Jamkhed Success Story Sarkarnama
देश

Kulfi Seller’s Three Daughters Become Police: आई शेतमजूर, वडील कुल्फी विक्रेते; तीनही लेकी बनल्या पोलीस

Kulfi Seller’s Three Daughters Become Police Officers: शेतमजूर आई आणि कुल्फी विक्रेते वडील यांच्या तीन मुलींनी संघर्षावर मात करत महाराष्ट्र पोलीस दलात स्थान मिळवले. जामखेडच्या क्षीरसागर कुटुंबाची प्रेरणादायी कहाणी.

Mangesh Mahale

Police News: अहिल्यानगर जिल्ह्यातील जामखेड तालुक्यातील दुर्गम तेलंगशी गाव… ना पुरेशा सुविधा, ना मोठ्या संधी. मात्र, याच छोट्याशा गावाने आज संपूर्ण महाराष्ट्रासमोर संघर्ष, जिद्द आणि कष्टाची प्रेरणादायी कहाणी उभी केली आहे. शेतमजुरी करणारी आई आणि सायकलवर कुल्फी विकणारे वडील यांच्या तीन मुलींनी महाराष्ट्र पोलीस दलात भरती झाल्या अन् गावाचा इतिहासच बदलून टाकला आहे.

रेखा, शीतल आणि संगीता क्षीरसागर या तिन्ही सख्या बहिणींनी प्रतिकूल परिस्थितीवर मात करत खाकी वर्दीपर्यंतचा प्रवास पूर्ण केला. त्यांचे वडील देवीदास क्षीरसागर, ज्यांना गावात “देवा दादा” म्हणून ओळखले जाते, हे कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी मिळेल ते काम करत होते. उन्हाळ्यात सायकलवर कुल्फी आणि आईस्क्रीम विकणे, तर इतर दिवसांत शेतमजुरी, झाडू बांधणे, चिंचा गोळा करणे अशी कष्टाची कामे करून त्यांनी संसार उभा ठेवला. आई ताराबाई यांनीही खांद्याला खांदा लावून कष्ट केले.

मुलींनी शिकलेच पाहिजे

घरची परिस्थिती अत्यंत हलाखीची होती. गावात सातवीपर्यंतच शाळा असल्याने पुढील शिक्षणासाठी अनेक अडचणींचा सामना करावा लागत होता. मात्र, “मुलींनी शिकलेच पाहिजे” हा निर्धार आई-वडिलांनी कधी सोडला नाही. अनेकदा आर्थिक अडचणी समोर उभ्या राहिल्या, पण शिक्षणाचा मार्ग त्यांनी थांबू दिला नाही.

कुटुंबाचे आयुष्य बदलायचे....

आई-वडिलांचे कष्ट पाहतच तिन्ही बहिणी मोठ्या झाल्या. दिवसभर अभ्यास आणि सुट्टीच्या काळात शेतात मदत, शेळ्या राखणे, चिंचा वेचणे अशी कामे त्या करत होत्या. परिस्थिती कठीण असली तरी त्यांच्या डोळ्यांत मोठी स्वप्ने होती. पोलीस दलात भरती होऊन कुटुंबाचे आयुष्य बदलायचे, हा त्यांचा ध्यास होता.

राज्यात त्यांचे कौतुक

मोठी बहीण रेखा अहिल्यानगर पोलीस दलात कार्यरत झाली. त्यानंतर शीतलची पिंपरी-चिंचवड पोलीस दलात निवड झाली, तर धाकटी संगीता मीरा-भाईंदर पोलीस दलात दाखल झाली. एकाच घरातील तीन सख्या बहिणी पोलीस झाल्याने राज्यात त्यांचे कौतुक होत आहे.

मुलींसाठी प्रेरणेचा दीप

क्षीरसागर कुटुंबाची ही कहाणी केवळ यशोगाथा नाही, तर ग्रामीण भागातील हजारो मुलींसाठी प्रेरणेचा दीप आहे. परिस्थिती कितीही कठीण असली, तरी जिद्द, कष्ट आणि शिक्षणाच्या बळावर मोठे यश मिळवता येते, हे या तिन्ही बहिणींनी दाखवून दिले आहे.

आज खाकी वर्दी परिधान केलेल्या या तिन्ही बहिणींकडे गाव अभिमानाने पाहत आहे. आई-वडिलांच्या घामाचे चीज करत त्यांनी केवळ स्वतःचेच नव्हे, तर संपूर्ण गावाचे नाव उज्ज्वल केले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT