IPS officer daughter shocking incident sarkarnama
देश

IPS officer news : IPS अधिकाऱ्याचे पत्नीसोबत भांडण? अल्पवयीन मुलीने उचलले टोकाचे पाऊल; 16 वर्षांपूर्वी घेतले होते दत्तक

Family conflict and teenage mental stress : IPS अधिकाऱ्याच्या घरातील वादानंतर 16 वर्षांपूर्वी दत्तक घेतलेल्या अल्पवयीन मुलीने टोकाचे पाऊल उचलल्याची धक्कादायक घटना समोर आली.

Rashmi Mane

मध्य प्रदेशातील भोपाल येथील चार इमली परिसरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. राज्य पोलीस विभागातील वरिष्ठ IPS अधिकारी संजीव कंचन यांच्या 17 वर्षीय मुलीने राहत्या घरी गळफास घेत आत्महत्या केल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेमुळे पोलीस विभागात मोठी खळबळ उडाली असून संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी सुरू करण्यात आली आहे.

मंगळवारी दुपारच्या सुमारास अधिकारी संजीव कंचन हे जेवणासाठी घरी परतले होते. त्यावेळी घरातील खोलीत मुलगी गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळली. कुटुंबीयांनी तातडीने तिला जवळच्या रुग्णालयात दाखल केले. मात्र डॉक्टरांनी तपासणीनंतर तिला मृत घोषित केले. संबंधित मुलगी 11वीत शिक्षण घेत होती.

घटनेची माहिती मिळताच हबीबगंज पोलीस ठाण्याचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी घराची तपासणी केली असता कोणतीही सुसाइड नोट सापडली नसल्याचे समोर आले आहे. त्यामुळे तिने इतके टोकाचे पाऊल नेमके कोणत्या कारणामुळे उचलले, याबाबत अद्याप स्पष्ट माहिती मिळालेली नाही. पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद करून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला आहे.

तपासादरम्यान पोलिसांनी मुलीचा मोबाईल फोन, कॉल रेकॉर्ड आणि सोशल मीडिया अ‍ॅक्टिव्हिटीची तपासणी सुरू केली आहे. तिच्यावर कोणता मानसिक ताण होता का, याचाही शोध घेतला जात आहे. याचदरम्यान आणखी एक महत्त्वाची बाब समोर आली असून संबंधित मुलगी ही दत्तक घेतलेली असल्याची माहिती मिळाली आहे. सुमारे 16 वर्षांपूर्वी अधिकृत प्रक्रियेद्वारे तिला दत्तक घेण्यात आले होते.

दरम्यान, घरात पती-पत्नीमध्ये वारंवार वाद होत असल्याची माहितीही तपासात पुढे आली आहे. या कौटुंबिक तणावाचा अल्पवयीन मुलीच्या मानसिक स्थितीवर परिणाम झाला होता का, याचा तपास पोलीस करत आहेत. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात असून अनेक प्रश्न अनुत्तरित राहिले आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT