
कऱ्हाड तालुका हा दक्षिण आणि उत्तर विधानसभा मतदार संघातात विभागला आहे. कऱ्हाड तालुक्यात जिल्हा परिषदेचे १२ तर पंचायत समितीचे २४ गण आहेत. कऱ्हाड दक्षिणमध्ये डॉ. अतुल भोसले तर उत्तरमध्ये मनोज घोरपडे हे दोन्ही आमदार भाजपचे आहेत. त्याचबरोबर कॉंग्रेसचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे माजी सहकारमंत्री बाळासाहेब पाटील, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे रयत कारखान्याचे अध्यक्ष अॅड. उदयसिंह पाटील - उंडाळकर या नेत्यांचेही गट तालुक्यात कार्यरत आहेत.
सध्या अॅड. उंडाळकर हे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये गेल्याने राजकीय समिकरणे बदलली आहेत. त्यामुळे यावेळच्या जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुका या चिन्हावर झाल्या किंवा आघाडी आणि महायुतीव्दारेही लढावल्या गेल्या तरी त्यात उमेदवारांपेक्षा नेत्यांचीच कसोटी लागणार आहे. बदललेली राजकीय समिकरणे पथ्यावर पाडून घेऊन आपल्याच पक्षाचे जास्तीत जास्त उमेदवार निवडून आणण्यात बाजी मारण्यासाठी नेत्यांनीही कंबर कसली आहे.
कऱ्हाड तालुक्याच्या पंचायत समितीवर गेली अनेक वर्षे माजी सहकारमंत्री (कै) विलासराव पाटील-उंडाळकर गटाचे वर्चस्व राहिले आहे. गेल्या अनेक वर्षांपासून सभापती, उपसभापती पदावर (कै) उंडाळकर यांनी अनेकांना संधी दिली आहे. मागील पंचायत समितीच्या निवडणुकीत उंडाळकर गटाशी माजी सहकारमंत्री बाळासाहेब पाटील यांनी जुळवून घेवून पंचायत समितीची सत्ता ताब्यात ठेवली. त्यावेळी विद्यमान आमदार डॉ. भोसले यांच्या सदस्यांना मात्र विरोधी बाकावर बसावे लागले होते. मात्र सातारा जिल्हा बँकेच्या निवडणुकीतील उमेदवारीवरून माजी सहकार मंत्री पाटील आणि अॅड. उंडाळकर यांच्या गटांचा सवता सुभा झाला. मात्र जिल्हा बँकेच्या निमित्ताने यापूर्वी विरोधात असलेले पाटील व भोसले गट एकत्र आले तर उंडाळकर गटाने बाळासाहेब पाटील गटापासून फारकत घेतली.
त्यानंतर झालेल्या बाजार समितीच्या निवडणुकीतही तेच समीकरण राहिले. मात्र त्या निवडणुकीत माजी मुख्यमंत्री चव्हाण हे उंडाळकरांसाठी मैदानात उतरले तर कऱ्हाड उत्तरेतील पाटील गटाचे विरोधक विद्यमान आमदार मनोज घोरपडे, भाजपचे धैर्यशील कदम, रामकृष्ण वेताळ यांनी उंडाळकरांना साथ दिली. सर्वांच्या साथीने बाजार समितीची निवडणूक उंडाळकरांना जिंकता आली. त्यानंतर अॅड. उंडाळकर यांनी कार्यकर्त्यांना ताकद मिळावी यासाठी उपमुख्यमंत्री पवार यांच्या राष्ट्रवादीत प्रवेश केला आहे. तर सह्याद्री कारखान्याच्या निवडणुकीत विरोधी आमदार घोरपडे, धैर्यशील कदम, रामकृष्ण वेताळ यांनी तयारी करुनही माजी सहकारमंत्री बाळासाहेब पाटील यांनी कारखान्याची सत्ता ताब्यात ठेवली. त्यामुळे त्यांचाही गट चार्ज झाला आहे.
सातारा जिल्हा बॅंकेच्या निमित्ताने भाजपचे आमदार डॉ. अतुल भोसले आणि माजी सहकारमंत्री बाळासाहेब पाटील यांचा गट एकत्र आला. त्यामुळे पाटील यांचा विजय सुकर झाला. त्यामुळे दोन्ही गटाचे सख्य वाढले आहे. त्यानंतर झालेल्या बाजार समितीच्या निवडणुकीतही त्या दोन्ही गटांनी एकत्र निवडणुक लढवून उंडाळकरांना शह देण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यांना त्यात यश आले नाही. सध्या होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीतही दोन्ही गट एकत्रच राहून निवडणुकीत एकमेकांनी मदत करतील अशी राजकीय वर्तुळात चर्चा आहे. त्या दोन्ही नेत्यांची छायाचित्रे असलेले लागणारे फ्लेक्सही त्याचीच पुष्टी देतात. मात्र निवडणुका लढवण्याबाबत पक्षीय पातळीवर काय निर्णय होणार यावरही त्यांची आघाडी अवलंबून असणार आहे.
राज्यात भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या महायुतीचे सरकार आहे. सध्यातरी महायुतीच्या नेत्यांकडून एकत्रित निवडणुका लढवण्याचे संकेत दिले जात आहेत. कऱ्हाड दक्षिणमध्ये यापूर्वी उंडाळकर आणि भोसले गट एकत्र होते. मात्र कृष्णा कारखाना, विधानसभेच्या निवडणुकांमुळे दोन्ही गटात विळ्या-भोपळ्याचे वैर निर्माण झाले आहे. दरम्यान मध्यंतरीच्या काळात अॅड. उदयसिंह पाटील-उंडाळकर यांनी उपमुख्यमंत्री पवार यांच्या राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये प्रवेश केला. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या महायुती म्हणून लढवल्या गेल्या तर महायुतीचे घटकपक्ष म्हणून भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांना एकत्र येवून निवडणुका लढवाव्या लागतील. तसे झाले तर उंडाळकर आणि भोसले गट वैरत्व विसरुन एकत्र येणार का? याचीही उत्सुकता तालुक्यात आहे.
एकूण सध्या तालुक्यात सर्वच नेत्यांचे गट हे सक्रिय आहेत. त्यामुळे जिल्हा परिषद, पंचायत समितीवर वर्चस्वासाठी सर्वच नेत्यांनी ताकद लावली आहे. जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुका महायुती आणि महाविकास आघाडीव्दारे की पक्षीय पातळीवर लढवण्यासंदर्भात पक्षीय पातळीवर भुमिका स्पष्ट झालेली नाही. त्यामुळे निवडणूक कशीही लढली गेली तरी तालुक्यातील नेत्यांच्याच कस या निवडणुकीत लागणार आहे.