

News : बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर पुणे शहरात कायदा-सुव्यवस्था आणि सार्वजनिक आरोग्य अबाधित राखण्यासाठी राज्यमंत्री माधुरी मिसळ यांनी एक अत्यंत महत्त्वाचे आणि कडक पाऊल उचलले आहे.
सार्वजनिक ठिकाणी तसेच निवासी सोसायट्यांमध्ये अनधिकृतरीत्या होणारे पशुबळी व कत्तलीचे प्रकार रोखण्यासाठी प्रशासनाने तातडीने प्रतिबंधात्मक उपाययोजना कराव्यात, अशी आग्रही मागणी त्यांनी केली आहे. यासंदर्भात त्यांनी पुणे महानगरपालिका आयुक्त आणि पुणे पोलीस आयुक्तांना थेट पत्र पाठवले असून, यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.
माधुरी मिसळ यांनी आपल्या पत्रात मुंबई जवळील मीरा-भाईंदर परिसरातील एका घटनेचा प्रामुख्याने दाखला दिला आहे. मीरा-भाईंदर भागातील काही निवासी सोसायट्यांमध्ये सार्वजनिक स्वरूपात बकरे आणून धार्मिक कारणास्तव पशुबळी व कत्तलीचे प्रकार झाल्याच्या बातम्या समोर आलेल्या आहेत. अशा प्रकारांमुळे स्थानिक नागरिकांमध्ये मोठी अस्वस्थता निर्माण झाली असून, तेथील सामाजिक तणाव वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
याच पार्श्वभूमीवर पुणे शहरातही काही समाजविघातक व कट्टर प्रवृत्तीचे घटक सार्वजनिक ठिकाणी, सोसायट्यांमध्ये किंवा रहिवासी भागांमध्ये अशाच प्रकारचे बेकायदेशीर कार्यक्रम करण्याच्या तयारीत असल्याची माहिती समोर येत असल्याचा खळबळजनक दावा मंत्री मिसळ यांनी केला आहे.
कोणत्याही प्रकारची आवश्यक प्रशासकीय परवानगी, आरोग्य विभागाचे निकष किंवा कायदेशीर प्रक्रिया न पाळता सार्वजनिक ठिकाणी पशुकत्तल अथवा बळीचे कार्यक्रम घेणे हे कायदा व सार्वजनिक आरोग्याच्या दृष्टीने अत्यंत गंभीर बाब असल्याचे त्यांनी पत्रात स्पष्ट केले आहे.
पुणे हे नेहमीच सांस्कृतिक, शैक्षणिक व सामाजिक सलोखा जपणारे शहर म्हणून ओळखले जाते. त्यामुळे अशा प्रकारांमुळे शहरात कोणत्याही प्रकारचा कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही, यासाठी प्रशासनाने वेळीच प्रतिबंधात्मक उपाययोजना करणे अत्यंत आवश्यक आहे. यासाठी मंत्री माधुरी मिसळ यांनी प्रशासनाला काही स्पष्ट निर्देश देण्याची विनंती केली आहे.
यामध्ये सार्वजनिक ठिकाणी, निवासी सोसायट्यांमध्ये किंवा परवानगीविना कोणत्याही प्रकारची पशुकत्तल अथवा धार्मिक बळीचे कार्यक्रम होणार नाहीत याबाबतचे स्पष्ट निर्देश तातडीने जारी करावेत, अशी मागणी त्यांनी केली आहे. तसेच, अशा बेकायदेशीर प्रकारांना प्रोत्साहन देणाऱ्या अथवा कायदा हातात घेण्याचा प्रयत्न करणाऱ्या व्यक्तींवर पोलिसांनी तातडीने कठोर प्रतिबंधात्मक कारवाई करावी, असेही त्यांनी म्हटले आहे.
हा संवेदनशील विषय सुसंवादाने सोडवण्यासाठी पुणे पोलीस प्रशासन, पुणे महानगरपालिका आरोग्य विभाग, संबंधित समाजघटक व स्थानिक प्रतिनिधी यांची तातडीची समन्वय बैठक बोलविण्यात यावी आणि सामाजिक सलोखा, सार्वजनिक आरोग्य व नागरिकांच्या भावना लक्षात घेऊन योग्य ती कायदेशीर कार्यवाही करण्यात यावी, असे त्यांनी पत्रात नमूद केले आहे.
पत्राच्या शेवटी प्रशासनाला एकप्रकारे इशारा देताना त्यांनी म्हटले आहे की, जर प्रशासनाने वेळेवर योग्य पावले उचलली नाहीत, तर शहरात सामाजिक असंतोष वाढण्याची भीती आहे. अशा परिस्थितीत विविध संघटना व नागरिक स्वतः सार्वजनिकरित्या हस्तक्षेप करण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे पुण्यातील कायदा-सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी तातडीने आवश्यक ती उपाययोजना करण्यात यावी, अशी मागणी त्यांनी केली आहे. आता या पत्रानंतर पुणे महापालिका आणि पोलीस प्रशासन आगामी सणांच्या काळात काय पावले उचलणार, याकडे संपूर्ण पुणेकरांचे लक्ष लागले आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.