Bharat Ratna demand for Pilot Smit Machchhar sarkarnama
देश

Captain Smit Machchhar : कॅप्टन स्मितसाठी भाजपच्या माजी मुख्यमंत्र्यांची मोठी मागणी; थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींनाच पत्र धाडणार

Bharat Ratna Demand for Pilot Smit Machchhar : अबूधाबीहून उड्डाण केलेल्या फ्लायदुबईच्या विमानात सह-वैमानिकाने केलेल्या जीवघेण्या हल्ल्यातून स्वत: गंभीर जखमी असतानाही १७४ प्रवासी आणि क्रू सदस्यांसह १८० लोकांना वाचवण्याचे काम भारतीय कॅप्टन स्मित मच्छार यांनी केले.

Aslam Shanedivan

Karnataka Political News : स्वतःचा जीव धोक्यात घालून १७४ प्रवाशांचे प्राण वाचवणारे भारतीय कॅप्टन स्मित मच्छार यांचे जगभरातून कौतुक होत आहे. देश-विदेशातून या शौर्याची दखल घेतली जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह सर्वच भारतीयांनी मच्छार यांच्या शौर्याला सलाम केला. इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांनीही कॅप्टन मच्छार यांचे कौतुक केले आहे. त्यांना इस्रायलच्या आगामी स्वातंत्र्यदिनाच्या कार्यक्रमात मशाल प्रज्वलित करण्यासाठी आमंत्रित करण्यात आले आहे.

कॉकपिटमध्ये हल्ला, विमान तब्बल १४ हजार फूट खाली

फ्लायदुबईचे FZ1073 विमान ३० सप्टेंबर रोजी दुबईहून तेल अवीवकडे निघाले होते. विमानात १७४ प्रवासी होते. प्रवासादरम्यान कॉकपिटमध्ये सहवैमानिकाने कॅप्टन स्मित मच्छार यांच्यावर हल्ला केला. या हल्ल्यात मच्छार गंभीर जखमी झाले. या घटनेनंतर विमानाची उंची काही क्षणांत तब्बल १४ हजार फुटांनी खाली आली. परिस्थिती अत्यंत गंभीर बनली होती.

मात्र, जखमी अवस्थेतही कॅप्टन मच्छार यांनी हार मानली नाही. त्यांनी कॉकपिटचा दरवाजा उघडण्यात यश मिळवले आणि त्यानंतर प्रवासी व क्रू सदस्यांनी हल्लेखोराला नियंत्रणात आणण्यासाठी मदत केली. अखेर विमानाला सौदी अरेबियातील ताबूक येथे आपत्कालीन लँडिंग करण्यात आले. सर्व १७४ प्रवासी सुरक्षित राहिले.

पंतप्रधान मोदींकडूनही शौर्याचे कौतुक

या घटनेनंतर कॅप्टन स्मित मच्छार यांच्या धाडसाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही कौतुक केले. गंभीर जखमी अवस्थेतही त्यांनी प्रवाशांच्या सुरक्षेला प्राधान्य दिल्याने त्यांना जगभरातून शाबासकी मिळत आहे. कॅप्टन मच्छार हे मुंबईचे असून, फ्लायदुबईमध्ये कॅप्टन म्हणून कार्यरत आहेत. यापूर्वी त्यांनी स्पाईसजेटमध्येही काम केले आहे. त्यांच्या विमान उड्डाणाच्या मोठ्या अनुभवाचीही सध्या चर्चा होत आहे.

मिलिंद देवरांकडून अशोक चक्राची मागणी

कॅप्टन मच्छार यांच्या शौर्याला राष्ट्रीय पातळीवर सन्मान मिळावा, अशी मागणीही पुढे आली आहे. शिवसेनेचे राज्यसभा खासदार मिलिंद देवरा यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून कॅप्टन स्मित मच्छार यांचा अशोक चक्रासाठी विचार करावा, अशी मागणी केली आहे. देवरा यांनी मच्छार यांनी स्वतःचा जीव धोक्यात घालून विमानातील १७४ प्रवाशांचे प्राण वाचवण्यासाठी असामान्य धैर्य आणि प्रसंगावधान दाखवल्याचे म्हटले आहे.

आता थेट भारतरत्नाची मागणी

अशोक चक्राच्या मागणीनंतर आता कॅप्टन स्मित मच्छार यांना भारतरत्न देण्याची मागणीही पुढे आली आहे. कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते बी. एस. येडियुरप्पा यांनी कॅप्टन मच्छार यांच्या शौर्याचे कौतुक करत त्यांना भारतरत्न देण्याची मागणी केली आहे. येडियुरप्पा यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्याकडे ही मागणी मांडणार असल्याचे सांगितले आहे. कॅप्टन मच्छार यांनी १७४ जणांचे प्राण वाचवून देशाचे नाव उज्ज्वल केल्याचे त्यांनी म्हटले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT