Supreme Court's Landmark Decision on Asset Disclosure : सुप्रीम कोर्टाने आपल्या न्यायाधीशांची संपत्ती सार्वजनिक करण्याचे ऐतिहासिक पाऊल उचलले आहे. त्यानुसार सरन्यायाधीश संजीव खन्ना यांच्यासह 21 न्यायाधीशांनी आपल्याकडील संपत्तीची माहिती उघड केली आहे. इतर 12 न्यायाधीशांची माहितीही सार्वजनिक केली जाणार आहे. सुप्रीम कोर्टाच्या संकेतस्थळावर कुणीही ही माहिती पाहू शकतो.
सुप्रीम कोर्टाने 1 एप्रिल 2025 ला याबाबतचा निर्णय घेतला होता. त्याची अंमलबजावणी आता सुरू झाली आहे. सरन्यायाधीश संजीव खन्ना यांनीही आपली संपत्ती जाहीर केली असून त्यामध्ये 55 लाखांचे फिक्स डिपॉझिट आणि 1 कोटी रुपयांच्या पब्लिक प्रोव्हिडंट फंडचा समावेश आहे. त्याचप्रमाणे त्यांच्याकडे दिल्लीत दोन फ्लॅट आहेत.
मुलीसोबत त्यांनी गुरूग्राम येथेही एक फ्लॅट घेतला आहे. त्यांची हिमाचल प्रदेशातील त्यांच्या मुळ गावी पिढीजात संपत्तीही आहे. त्यांच्याकडे 250 ग्रॅम सोने आणि 2 किलो चांदी असे दागिने तर सरन्यायाधीशांच्या पत्नीकडे 700 ग्रॅम सोने आणि 5 किलो चांदीचे दागिने आहेत. बहुतेक दागिने विविध कार्यक्रमांमध्ये गिफ्ट मिळालेले किंवा वारसाहक्काने मिळालेले आहेत. त्यांच्याकडे एक कारही आहे. त्यांच्यावर कोणतेही कर्ज नाही, अशी माहिती वेबसाईटवर देण्यात आली आहे.
संपत्ती जाहीर केलेल्या न्यायाधीशांमध्ये भावी सरन्यायाधीश भूषण गवई यांचाही समावेश आहे. त्याचप्रमाणे न्यायाधीश सूर्यकांत, न्यायाधीश अभय ओक, न्यायाधीश विक्रम नाथ आदी न्यायाधीशांचाही त्यात समावेश आहे. न्यायाधीशांबाबत पारदर्शकता आणि विश्वासार्हता वाढावी, यादृष्टीने सुप्रीम कोर्टाने संपत्ती जाहीर करण्याचा निर्णय घेतला आहे. यापुढे सुप्रीम कोर्टातील प्रत्येक न्यायाधीशांना आपली संपत्ती जाहीर करावी लागणार आहे.
दिल्ली उच्च न्यायालयातील तत्कालीन न्यायाधीश यशवंत वर्मा यांच्या घरी काही आठवड्यांपूर्वी नोटांचे ढीग सापडले आहे. काही नोटांचे बंडल जळालेल्या स्वरुपात सापडले होते. त्यांच्या बंगल्याच्या आऊट हाऊसमध्ये आग लागल्यानंतर हा प्रकार समोर आला होता. त्यानंतर सुप्रीम कोर्टाने त्याची गंभीर दखल घेत न्यायाधीश वर्मा यांची अलाहाबाद न्यायालयात बदलीही केली. मात्र, या प्रकारामुळे अनेकांनी न्यायाधीशांच्या विश्वासार्हतेविषयी साशंकता उपस्थित केली होती.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.