India Alliance Sarkarnama
देश

India Alliance Meeting : 'इंडिया'ची बैठक 1 जूनला बोलावण्यामागे काय असेल काँग्रेसची रणनीती? 5 मुद्दे समजून घ्या...

Congress Latest News : निवडणुकीच्या सातव्या आणि अखेरच्या टप्प्याचे मतदानही एक जूनला तर मतमोजणी चार जूनला होणार आहे. त्यामुळे काँग्रेसने बोलावलेल्या बैठकीकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.

Rajanand More

Lok Sabha Election 2024 : लोकसभा निवडणुकीच्या सातव्या आणि अखेरच्या टप्प्याचे मतदान एक जूनला आहे. तर चार जूनला मतमोजणी होणार असून पंतप्रधानपदाच्या खुर्चीत कोण बसणार हे स्पष्ट होईल. पण त्याआधीच काँग्रेसने एक जूनला इंडिया आघाडीची (India Alliance Meeting) बैठक बोलावली आहे. आघाडीतील सर्व पक्षांना काँग्रेसचे (Congress) अध्यक्ष मल्लिकार्जून खर्गे यांनी निमंत्रित केले आहे. या बैठकीवरून आता तर्कवितर्क लढवले जात आहेत.

खर्गे यांनी बैठकीसाठी एक जून हीच तारीख का निवडली, यावरून चर्चेला उधाण आले आहे. यामागचे महत्वाचे कारण म्हणजे याचदिवशी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांच्या अंतरिम जामीनाची मुदत संपत आहे, असे राजकीय विश्लेषकांचे मत आहे. केजरीवाल दोन जूनला पुन्हा जेलमध्ये जातील. तसेच इतर काही कारणेही सांगितले जात आहेत. (Lok Sabha Election Update)

केजरीवाल फॅक्टर

दिल्लीतील कथित मद्य धोरण घोटाळ्यात (Delhi Liquor Scam Case) केजरीवालांना ईडीने अटक केली आहे. सध्या ते अंतरिम जामीनावर बाहेर असून दोन जूनला पुन्हा जेलमध्ये जावे लागणार आहे. आप आणि काँग्रेसची दिल्लीसह चंदीगड, गुजरात, हरियाणा आणि गोवा या राज्यांमध्ये आघाडी आहे. तर पंजाबमध्ये प्रतिस्पर्धी आहेत. त्यामुळे केजरीवाल यांचे आघाडीच्या बैठकीला असणं काँग्रेससाठी महत्वाचे मानले जात आहे. (Latest Political News)

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

विरोधकांना एकत्रित ठेवणे

निवडणुकीचा निकाल चार जूनला आहे. आपल्या बाजूने निकाल लागेल, अशी आशा काँग्रेसला आहे. त्याआधी आघाडीतील पक्षांमध्ये पुन्हा एकोपा निर्माण करण्याचे प्रयत्न काँग्रेसकडून केले जाऊ शकतात. कारण बंगालमध्ये मुख्यमंत्री ममता बॅनर्जी स्वतंत्र लढत आहेत. तर केरळमध्ये डावे काँग्रेसच्या विरोधात आहेत. जम्मू-काश्मीरमध्ये महबूबा मुफ्ती आणि फारुख अब्दुल्ला एकमेकांविरोधात उभे ठाकले आहेत. त्यामुळे निवडणुकीदरम्यान काही राज्यांमध्ये विरोधात असलेल्या सर्व मित्रांना पुन्हा एकत्रित आणण्याची काँग्रेसची रणनीती आहे.

नवीन मित्रांचा शोध

निवडणुकीच्या निकालामध्ये एनडीए किंवा आघाडीला २७२ चा आकडा गाठता न आल्याने नवीन मित्रपक्षांची गरज भासणार आहे. इंडियाच्या बैठकीमध्ये अशा मित्रांना टिपण्याची रणनीती आखली जाऊ शकते. त्यामध्ये आंध्र प्रदेशात जगनमोहन रेड्डी, ओडिशामध्ये नवीन पटनायक, पंजाबमध्ये अकाली दल, तेलंगणामध्ये बीआरएस आदी पक्ष आहेत. यावरही बैठकीत चर्चा होऊ शकते.

प्रतिमा बदलणे

काँग्रेसकडून वेळेवर निर्णय घेतले जात नसल्याची टीका ममता बॅनर्जी यांनीही अनेकदा केली आहे. इतर काही मित्रपक्षांकडूनही आघाडीच्या बैठका वेळेवर घेतल्या जात नसल्याने नाराजी व्यक्त केली होती. त्यामुळे काँग्रेस सुस्त असल्याची प्रतिमा दूर करण्यासाठी खर्गे यांनी एक जूनलाच बैठक बोलावून मित्रपक्षांना पुन्हा सक्रीय करण्याची रणनीती आखली जाऊ शकते.

आपणच मोठा भाऊ

इंडिया आघाडीसाठी बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी सुरूवातीला पुढाकार घेतला होता. पण दोन-तीन बैठकांनंतर काँग्रेसच मोठा भाऊ असल्याचे स्पष्ट झाले. नितीश कुमार आघाडीतून बाहेर पडल्यानंतर सर्व सुत्रे काँग्रेसच्या हाती आली. त्यामुळे आपणच मोठा भाऊ असल्याचे मित्रपक्षांवर ठसवण्याची संधी काँग्रेसवर आहे. निवडणुकीचा निकाल आघाडीच्या बाजूने लागल्याचा त्याचा सर्वात मोठा लाभार्थी पक्ष काँग्रेस असणार, हे निश्चित.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT