

तळेगाव दाभाडे: मावळ तालुक्याच्या राजकारणात सध्या एका नव्या राजकीय समीकरणाची जोरदार चर्चा रंगू लागली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार सुनील शेळके यांचा मंत्रीमंडळात समावेश होणार आहे. तसे झाल्यास मावळ तालुक्याला तिसऱ्यांदा ‘लाल दिवा’ मिळणार असल्याचे बोलले जात आहे.
राज्यातील आगामी मंत्रिमंडळ विस्तार, राजकीय समतोल आणि पक्ष संघटनात्मक बदलांच्या पार्श्वभूमीवर सुनील शेळके यांच्या नावाला विशेष महत्त्व प्राप्त झाले. मंत्रिमंडळात समाज कल्याण विभागाची जबाबदारी त्याच्यावर सोपविण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
मावळ तालुक्याच्या राजकारणाचा इतिहास पाहिला तर एकेकाळी हा परिसर काँग्रेसचा अभेद्य गड मानला जात होता. मात्र सुमारे पंचवीस वर्षांपूर्वी भाजपने काँग्रेसमधील रूपलेखा ढोरे यांना उमेदवारी देत राजकीय समीकरणे बदलली आणि काँग्रेसच्या बालेकिल्ल्याला सुरूंग लागला. त्यानंतर भाजपने तालुक्यात मजबूत संघटन उभारले आणि बाळा भेगडे यांच्या नेतृत्वाखाली भाजपची ताकद अधिक वाढली. भेगडे यांनी मंत्रीपद मिळवत तालुक्याला राज्यस्तरावर ओळख मिळवून दिली होती.
कालांतराने मावळमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसने नव्याने पाय रोवण्यास सुरुवात केली. अनेक वर्षांच्या प्रयत्नांनंतर अजित पवार यांनी सुनील शेळके यांच्यावर विश्वास ठेवत त्यांना उमेदवारी दिली आणि त्या निर्णयाने मावळच्या राजकारणाला निर्णायक कलाटणी मिळाली.
पहिल्याच विधानसभा निवडणुकीत सुनील शेळके यांनी तत्कालीन राज्यमंत्री बाळा भेगडे यांचा पराभव करत राजकीय भूकंप घडवून आणला. त्यानंतर दुसऱ्यांदा निवडणुकीतही त्यांनी जवळपास एक लाखांच्या मताधिक्याने विजय मिळवत आपले निर्विवाद वर्चस्व सिद्ध केले. त्यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेसने केवळ विधानसभा नव्हे तर स्थानिक स्वराज्य संस्थांमध्येही मोठे यश मिळवले.
लोणावळा नगरपरिषद, तळेगाव दाभाडे नगरपरिषद, वडगाव नगरपंचायत तसेच पंचायत समित्यांवर राष्ट्रवादी काँग्रेसची एकहाती सत्ता प्रस्थापित करण्यात शेळके यांची भूमिका निर्णायक ठरली. त्यामुळे पक्षश्रेष्ठींकडे त्यांचे राजकीय वजन सातत्याने वाढत असल्याचे मानले जात आहे.
मावळ तालुक्याच्या राजकीय इतिहासात आतापर्यंत मदन बाफना आणि बाळा भेगडे या दोन नेत्यांना मंत्रीपदाचा मान मिळाला होता. विशेष म्हणजे दोघांच्याही मंत्रीपदानंतर पुढील निवडणुकांमध्ये त्यांना पराभवाचा सामना करावा लागला आणि त्यातून तालुक्याच्या राजकारणाला नवे वळण मिळाले.
कालपर्यंत सुनील शेळके यांच्या नावाची विधानसभेच्या उपाध्यक्षपदासाठी जोरदार चर्चा सुरू होती, उपाध्यक्षपद हे 'शोभेचे पद' घेण्यास शेळके यांनी नकार दिला असल्याची माहिती आहे.
मंत्रिमंडळात त्याचा समावेश होणार हे निश्चित झाले आहे. मावळमध्ये पुन्हा एकदा राजकीय उत्साह निर्माण झाला आहे., शेळके यांना मंत्रीपद मिळाल्यास तालुक्याच्या राजकीय इतिहासात आणखी एक महत्त्वपूर्ण अध्याय लिहिला जाईल, अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे.
राज्यातील बदलत्या राजकीय घडामोडींमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसला पश्चिम महाराष्ट्रात अधिक मजबूत करण्यासाठी प्रभावी नेतृत्वाची गरज असल्याचे मानले जात आहे. मावळ, पिंपरी-चिंचवड आणि पुणे जिल्ह्यातील संघटनात्मक ताकद लक्षात घेता सुनील शेळके यांच्याकडे मंत्री पदाची जबाबदारी देण्याची शक्यता अधिक बळावली आहे.
दरम्यान, अधिकृत घोषणा अद्याप झालेली नसली तरी मावळमध्ये मात्र “सुनील शेळके यांना लाल दिवा मिळणार का?” याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. आगामी काही दिवसांत राज्याच्या राजकारणात मोठी घडामोड होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
या बाबत आमदार सुनील शेळके म्हणाले, 'मावळच्या जनतेने मला भरपूर प्रेम दिले मंत्रीमंडळात माझा समावेश व्हावा, ही जनतेची इच्छा लवकरच पूर्ण होईल,"
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.