Jaish-e-Mohammed fundraising Pakistan : पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर, पाकिस्तानस्थित दहशतवादी तळांना उद्ध्वस्त करताना भारतीय लष्करानं ‘ऑपरेशन सिंदूर’ राबवलं. या ऑपरेशनचा मोठा फटका पाकिस्तानातील ‘जैशे महंमद’ या दहशतवादी संघटनेला बसला. यामुळे पाकिस्तानात 300 हून अधिक मशिदी उभारण्याच्या नावाखाली मोठ्या प्रमाणावर निधी संकलनाची मोहीम ‘जैशे महंमद’ दहशतवादी संघटनेने सुरू केली आहे.
‘लष्करे तैयबा’चे ज्याप्रमाणे विकेंद्रीकरण झाले, त्याप्रमाणे ‘जैशे महमंद’ या संघटनेचेही विक्रेंदीकरण करण्याचा हा प्रयत्न असल्याचे माहिती समोर आली आहे. यानुसार भारतीय सुरक्षा यंत्रणांना देखील अलर्ट झाली आहे.
पाकिस्तानची (Pakistan) गुप्तचर संघटना ‘आयएसआय’च्या पाठिंब्याने ‘जैशे महंमद’ या दहशतवादी संघटनेने निधी उभारणीसाठी नवी यंत्रणा उभी केली आहे. संस्थापक आणि मोस्ट वाँटेड दहशतवादी मसूद अजहर याच्या कुटुंबीयांच्या नियंत्रणाखाली असलेल्या ‘ईझी पैसा’ आणि ‘सदा पे’ यांसारख्या डिजिटल वॉलेटचा वापर करून हा निधी उभारत आहे.
फायनान्शियल अॅक्शन टास्क फोर्सच्या (एफएटीए) तपासणीपासून दूर राहण्याचा प्रयत्न सुरू असल्याचेही सूत्रांनी म्हटले आहे. अंदाजे 3.91 अब्ज रुपयांचा निधी उभारण्याची ही मोहीम असून, संघटनेच्या पुढील कारवायांसाठी आणि शस्त्रास्त्र खरेदीसाठी हा निधी उपलब्ध होणार आहे, अशी माहिती आहे.
भारतीय लष्कराने ‘ऑपरेशन सिंदूर’ (Operation Sindoor) दरम्यान ‘जेशे महमंद’च्या मुख्यालयासह मरकज बिलाल, मरकज अब्बास, महमोना जोया आणि सरगल हे प्रशिक्षण कॅम्प उद्ध्वस्त केले होते. या उद्ध्वस्त झालेल्या तळांची पुन्हा उभारणी करण्यासाठी पाकिस्तान सरकारने निधी देण्याची घोषणा केली आहे. मात्र, संघटनेने पाकिस्तानभर मशिदी उभारण्याच्या नावाखाली डिजिटल वॉलेटद्वारे ऑनलाइन निधी उभारणी मोहीम सुरू केली आहे.
फेसबुक आणि व्हॉट्सअॅपसारख्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर संघटनेशी संबंधित प्रॉक्सी अकाउंट आणि संघटनेच्या कमांडरांकडून वापरल्या जाणाऱ्या अकाउंटवर पोस्टर, व्हिडिओ आणि मसूद अजहरचे पत्र ‘शेअर’ करण्यात आले असून, समर्थकांना देणगी देण्याचे आवाहन करण्यात आले आहे. प्रत्येक मशिदीसाठी 1.25 कोटी पाकिस्तानी रुपये आवश्यक असल्याचे यात सांगण्यात आले आहे.
विविध डिजिटल वॉलेट अकाउंट मसूद अजहरचा भाऊ तल्हा अल सैफ आणि कमांडर आफताब अहमद यांच्या मोबाइल क्रमांकांशी जोडलेले आढळले असून, डिजिटल वॉलेटच्या माध्यमातून पैसा उभारण्यात येत आहे. अजहरचा मुलगा अब्दुल्लाच्या मोबाईल क्रमांकाच्या माध्यमातून चालणारे आणखी एक निधी उभारणीचे ‘रॅकेट’ आढळले आहे. पाकिस्तानातील खैबर पख्तुनख्वा प्रांतामध्ये दहशतवादी संघटनेचा कमांडर सय्यद सफदर शाहकडून मनसेहरा जिल्ह्यातील ओघी, मेल्वारा पोस्ट ऑफिसजवळ देणग्या गोळा केल्या जात आहेत.
दहशतवादी संघटनेच्या निधी उभारणी मोहिमेसाठी 250 हून अधिक ‘ईझी पैसा’ वॉलेटचा वापर केला जात असल्याचे समोर आले आहे. सोशल मीडियावरील आवाहनांसोबतच या दहशतवादी संघटनेने आपल्या अधिकृत प्रचार चॅनेल ‘एमएसटीडी ऑफिशिअल’ द्वारे अजहरचा भाऊ अल सैफ याचे ऑडिओ रेकॉर्डिंग प्रसारित केले आहे. यात संघटनेसाठी प्रत्येकी 21,000 रुपये देणगी देण्याचे आवाहन करण्यात आले आहे, असे सुरक्षा यंत्रणांनी सांगितले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.