Sonia Gandhi 
देश

Sonia Gandhi: "बारा वर्षात भारताची सामाजिक वीण उसवली!" सोनिया गांधींचा मोदी सरकारवर जोरदार हल्लाबोल; भाजपचंही प्रत्युत्तर

Sonia Gandhi: सोनिया गांधी यांच्या आत्मचरित्राचं १० नोव्हेंबरला प्रकाशन होणार आहे, यापार्श्वभूमीवर 'द हिंदू' या वृत्तापत्राला त्यांनी मुलाखत दिली. यावेळी विविध मुद्यांवर त्यांनी भाष्य केलं.

Amit Ujagare

Sonia Gandhi: सोनिया गांधी यांच्या आत्मचरित्राचं लवकरच प्रकाशन होणार आहे, यापार्श्वभूमीवर 'द हिंदू' या वृत्तापत्राला त्यांनी मुलाखत दिली. यावेळी विविध मुद्यांवर त्यांनी भाष्य केलं. तसंच मोदी सरकारच्या गेल्या १२ वर्षातल्या कारभारावरही त्यांनी जोरदार हल्लाबोल केला. या काळात भारताची धर्मनिरपेक्षततेची वीण उसवली आहे. मोदी सरकार गेल्यानंतरही ती पुन्हा दुरुस्त करायला वेळ लागेल अशा शब्दांत त्यांनी सडकून टीका केली.

सोनिया गांधी म्हणाल्या, "लोक आता अस्वस्थ होऊ लागले आहेत आणि त्यांना असलेल्या नुकसानाची जाणीव होऊ लागली आहे. परंतू, मी आशावादी आहे आणि मला खात्री आहे की, भारतातील जनता पुन्हा एकदा सुशासनाकडं परतण्याचं स्वागत करेल. गेल्या बारा वर्षांत आपल्या देशाच्या जडणघडणीचे, आपल्या लोकशाहीचे आणि आपल्या संस्थांचे मोठे नुकसान झालं आहे. हे सरकार सत्तेतून पायउतार झाल्यानंतरही, आपल्या व्यवस्था पुन्हा पूर्वपदावर आणण्यासाठी बराच वेळ लागेल आणि त्यासाठी राजकीय पक्षांना खूप प्रयत्न करावे लागतील," असंही त्या म्हणाल्या.

काँग्रेसची घसरण आणि सरकारवर केलेले 'मत चोरी'चे आरोप यांविषयी सोनिया गांधी म्हणाल्या, "मी इतकी निराशावादी नाही. हे लक्षात घ्या की, हे सरकार सत्तेत आल्यापासून काँग्रेस पक्षाला आणि इतर विरोधी पक्षांना समान संधी (लेव्हल प्लेईंग फील्ड) मिळालेली नाही. सर्व संस्थांवर—विशेषतः निवडणूक आयोगावर त्यांचं असलेलं पूर्ण नियंत्रण, मुख्य प्रवाहातील माध्यमांवरील त्यांची पकड, त्यांची आर्थिक ताकद आणि धर्माचा त्यांनी केलेला गैरवापर, या सर्व गोष्टी लक्षात घ्या. तरीही, आमचा पक्ष संघर्ष करत आहे आणि प्रगतीही करत आहे. किंबहुना, या आक्रमणाचा सामना करण्याची क्षमता असलेला हा एकमेव पक्ष आहे," असही गांधी यावेळी म्हणाल्या.

सरकारच्या विरोधकांप्रती असलेल्या दृष्टीकोनावर भाष्य करताना सोनिया गांधी म्हणाल्या, काँग्रेसचे कार्यकर्ते आणि नेते सर्व प्रकारच्या छळाला सामोरे गेले आहेत, असं असूनही, प्रत्येक गावात आणि प्रत्येक जिल्ह्यात, काँग्रेसचे पुरुष आणि महिला कार्यकर्ते आपल्या राज्यघटनेत अंतर्भूत असलेल्या मूल्यांसाठी अजूनही लढा देत आहेत. इतकंच नव्हे, तर अलिकडच्या काही महिन्यांत अनेक निवडणुका चोरल्या गेल्या हे स्पष्ट झाले आहे आणि आता लोक त्याबाबत अधिक जागरूक झाले आहेत. काँग्रेस समान विचारसरणी असलेल्या पक्षांसोबत मिळून काम करत आहे आणि आमची स्थिती दिवसेंदिवस सुधारत आहे,"

