

तमिळनाडूचे मुख्यमंत्री सी. जोसेफ विजय म्हणजेच थलपती विजय यांचा बुधवारी 27 मे रोजी पहिलाच अधिकृत दिल्ली दौरा पार पडणार असून, या भेटीकडे देशभरातील राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. मुख्यमंत्रीपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर विजय यांचा पहिल्यांदाच दिल्लीत जात असल्याने या दौऱ्याला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. दिल्ली दौऱ्यात ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह केंद्रातील काही महत्त्वाच्या मंत्र्यांची भेट घेणार असल्याची माहिती समोर आली आहे.
या बैठकींमध्ये तमिळनाडूच्या विकासाशी संबंधित अनेक विषयांवर चर्चा होण्याची शक्यता आहे. राज्यासाठी अतिरिक्त आर्थिक सहाय्य, मोठ्या पायाभूत सुविधा प्रकल्पांना मंजुरी, तसेच केंद्र सरकारच्या विविध योजनांमध्ये अधिक सहकार्य मिळावे, अशी मागणी मुख्यमंत्री विजय केंद्रासमोर मांडणार असल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे या भेटीनंतर केंद्र आणि तमिळनाडू सरकारमधील संबंध अधिक मजबूत होणार का, याकडेही लक्ष लागले आहे.
मुख्यमंत्री विजय बुधवारी सकाळी चेन्नईहून दिल्लीकडे रवाना होणार असून त्यांच्या दौऱ्याची तयारी प्रशासनाने पूर्ण केली आहे. राज्यातील वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून या दौऱ्याचे नियोजन करण्यात आले आहे. गृह विभागासह अनेक शासकीय यंत्रणा दौऱ्याच्या तयारीत व्यस्त असल्याची माहिती आहे.
अलीकडेच झालेल्या तमिळनाडू विधानसभा निवडणुकीत तमिळगा वेत्री कळघम (TVK) पक्षाने मोठे यश मिळवत सत्ता मिळवली. अभिनेता म्हणून लोकप्रिय असलेल्या विजय यांनी राजकारणात प्रवेश करत मोठा राजकीय बदल घडवून आणला. 10 मे रोजी त्यांनी तमिळनाडूच्या 13 व्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली होती. त्यांच्या नेतृत्वाखाली राज्यातील पारंपरिक DMK आणि AIADMK या पक्षांचे अनेक दशकांपासूनचे वर्चस्व कमी झाल्याचे चित्र पाहायला मिळाले.
या निवडणुकीत TVK ने 108 जागांवर विजय मिळवत सर्वात मोठा पक्ष म्हणून उदय घेतला आहे. त्यानंतर काँग्रेस, डावे पक्ष, VCK आणि IUML यांनीही विजय यांच्या नेतृत्वाला पाठिंबा देत सरकार स्थापनेत महत्त्वाची भूमिका बजावली.
दरम्यान, नवीन सरकारच्या खातेवाटपात विजय यांनी गृह, पोलीस, नगरविकास, महिला कल्याण, पाणीपुरवठा आणि विशेष कार्यक्रम अंमलबजावणी यांसारखी महत्त्वाची खाती स्वतःकडे ठेवली आहेत. तसेच राज्यात स्वतंत्र कृत्रिम बुद्धिमत्ता विभाग सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला असून, केरळनंतर असा विभाग स्थापन करणारे तमिळनाडू हे देशातील दुसरे राज्य ठरले आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.