Caste Census, Congress Sarkarnama
देश

Caste Census : जातनिहाय जनगणनेबाबत काँग्रेसचे मोठे पाऊल; 1931 नंतर पहिल्यांदाच...

Telangana Congress : काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्याकडून सातत्याने जातनिहाय जनगणनेबाबत भाष्य केले जात आहे. केंद्र सरकारकडे याबाबत सातत्याने मागणी केली जात आहे.

Rajanand More

New Delhi : महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसने जातनिहाय जनगणनेबाबत मोठा निर्णय घेतला आहे. तेलंगणातील काँग्रेस सरकार आजपासून जातीनिहाय सर्वेक्षण सुरू करणार आहे. 1931 नंतर प्रथमच तेलंगणामध्ये सरकारद्वारे जातीनिहाय सर्वेक्षण केले जात असल्याची माहिती काँग्रेसचे नेते जयराम रमेश यांनी दिली.

बिहारमध्ये काही महिन्यांपूर्वीच जातनिहाय सर्वेक्षण करण्यात आले आहे. त्यानुसार सरकारने मागासवर्ग इतर घटकांसाठी वाढीव आरक्षण दिले. पण कोर्टाने ते आरक्षण रद्द ठरवले आहे. बिहारपाठोपाठ आता तेलंगणामध्ये काँग्रेसकडून जातनिहाय सर्वेक्षण सुरू करण्यात आले आहे.

काँग्रेस नेते राहुल गांधी हे सातत्याने जातनिहाय जनगणनेची मागणी करत आहेत. त्याची सुरूवात त्यांनी पक्षाची सत्ता असलेल्या तेलंगणातून केली आहे. राज्यात 80 हजार प्रगणक पुढील काही आठवड्यात घरोघरी जाऊन 33 जिल्ह्यांतील 1.17 कोटी कुटुंबाचे सर्वेक्षण करतील.

1931 नंतर प्रथमच तेलंगणामध्ये सरकारद्वारे जातीनिहाय सर्वेक्षण केले जात असुन हा एक ऐतिहासिक आणि क्रांतिकारी क्षण असल्याचे जयराम रमेश म्हणाले. हे तेलंगणा आंदोलनाच्या आकांक्षांची पूर्तता आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानातील एका मुख्य तत्त्वाचे पालन असल्याचेही त्यांनी सांगितले.

हैदराबादमध्ये या आठवड्यात राहुल गांधी यांनी म्हटल्याप्रमाणे, हे राष्ट्रीय जातीय जनगणनेचा एक आराखडा आहे‌. जे INDIA आघाडीचे सरकार पुर्ण करेल. या जनगणनेमुळे आणि अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती आणि इतर मागासवर्ग यांच्यासाठी आरक्षणावर सर्वोच्च न्यायालयाने घातलेली 50 टक्के आरक्षणाची मर्यादा शिथिलीकरणाद्वारे काँग्रेसच्या देशाप्रती असलेल्या दृष्टीकोनाची पूर्तता होते, असे काँग्रेस नेत्यांनी सांगितले.

दरम्यान, राहुल गांधी यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवारांनीही यापूर्वी आरक्षणाची 50 टक्क्यांची मर्यादा वाढविण्याबाबतची मागणी केली आहे. मराठा, धनगर तसेच ओबीसी आरक्षणाचा मुद्दा महाराष्ट्रात चर्चेत आहे. त्यावर राहुल गांधी प्रचारसभांमध्ये बोलणार का, याबाबतही आता उत्सुकता वाढली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT