भारतासाठी मोठी आणि दिलासादायक बातमी अमेरिकेने भारतीय वस्तूंवर लावलेले जास्तीचे शुल्क (High Tariff) लवकरच कमी होण्याची शक्यता आहे. माहितीनुसार, भारत आणि अमेरिका यांच्यातील दीर्घकाळापासून प्रलंबित असलेला व्यापार करार (Trade Deal) अंतिम टप्प्यात पोहोचला आहे. या करारानंतर भारतीय वस्तूंवर असलेले अमेरिकन शुल्क 50 टक्क्यांवरून 15 ते 16 टक्क्यांपर्यंत कमी केले जाऊ शकते.
सध्या भारतातून अमेरिकेत जाणाऱ्या वस्तूंवर जवळपास 50% इतका आयात शुल्क लागू आहे. मात्र, या करारामुळे भारतीय वस्तूंसाठी अमेरिकन बाजार अधिक खुला होईल, विशेषतः वस्त्रोद्योग, अभियांत्रिकी आणि औषधनिर्मिती, कृषी आणि उद्योग क्षेत्रातील निर्यातदारांना याचा मोठा फायदा होईल.
या प्रस्तावित व्यापार करारात कृषी (Agriculture) आणि ऊर्जा (Energy) क्षेत्रांवर विशेष लक्ष केंद्रित केले जाईल. भारताने काही अमेरिकन कृषी उत्पादनं जसे की गैर-आनुवंशिक मका आणि सोयामील (Soyameal) आयात करण्यास परवानगी देण्याची शक्यता आहे. त्यामुळे अमेरिकेच्या कृषी बाजारात भारत एक मोठी संधी ठरू शकतो.
तसेच, व्यापार चर्चेत रशियाकडून भारताच्या कच्च्या तेलाच्या खरेदीचा विषय देखील महत्वाचा ठरला आहे. अहवालानुसार, भारत रशियन तेल खरेदीत थोडी कपात करू शकतो.
मिंटच्या अहवालानुसार, या महिन्याच्या अखेरीस होणाऱ्या आसियान शिखर परिषदेपूर्वी या कराराची अंतिम निर्णय होऊ शकतो. त्यानंतर औपचारिक घोषणा केली जाईल, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. मात्र, अद्याप भारत किंवा अमेरिकेच्या अधिकृत सूत्रांकडून कोणतीही पुष्टी करण्यात आलेली नाही.
अलीकडेच पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांच्यात फोनद्वारे चर्चा झाली. ट्रम्प यांनी सांगितले की या चर्चेत व्यापार आणि ऊर्जा सहकार्यावर भर होता. त्यांनी असा दावा केला की मोदींनी रशियन तेल खरेदी मर्यादित ठेवण्याचे आश्वासन दिले आहे.
मोदी यांनीही एक्स (ट्विटर) वर पोस्ट करत या संभाषणाची पुष्टी केली आणि ट्रंप यांचे दिवाळीच्या शुभेच्छांसाठी आभार मानले. त्यांनी लिहिले की, “दोन महान लोकशाही देश म्हणून आपण जगाला आशेचा किरण दाखवत राहू आणि दहशतवादाविरोधात एकत्र राहू.”
हा करार अंतिम झाल्यास भारत-अमेरिका व्यापार संबंध नव्या उंचीवर पोहोचतील आणि दोन्ही देशासाठी आर्थिकदृष्ट्या फायदेशीर ठरतील.