Israel Lebanon Attack Crisis : पश्चिम आशियातील युद्ध दोन आठवड्यांसाठी स्थगित केल्यामुळे संपूर्ण जगाचा जीव भांड्यात पडला होता. इराण आणि अमेरिकीने अटीशर्थींसह शस्त्रसंधी मान्य केल्याच्या निर्णयाचं स्वागत जगभरात झालं. मात्र, त्यानंतर काही तासांतच या शस्त्रसंधीला इस्रायलने गालबोट लावलं.
इस्रायलने इराण आणि अमेरिकीतील शस्त्रसंधीनंतरही लॅबनॉनवर हल्ले केले. ज्यामध्ये तब्बल ३०० नागरिकांचा मृत्यू झाला. त्यानंतर संतापलेल्या इराणने पुन्हा होर्मुझची सामुद्रधुनी बंद ठेवली आणि पुन्हा जगावर मोठं संकट ओढावलं.
इस्रायलच्या लेबनॉनमधील हल्ल्यांमुळे अमेरिका-इराण यांच्यात आता शस्त्रसंधीची चर्चा होणार का? असा प्रश्न उपस्थित केला जात होता. शिवाय ही चर्चा झाली नाही तर पुन्हा युद्ध जैसे थे सुरू राहणार असल्याची भीती व्यक्त केली जात होती.
मात्र, इस्रायलचे पंतप्रधान बिन्यामिन नेतान्याहू यांनी लेबनॉनशी लवकरात लवकर चर्चेला परवानगी दिल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे आता अमेरिका-इराण यांच्यात शुक्रवारी पाकिस्तानमध्ये होणार्या शस्त्रसंधीतील सर्वात मोठा अडथळा दूर झाला आहे.
अमेरिका आणि इराणमध्ये झालेल्या शस्त्रसंधीतील अटींमध्ये लेबनॉनचा समावेश नाही, अशी भूमिका इस्रायलने घेतली होती. मात्र, इराण आणि मध्यस्थ पाकिस्तानने लेबनॉनचा समावेश या अटींमध्ये असल्याचं स्पष्ट केलं. शिवाय ब्रिटन, फ्रान्ससह अनेक देशांनी लेबनॉनचा समावेश युद्धविरामामध्ये करावा असं म्हटल्यामुळे अखेर इस्रायलने माघार घेतली आहे.
त्यानुसार लेबनॉनच्या विनंतीला प्रतिसाद म्हणून चर्चेचा आदेश दिल्याचे नेतान्याहून यांनी म्हटलं आहे. मात्र, हिजबुल्लाह नि:शस्त्र करणे आणि शेजारच्या देशांमध्ये सौहार्दाचे संबंध प्रस्थापित करणे यावर चर्चेत भर दिला जाईल असंही त्यांनी स्पष्ट केलं आहे. तर ही पुढील आठवड्यात चर्चा वॉशिंग्टन येथे होणार असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे.
दरम्यान, इराणने इस्राइलच्या हल्ल्यानंतर होर्मुझची सामुद्रधुनी बंद ठेवण्याची घोषणा केली. त्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणने सहकार्य केले नाही, तर पुन्हा तीव्र हल्ल्यांना सुरुवात होईल, अशी धमकी दिली आहे. त्यामुळे आता या पाकिस्तानात या दोन्ही देशांच्या शिष्टमंडळाच्या चर्चेमधून नेमका काय मार्ग निघणार याकडे संपूर्ण जगाचं लक्ष लागलं आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.