजारील खुर्चीवर स्थान देण्यात आले होते.
इंडिया आघाडीच्या आजच्या बैठकीला २५ पक्षांच्या प्रतिनिधींची हजेरी होती. डीएमके आणि आम आदमी पक्षाने बैठकीपासून दूर राहण्याचा निर्णय आधीच जाहीर केला होता. हे दोन पक्ष वगळता अन्य सर्व पक्षांच्या नेत्यांनी आघाडीसोबत राहणे पसंत केले. ममता बॅनर्जी यांच्या बैठकीतील उपस्थितीकडे सर्वांचेच लक्ष लागले होते. त्या सोनिया गांधी यांच्याशेजारील खुर्चीवर बसल्या होत्या. दोन्ही नेत्यांमध्ये अधूनमधून चर्चाही होताना दिसली.
पाच मुद्द्यांवर चर्चा
बैठकीनंतर आघाडीची पत्रकार परिषद झाली. यामध्ये काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जून खर्गे बैठकीत पाच प्रमुख मुद्दयांवर सहमती झाल्याची माहिती दिली. त्यापैकी एक महत्वाचा मुद्दा म्हणजे आघाडीची बैठक. यापुढे दर दोन महिन्याला आघाडीची बैठक घेणार असल्याची घोषणा त्यांनी यावेळी केली. पुढील बैठक हैद्राबाद येथे ऑगस्ट महिन्यात होणार आहे.
दुसरा मुद्दा म्हणजे मतांची लूट. एसआयआर, मतदारयाद्यांमध्ये हेराफेरी, निष्पक्ष निवडणुकांच्या अनुषंगाने समोर आलेल्या मुद्द्यांवर सरन्यायाधीशांना एक पत्र पाठविले जाईल. हे पत्र त्यांना तातडीने पाठविले जाईल. त्यामध्ये मतांची लुटीचा उल्लेख करून त्याकडे सरन्यायाधीशांचे लक्ष वेधले जाणार असल्याचे खर्गेंनी स्पष्ट केले.
मागील काही दिवसांपासून संपूर्ण देशभरात नीट पेपरफुटी आणि सीबीएसई परीक्षेतील गोंधळाचा मुद्दा गाजत आहे. लाखो विद्यार्थ्यांना या परीक्षांमधील भोंगळ कारभाराचा फटका बसला आहे. त्यामुळे केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीवर बैठकीत जोर देण्यात आला. त्यासाठी आम्ही लढत राहू, असे खर्गे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. हा तिसरा मुद्दा होता.
देशाच्या सध्याच्या आर्थिक परिस्थितीच्या अनुषंगाने सर्वपक्षीय बैठक बोलाविण्याची मागणीही इंडिया आघाडीच्या बैठकीत करण्यात आली. बेरोजगारी, महागाई, अत्याचार, शेतकरी मुद्दे आणि इतर मुद्यांवरही बैठकीत एकमत झाले. आगामी संसदीय पावसाळी अधिवेशनात या मुद्यांवर विरोधक सरकारला धारेवर धरणार असल्याचे संकेत खर्गेंनी दिले. हा बैठकीतील चौथा मुद्दा होता. पाचवा मुद्दा म्हणजे, संसदेतील समन्वय पावसाळी अधिवेशनात कायम राहील. दररोज सकाळी विरोधी पक्षनेत्यांच्या कार्यालयात बैठक होईल, अशी माहिती खर्गेंनी दिली.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.