पंतप्रधान मोदींकडून काही शिकण्यासारखे आहे का? यावर सोनिया गांधी म्हणाल्या, "हे खरं आहे की त्यांची वैचारिक पार्श्वभूमी पूर्णपणे वेगळी आहे. परंतु, काँग्रेस पक्षातही लोक अनेक मार्गांनी यशस्वी होतात. उदाहरणार्थ, डॉ. मनमोहन सिंग आणि काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे. मला नाही वाटत की आपल्याला RSS काही शिकण्यासारखे आहे"

२००४ मध्ये जर सोनिया गांधींनी पंतप्रधानपद स्वीकारलं असतं, तर यूपीएची धोरणं आणि काँग्रेसची रणनीती वेगळी असती का? असा प्रश्न विचारला असता, सोनिया गांधी म्हणाल्या, "नाही, अजिबात नाही. असा विचार माझ्या मनात कधीही आला नाही. आमचा अनुभव एकंदरीत खूप सकारात्मक होता. आम्ही एक टीम म्हणून काम केलं आणि आमची भूमिका स्पष्ट होती. डॉ. सिंग सरकारचे नेतृत्व करत होते, तर मी पक्षाचे नेतृत्व करत होते.

सोनिया गांधींच्या विधानावर भाजपची प्रतिक्रिया

सोनिया गांधींच्या मोदी सरकारवरील टीकेला भाजप नेते आणि महाराष्ट्रातील आमदारानं, प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी म्हटलं की, सोनिया गांधींचं आगामी पुस्तक हे त्यांचं आत्मचरित्र नसून, त्यांचा मुलगा राहुल गांधी यांच्या वारंवार अयशस्वी ठरलेल्या राजकीय प्रयत्नांचं स्वतःच केलेलं उदात्तीकरण आहे. सोनिया गांधी आपल्या मुलाच्या राजकीय भविष्यासाठी संपूर्ण देशाला जबाबदार धरू शकत नाहीत. त्यांना देशाची नव्हे, तर आपल्या मुलाची आणि कुटुंबाची चिंता आहे.

पंतप्रधान मोदींच्या कामाचे देशातील जनतेने कौतुक केलं आहे, म्हणूनच ते तिसऱ्यांदा पंतप्रधान झाले आहेत. सोनिया गांधींसह संपूर्ण विरोधी पक्ष भारताला श्रीलंका, बांगलादेश किंवा नेपाळसारख्या स्थितीत नेऊ इच्छितो, ते अशा देशांशी तुलना करतात कारण आपला देश प्रगती करत आहे. विकासाचा वेग एखाद्या 'बुलेट ट्रेन'सारखा आहे. त्यामुळे, स्वतःच्या अपयशाचे खापर ते इतरांवर फोडत आहेत.

सोनिया गांधी मोदी सरकारच्या १२ वर्षांच्या कार्यकाळावर टीका करत आहेत. लोकशाहीत सरकारवर टीका करण्याचा तुम्हाला घटनात्मक अधिकार नक्कीच आहे. मात्र, टीका ही तथ्यांवर आणि अशा मुद्द्यांवर आधारित असावी ज्यावर लोक विश्वास ठेवू शकतील. तुम्ही लोकशाहीबद्दल बोलता, पण १९७५ मध्ये काय झाले होते? २१ महिने लोकांवर बळजबरीने आणीबाणी लादण्यात आली होती. १ लाख १० हजारांहून अधिक लोकांना त्रास देण्यात आला, छळले गेले आणि तुरुंगात डांबले गेले. वृत्तपत्रांना मुक्तपणे लिहिण्याचे स्वातंत्र्य नव्हते. कोणतीही गोष्ट छापण्यापूर्वी सरकारची पूर्वपरवानगी घेणे अनिवार्य होतं, अशा शब्दांत भाजपनं सोनिया गांधींवर टीके केली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT